शाळेत शिकत असताना इंग्रजी, मराठी, हिंदी अशा तीन-तीन भाषांचा अभ्यास आम्ही करत असू. अर्धशतक उलटून गेले तरी या तीन भाषांनी विद्यार्थ्यांची पाठ आजही सोडलेली नाही ही चांगली गोष्ट आहे. निबंध लेखनात यापैकी निदान कोठल्या तरी एका भाषेचे शिक्षक ‘मी कोण होणार?’ हा किंवा यासारखा एखादा विषय हमखास देणार हे ठरलेले असायचे. मग विद्यार्थीही आपापल्या कल्पनेनुसार आणि वकुबानुसार स्वत:च्या भवितव्याचे चित्र त्या निबंधात रेखाटत. अर्थात ही ध्येयाकांक्षा आणि वास्तव यात कोणाचा फारसा ताळमेळ जमत असे असे नाही. सातवी-आठवीच्या आणि यात स्वत:च्या पंचविशीचे भविष्य आपणच वर्तविणे ही कठीणच गोष्ट होती. (याचे भान हा विषय देणाऱ्या त्यांच्या शिक्षकांनाही नव्हते ती गोष्ट अलाहिदा!) आमच्या सुदैवाने त्या वेळच्या आमच्या शिक्षकांना हे भान होते. त्यांच्या संपर्कात आलेल्या आम्हा विद्यार्थ्यांना त्यांनी एक सुरेख कानमंत्र दिला होता. ‘‘चांगला अभ्यास करीत राहा आणि तुम्हाला ज्या लहान-मोठय़ा सुटय़ा मिळतील त्यांचा उपयोग तुम्हाला आनंद मिळेल, अशा गोष्टीत करा.’’ त्यांचा हा मोलाचा संदेश आमच्या समकालीन पिढय़ांनी तंतोतंत मानला आणि या बाबतीत त्यांच्या मार्गदर्शनाचा भरपूर फायदा करून घेतला.
दिवाळी, नाताळ आणि मे महिन्याची उन्हाळी सुटी या त्या काळात दीर्घकालीन सुटय़ा असत. सर्व जण या दिवसांची आतुरतेने वाट पाहत असत. रांगोळ्या काढणे, आकाशकंदील बनविणे, फटाके आणून उन्हात वाळविणे हे सार्वत्रिक कार्यक्रम ठरलेले. मातीचे किल्ले बनविणे हा दिवाळीच्या सुटीतला एक आवडीचा उपक्रम असे. दोन बुरुज, त्याच्या मधोमध प्रवेशद्वार आणि थोडाफार डोंगरसदृश आकार हा सर्वसाधारणपणे किल्ल्याचा ठरलेला देखावा. मग त्याच्या अवतीभोवतीचा परिसर प्रत्येक जण आपापल्या मगदुराप्रमाणे उभारीत असत. पाठीवर ढाल बांधलेला व हातात उंचावलेली तलवार असणारा एखाददुसरा मातीचा किंवा मेणाचा बनविलेला मावळा, बुरुजावर एखाददुसरी पुठ्ठय़ाची बनविलेली किंवा विकत आणलेली पत्र्याची तोफ अशा प्रकारे तो किल्ला सजविला जाई. रांगोळ्या आणि निसर्गाच्या एखाद्या देखाव्याचे चित्र अंगण सारवून त्यावर काढला जाई. दिवेलागणीची वेळ होताच त्या त्या परिसरातले सवंगडी एकत्र जमून आपापल्या किल्ल्यांची रोज डागडुजी करीत. त्या काळात नगरपालिकाही या जल्लोषांत अधूनमधून सामील होत असे. मला चांगले आठवते की, ठाणे नगरपालिकेने १९८० मध्ये किल्ले करण्याची एक स्पर्धा आयोजित केली होती. शहरातील अनेक शालेय विद्यार्थ्यांनी त्यात भाग घेतला होता. त्या वेळी काही विद्यार्थ्यांनी आपापल्या शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रातील वेगवेगळ्या किल्ल्यांना प्रत्यक्ष भेटी देऊन, त्या त्या ठिकाणांची रेखाटने करून, बुरुजांचे आकार व संख्या मोजून आपापली मॉडेल्स साकारली होती. हे सर्व किल्ले इतके हुबेहूब साकारले होते की, त्या वेळच्या परीक्षकांनी सगळ्यांचे तोंड भरून कौतुक केले होते. पालिकेनेही या उपक्रमासाठी हजारो रुपयांची पारितोषिके विद्यार्थ्यांना दिली होती.
