गुंतवणुकीचे पर्याय, गुंतवणूक नेमकी कशी करावी, कधी करावी, कुठे करावी यासह विविध मुद्दय़ांवर तज्ज्ञांनी ‘लोकसत्ता’च्या वाचकांना शुक्रवारी मार्गदर्शन केले. निमित्त होते, ‘लोकसत्ता-अर्थब्रह्म’ या वार्षिक अंकाच्या प्रकाशनाचे. येथील टिपटॉप प्लाझा येथे झालेल्या या प्रकाशन सोहळ्याला ‘लोकसत्ता’च्या वाचकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला होता.

योग्य वेळी केलेली गुंतवणूक नक्कीच फायदा मिळवून देते
भांडवली बाजारांचे निर्देशांक एकदम वरच्या टप्प्याला असतात तेव्हा अफवांचे पेव फुटू लागते. अनेक जण गुंतवणूक करण्याचे सांगत सुटतात. अशा वेळी या सगळ्या बाहय़ गोष्टींकडे दुर्लक्ष करून स्वत:च्या अभ्यासाच्या जोरावरच गुंतवणूक करावी. आपण गुंतवलेल्या रकमेची सुरक्षितता आपण पाहण्याची गरज असते. त्यामुळे कोणी तरी सांगतो म्हणून गुंतवणूक करण्यापेक्षा गुंतवणूकविषयक स्वत:चा अभ्यास महत्त्वाचा असतो. गुंतवणुकीचे विविध मार्ग आपल्यासमोर खुले असून त्याचाही पुरेपूर वापर करून घेण्याची गरज आहे. शेअर बाजार नेमका कुणाला कळतो याविषयी साशंकता असणे साहजिक आहे. कारण ९० टक्के लोक आपल्याला बाजारातील काहीच कळत नाही, असे सांगतात, तर १० टक्के सगळे कळत असल्याच्या आविर्भावामध्ये असले तरी त्यांनी मांडलेले अनेक अंदाज चुकीचे ठरताना दिसतात. गुंतवणूक करताना गुंतवणुकीचे घडय़ाळ प्रत्येकाने पाहण्याची गरज आहे. योग्य वेळ साधून निर्णय घेतल्यास त्याचा फायदा हा होतच असतो. योग्य वेळी केलेली गुंतवणूक तुम्हाला नक्की फायदा मिळवून देतेच. तेजीचा माहोल येतो तेव्हा खूप टिप्स दिल्या जातात. शेअरविषयी टीप देणारे अनेक असतात. मात्र अशा वेळी गुंतणूकदारांनी सावध राहून निर्णय घेण्याची गरज आहे.
-अजय वाळिंबे, गुंतवणूकतज्ज्ञ.

समभाग निगडित म्युच्युअल फंडातील गुंतवणूक महत्त्वाची
म्युच्युअल फंड ही एकत्रित गुंतवणूक असून विखुरलेल्या गुंतवणूकदारांचे पैसे एकत्रित करून त्यांच्या गुंतवणूक ध्येयानुसार त्याची सुरक्षित पद्धतीने गुंतवणूक करत असतात. म्युच्युअल फंड क्षेत्रात कार्यरत असलेली मंडळी या सगळ्याचा परिपूर्ण अभ्यास करून त्यातून जास्तीचा नफा कमावून तो गुंतवणूकदारांना पोहोचवत असतात. दीर्घकालीन गुंतवणूक ही नेहमी फायदेशीर ठरत असते. सोने, मालमत्ता आणि बँकेच्या ठेवींमध्ये केलेल्या गुंतवणुकीपेक्षा हा परतावा नेहमीच मोठा असतो. सध्याच्या महागाईचा दर लक्षात घेतला तर हा दर ७ टक्क्यांच्या आसपास असून पुढील २० वर्षांमध्ये ध्येयपूर्तीसाठी त्या दराने वाढलेल्या किमतीचा विचार करणे आवश्यक आहे. तीन वर्षांची मुलगी असेल आणि तिच्या लग्नासाठी सध्याच्या कालावधीत ३ लाख खर्च येणार असला तरी २० वर्षांनंतर हा खर्च सुमारे १९ लाखांपर्यंत पोहोचलेला असेल. बँकेच्या ठेवीमधून इतक्या मोठय़ा प्रमाणात परतावा मिळणार नाही. समभाग निगडित म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीमधून मात्र इतका मोठा परतावा मिळू शकतो.
-लक्ष्मी अय्यर, मुख्य गुंतवणूक अधिकारी (रोखे), कोटक म्युच्युअल फंड.

कर हा गुंतवणुकीचा दुसरा मार्गच
गुंतवणुकीमध्ये एके काळी गुजराती, मारवाडी लोक अग्रेसर असल्याचे मानले जाई. मराठी माणूस मात्र पिछाडीवर असायचा. गुंतवणूक करणे म्हणजे धोकादायक, असे मराठी माणसाचे ठाम मत होते. यामुळे पूर्वी मराठी माणूस सहसा गुंतवणूक करत नव्हता. मात्र आता मराठी जनमाणसात वेगळी ‘लहर’ आली असून अनेक जण वेगवेगळ्या पद्घतीने पैसे गुंतवणूक करताना दिसून येत आहे. कर हा गुंतवणुकीचा दुसरा मार्ग असल्याने त्याचा भरणा करणे गरजेचेच आहे. मोठमोठय़ा कंपन्यांकरिता कर नियोजन करणे शक्य होते. पण सर्वसामान्य जनतेला कर नियोजन कटकटीचे आणि त्रासदायक वाटते. यामुळे कर नियोजन हा शब्द त्यांना धोकादायक वाटतो. केंद्र शासनाचा अर्थसंकल्प सादर झाला असून त्याचे कायद्यात रूपांतर व्हायचे आहे. मात्र यंदाच्या अर्थसंकल्पात अनेक योजना राबविण्याचा सरकारचा विचार आहे. यामध्ये सुकन्या – समृद्धी, प्रधानमंत्री जन-धन आदी योजनांचा समावेश असून त्याचा फायदा गुंतवणूकदारांना निश्चितच होऊ शकेल.
-जयंत गोखले, करसल्लागार.