संगीतातल्या ‘सा’शी एकदा मैत्री झाली की वरील पट्टीतील ‘सां’पर्यंत सगळेच सूर अगदी आपल्या दिमतीला हजर राहतात आणि मनोरंजनाच्या विश्वात आपल्याला सहज घेऊन जातात. रियाझाद्वारे कलावंत या सुरांची मैत्री करतात. ते सूर मग त्यांच्या दिमतीला हजर असतात. त्यांना हवी तशी साथ देतात. याचाच प्रत्यय रविवारी सकाळी ठाणे येथील सहयोग मंदिर येथे रसिकांना अनुभवयास मिळाला. सकाळच्या प्रसन्न प्रहरी शास्त्रीय गायन आणि वादनाच्या सुरेल मैफलीत रसिक पुरते न्हाऊन गेले.
दत्ताभैय्या स्मृतिप्रीत्यर्थ ही संगीत सभा आयोजित करण्यात आली होती. शास्त्रीय संगीताचा स्वत:चा एक वेगळाच लहेजा असतो आणि हा आगळावेगळा लहेजा रसिकांना क्या बात है म्हणायला भाग पाडतो. या कार्यक्रमातही रसिक कधी हाताने दाद देत होते तर कधी मानेने. कलेची ताकद म्हणजे उत्तम रसिक असतात याचा अनुभवही क्षणोक्षणी येत होता. पहिल्या सत्रात अनंत जोशी यांच्या संवादिनी वादनाच्या सुरांनी रसिकांना मंत्रमुग्ध केले. अनंत जोशी यांनी संवादिनीवर राग ललत आणि शुद्ध धैवत या रागाचे सादरीकरण केले. तर, उत्पल दत्त यांनी झुमरा आणि दृत तीन या तालाचे सादरीकरण केले. ‘माने नही सैय्या’ ही ठुमरीदेखील संवादिनीवर सादर झाली. संवादिनीवर वाजवलेल्या स्वरांनी सभागृहातील वातावरणात चैतन्य निर्माण झाले होते. आपल्या वादनाची कला त्यांनी त्यांचा बोटावर लीलया पेलली होती तर उत्पल दत्त यांनी त्यांना तबल्यावर साथ देऊन तालाचेही स्थान सुरांइतकेच पक्केआहे हे दाखवून दिले.
अशा प्रकारे सूर-ताल एकमेकांना मिळाल्यानंतर सुंदर गळा असलेला कलाकार कधीच मागे राहत नाही. दुसऱ्या सत्रात ओमकार दादरकर यांनी शास्त्रीय गायनाने मैफलीत सुरांचे आगळे रंग भरले. शास्त्रीय संगीताला अनेक वर्षांचा इतिहास आहे. सात स्वरातून अनेक रागांची निर्मिती झाली आहे. यातच जेव्हा गायक एखादा राग गातो, तेव्हा त्या रागाला योग्य न्याय देण्यासाठी तो जीव तोडून सराव करतो. याचा अनुभव ओमकार दादरकर यांच्या गायनातून होता. सुगम संगीत ऐकताना शब्दांना सुरांची साथ असते. मात्र शास्त्रीय संगीतात शब्दांपेक्षा सुरांना अधिक महत्त्व असते. यावेळी त्यांनी शुद्ध सारंग रागातील ‘धिन धिन आनंद गगन’ हे गाणे सादर केले तर पटदीप नावाची बंदिशही त्यांनी सादर केली. संत मीराबाईंनी कृष्णभक्तीविषयी लिहिलेल्या रचना सर्वज्ञात आहेत. मात्र ओमकार दादरकर यांनी मैफलीच्या अखेरीस मीराबाईंचे रामाविषयीचे ‘मेरो मन राम ही राम भजते रहे’ हे गाणे सादर केले. सकाळच्या प्रहरी संगीताचे स्वर कानी पडले की दिवस आनंदात जातो. रविवारच्या सकाळच्या या मैफलीत उपस्थित असलेल्या ठाणेकर रसिकांना असे कार्यक्रम वारंवार व्हावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली.
भाग्यश्री प्रधान