राधा आणि मीरेच्या कृष्णप्रेमाची सुरेल गाथा सांगणारा पं. हेमंत पेंडसे यांनी स्वरबद्ध केलेल्या सुरेल अशा कार्यक्रमाची मेजवानी ठाणेकरांना शनिवारी अनुभवता आली. संत मीराबाई यांच्या भक्तिपर रचना आणि डॉ. राहुल देशपांडे यांच्या राधेवरील रचनांचे सादरीकरण करण्यात आले. ‘एक राधा.. एक मीरा’ या कार्यक्रमात शास्त्रीय संगीतातील वेगवेगळ्या रागांची रूपे उलगडून दाखवण्यात आली.
हेमंत पेंडसे यांच्या ‘मनहर संगीत सभा’ आणि अमित मेनन यांच्या ‘आविष्कार एंटरटेनमेंट्स’ यांच्या वतीने ठाण्यातील सहयोग मंदिर येथे हा कार्यक्रम झाला. यमन रागातील  ‘मन रे परसी’ या मीरेच्या भजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर ‘बसो मोरे नैनन में’, ‘यदुवर लागत’, ‘मैं गिरिधर के घर जाऊँ ’ हे जनसंमोहिनी रागातील मीरेचे भजन, ‘बदरा रे तू जल भरले’, अशी भक्तिरसातील गाणी पेंडसे, प्रज्ञा देशपांडे आणि राधिका ताम्हणकर यांनी सादर केली. कोमल आणि शुद्ध धैवतातील ‘रंग रंग रंगिली’ हे गाणे सादर करण्यात आले. चारुकेशी रागातील ‘नींद नहीं आवे जी’ या राधिका ताम्हणकर यांनी सादर केलेल्या गाण्यात फक्त बासरीचा वापर केल्याने ही रचना कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले. कार्यक्रमाच्या उत्तरार्धाच्या सुरुवातीलाच ‘रंग बावरी’ या पाश्चिमात्य शास्त्रीय संगीताचा बाज असलेल्या गाण्याने कार्यक्रमाची रंगत वाढली. पेंडसे यांनी सादर केलेले ‘झुल झुलत राधा संग’ रसिकांची दाद मिळवून गेले. मुग्धा रिसबूड यांनी कार्यक्रमाचे निवेदन केले. उदय कुलकर्णी यांनी संवादिनीची तर अभिजित बारटक्के यांनी तबल्यावर साथ दिली. साइड हिृदमवर आदित्य आपटे, तर पखवाजाची साथ उद्धव गोळेंनी केली. अमित काकडे यांनी बासरीवर साथ दिली.