दीर्घकालीन सुटय़ांमध्ये आणखीही अनेक उपक्रम हाती घेतले जात. त्यात एखाद्या जाणकाराच्या मार्गदर्शनाखाली जवळपासच्या ऐतिहासिक किंवा मामाच्या गावी अथवा अन्य प्रसिद्ध ठिकाणी (उदा. कर्नाळा अभयारण्य) सायकलींवरून प्रवास करून जाण्याची योजना असे. एखादी भारतीय किंवा परदेशी भाषा शिकणे असाही एखादा उपक्रम दीर्घकालीन सुटीत पार पाडण्याचा शिरस्ता त्या काळात होता. फोटोग्राफीसारखी एखादी उपयुक्त कला आपापल्या विद्यार्थ्यांना शिकविण्याचे प्रयोगही त्या काळी होत असत. यासाठी ‘क्लासेस’ची सोय तेव्हा नव्हती. मग कोणी तरी वसंतराव लिमयांसारखा फोटोग्राफीमध्ये वाकबगार असलेला एखादा शिक्षक विद्यार्थ्यांना विनामूल्य ही कला शिकवीत. मी स्वत: त्यांच्याकडून फिल्म धुण्यापासून फोटो प्रिंट काढण्यापर्यंत सर्व प्रक्रिया शिकलो होतो. इतर अनेक जण त्यांच्याकडे शिकून गेल्याचे माझ्या चांगले स्मरणात आहे.
विहिरी किंवा तलावात पोहायला शिकणे हा एक आवडता उपक्रम त्या काळात पार पडे. ठाण्यातील एक जुन्याजाणत्या पिढीतले मेजर गावंड यांच्या भल्यामोठय़ा विहिरीत पोहायला शिकण्याची मजा काही और असे. आर्य क्रीडामंडळातील एक पत्की नावाचे तरुण स्वयंसेवक आम्हा मुलांना गोळा करून त्या विहिरीवर नेत व बेधडक सगळ्यांना एकदम विहिरीत उडय़ा मारायला सांगत. त्यांच्याबरोबर त्यांचे इतर साथीदारही मदतीला असत.

मे महिना उजाडला की, अनेक पालकांची व विद्यार्थ्यांची काही ठरावीक कोचिंग क्लासमध्ये प्रवेश घेण्याची धडपड हमखास सुरू होणार हे ठरलेले. वसंतराव लिमये, सदूभाऊ भावे यांच्याकडे गणिताच्या क्लासला प्रवेश मिळाला म्हणजे विद्यार्थ्यांना कृतकृत्य झाल्यासारखे वाटे, अशी ही त्या विषयातली ‘दादा’ मंडळी होती. लीलाताई जोशींच्या क्लासला इंग्रजीसाठी प्रवेश मिळावा म्हणून पालकांची झुंबड उडे. पुढच्या काळात आणखी एका नामवंत शिक्षकाची भर पडली ती विलास जोशी यांच्या इंग्रजी माध्यमातल्या गणित व सायन्सच्या क्लासची. ते वार्षिक परीक्षेत गणित व विज्ञानात मिळवलेल्या गुणांनुसार अगदी काटेकोरपणे प्रवेश देत असत. जूनमध्ये शाळा सुरू होण्यापूर्वी पुस्तके व वह्य़ाखरेदी हा आणखी एक ठरलेला संकल्प. काही जण आपापल्या सीनिअर मित्रमैत्रिणींकडून त्यांनी वापरलेली पुस्तके स्वत:साठी मिळविण्याच्या खटपटीत असत. मग पुस्तकांना कव्हरे घालणे, हा ठरलेला एक कार्यक्रम असे. याच्या जोडीला अलीकडच्या काळात आणखी एका कामाची भर पडलेली दिसते. ती म्हणजे शाळेचा युनिफॉर्म घेणे. एकूणच जून महिना हा पालकांच्या दृष्टीने खरेदीचा महिना असे.
अलीकडच्या काळात शालेय जगतातील विद्यार्थ्यांचे हे मानचित्र आता पुष्कळ अंशी बदलू पाहत आहे. पालकही बदलताहेत. ते आपल्या मुलामुलींचे हट्ट पुरविण्याच्या मूडमध्ये दिसतात. ‘नवी पुस्तके व नवीन चपला-बूट- नवे दप्तर असा सर्व नव्याचा जमाना येऊ पाहतोय. स्वत:ची भावी करिअर स्वत: ठरविण्याच्या पाल्यांच्या कलापुढे पालकांना कित्येकदा नमते घ्यावे लागते. कोणाच्या क्लासला जाणार याचा पाल्याने घेतलेला निर्णय मुकाटय़ाने स्वीकारण्याच्या मन:स्थितीत पालक असतात. संगणकाच्या आधाराने सर्व शिक्षण हे जरी येणाऱ्या काळात अटळ असले तरी त्यांचे सर्व जीवनच संगणक व्यापू पाहत आहे. अनेक विद्यार्थी संगणकाच्या जोडीला संगणक प्रणालीत येणारी इतर आयुधे () निष्कारण सर्रास वापरताना दिसू लागली आहेत. त्यांचे हे आक्रमण चिंताजनक वाटते. माणसाची निसर्गदत्त सर्जनशीलता आम्ही अशीच विनावापर कुजवली तर त्याचा भविष्यकाळ काय असेल? आमच्या पूर्वजांना शेपूट होते, ते विनावापरामुळे आज गायब झाले आहे. येथवर ठीक! पण मानवी मेंदू, त्याच्या हातापायांची चलनवलन शक्ती अशा मूलभूत गोष्टीच जर विनावापरामुळे अदृश झाल्या तर!