आनंद दिघेंची शिवसेना आता स्वार्थी लोकांची झाली आहे, अशी घणाघाती टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. ठाण्यातील पाचपाखाडीतील बूथ कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेला लक्ष्य केले. ‘महापालिका म्हणजे दुकान असल्याच्या मानसिकतेतून कारभार चालतो. महापालिका दुकान म्हणून चालवल्यास कधीच कुणालाही न्याय मिळणार नाही,’ अशा शब्दांमध्ये मुख्यमंत्र्यांनी हल्लाबोल केला.

‘ठाण्यात शिवसेनेच्या नेत्यांनी घरातच तिकीट वाटप केले. उद्धव ठाकरेंच्या सभा कोणत्या नातेवाईकांकडे होतील, यावरुनही भांडणे झाली. एकनाथ शिंदे, प्रताप सरनाईक यांच्यासह अनेकांनी स्वत:च्या घरातच तिकीटे दिली. त्यांच्यासाठी महापालिका म्हणजे सोन्याचे अंडे देणारी कोंबडी आहे. तर आमच्यासाठी सत्ता हे साधन नाही, तर साध्य आहे,’ अशा शब्दांमध्ये मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेच्या स्थानिक नेतृत्त्वावर तोफ डागली.

‘लोकशाहीच्या मंदिराचे पावित्र्य राखा. लोक भ्रष्टाचाराला वैतागले आहेत. आता परिवर्तन करुन दाखवा. प्रत्येक घर पिंजून काढा. प्रत्येक घरात पोहोचा. आपले किल्ले म्हणजे बूथ आणि बुथच्या सेनापतीने बूथ लढवायचा. आता वेळ बोलायची नाही. छत्रपतींचे नाव घ्या आणि मैदानात जा. विजय तुमचाच आहे,’ अशा शब्दांमध्ये मुख्यमंत्र्यांनी बूथ कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.

‘आनंद दिघे यांची सेना आता स्वार्थी लोकांची झाली आहे. कल्याणकारी राज्य म्हणजे स्वत:चे कल्याण नव्हे, समाजाचे कल्याण करणारे राज्य असते. आम्हाला ‘सामना’वर बंदी नको आहे. आम्ही त्यांनी केलेल्या चुकांबद्दल जाब विचारला आहे. ठाणे जिल्हा भारतीय जनता पक्ष आणि जनसंघाचा होता. युती तोडली पाहिजे, हे कार्यकर्त्यांपेक्षा ठाण्यातील लोकांनी मला मेसेज करुन सांगितले,’ असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेला लक्ष्य केले.