रेल्वे स्थानकांतील समस्या व त्यामुळे घडणाऱ्या घटनांनी रौद्ररूप धारण केले असले तरी त्याबाबत उमटणाऱ्या पडसादांची कितपत दखल घेतली जाते, हा प्रश्न प्रशासनाला वारंवार विचारावा लागतोच. सध्या हा प्रश्न नायगावकरांना फार प्रखरतेने भेडसावतोय. स्थानकात इतर समस्या ठाण मांडून बसल्या असताना सकाळी विरारवरून चर्चगेटला जाणाऱ्या लोकलमध्ये व संध्याकाळी चर्चगेटहून विरारला जाणाऱ्या लोकलमध्ये प्रवाशांना चढू दिले जात नाही. दररोज हा अन्याय सहन करताना लोकल रद्द झाल्याची घोषणा झाल्यावर वैतागलेल्या प्रवाशांच्या सहनशक्तीचा कडेलोट होतो.

पश्चिम रेल्वेवरील विरार लोकलच्या गर्दीत मोठय़ा प्रमाणावर प्रवाशांची भर टाकणारे स्थानक म्हणून नायगाव स्थानक नावारूपाला येत आहे. पूर्वी येथे प्रवाशांची संख्या जास्त नव्हती, पण शहरातील काँक्रीटीकरणामुळे येथून रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढली. वसईपेक्षा सोयीचे स्थानक म्हणून गर्दीचा ओढा नायगाव स्थानकाच्या दिशेने आणखीच वाढला. खरतंर वाढती गर्दी आणि समस्या पाहता प्रशासनाने त्याप्रकराच्या सुविधा उपलब्ध करणे गरजेचे होते परंतु, याकडे सपशेल कानाडोळा करण्यात आला.

megablock
रेल्वेचा मेगाब्लॉक! पुणे – लोणावळा दरम्यान अनेक गाड्या रद्द, काही उशिराने धावणार
pune marathi news, pune daund local train marathi news
पुणे-दौंड रेल्वे प्रवाशांची अडथळ्यांची शर्यत! रेल्वे प्रशासनाकडून निर्णय होईना
Ajni Chowk
नागपूर : पाच रस्ते, मेट्रोस्थानकामुळे अजनी चौक ‘अपघातप्रवण’! नीरीच्या नियोजित जागेवर मेट्रो स्थानक न बांधल्याचा फटका
Overcrowding on footbridges at Thane station
ठाणे स्थानकातील पादचारी पुलांवर गर्दीचा महापूर

रोज कार्यालयांमध्ये पोहोचण्याच्या घाईत असलेल्या प्रवाशांना दररोज येथे ‘डोर पॅक’ अर्थात गर्दीने होणाऱ्या प्रवेशबंदीचा अनुभव येतो. त्यातच शनिवारी ७ ऑक्टोबरला वसईहून सुटणारी ७.५०ची अंधेरी लोकल रद्द झाली. गर्दीमध्ये चढू न दिल्याने एकापाठोपाठ एक डोळ्यांसमोरून जाणाऱ्या गाडय़ा, हताश होऊन करावी लागणारी पुढच्या लोकलची प्रतीक्षा या परिस्थीतीत लोकल रद्द झाल्यामुळे प्रवाशांच्या रागाचा पारा टिपेला पोहोचलेला. प्रवाशांनी तब्बल दीड तास रेल रोको करत त्यांच्यावरील अन्यायाला वाचा फोडली. त्यामुळे पुढील ६० लोकल रद्द झाल्या.

विरारहून सुटणाऱ्या लोकलमध्ये चढू दिले जात नसल्याने वसईहून सुटणारी ही लोकल वसई आणि नायगाव प्रवाशांसाठी जणू हक्काची लोकल असते. हीच लोकल नेमकी रद्द झाल्यावर प्रवाशांनी ठिय्या दिला. प्रवासी रुळांवर आडवे झोपले. एकंदरीतच वातावरणातील तणावाचा उद्रेक विरार, वसईच्या प्रवाशांवरही झाला. त्या प्रवाशांना मार खावा लागला. यामध्ये रेल्वेचेही नुकसान झाले.

खरं तर नायगावमधील रेल्वे प्रवाशांच्या समस्यांना रेल्वे स्थानकाबाहेरूनच सुरुवात होते. दुचाकी पार्क करायला जागा शोधताना प्रवाशांच्या नाकीनऊ येतात. हा त्रास सहन करत प्लॅटफॉर्मपर्यंत पोहोचणे ही नायगावकरांसाठी अडथळ्यांची शर्यत असते. या समस्या वारंवार मांडूनही रेल्वे प्रशासनाकडून काहीच पावले उचलली जात नसल्याने प्रवाशांच्या संतापाला प्रशासनाला सामोरे जावे लागले.

लोकलमध्ये चढायला न मिळणे ही आजच्या घडीला नायगावकरांची सर्वात मोठी समस्या आहे. अडथळ्यांची शर्यत पार केल्यावर गर्दीत चढण्याची कसरत करण्यासाठी प्रवासी सज्ज असतात, पण दरवाजाच्या दोन्ही बाजूने प्रवासी उभे असल्याने आतमध्ये शिरकाव करणे शक्यच नसते. हे दरवाज्यात उभे असलेले प्रवासी एखाद्या तटबंदीप्रमाणे घट्ट पाय रोवून उभे असतात. त्यांना छेदून अथवा आजूबाजूने वाट काढून जाणे हे एक आव्हान असते. मुख्यत: महिलांसाठी राखीव डब्यात एखादी लढवय्यी आत शिरलीच तर टोमणे, ठोकर, शेरे यांचा सामना करावाच लागतो.

नायगावकरांच्या मागण्या

* विरार-चर्चगेट लोकलमध्ये नायगावकरांना जो प्रवेश नाकारला जातो त्यावर कारवाई करण्यात यावी अशी मुख्य मागणी यानिमित्ताने समोर आली आहे.

* वसई येथून जशा विशेष लोकल निघतात तशा दोन लोकल नायगाव येथून सकाळच्या वेळेत सुरू करण्यात याव्यात.

* कार्यालयीन वेळेत लोकलमध्ये प्रवेश मिळण्यासाठी रेल्वे प्रशासनाने स्थानकावर एक तरी पोलीस कर्मचारी उभा करून ठेवावा.

* कोणत्याही लोकल रद्द करण्याअगोदर किंवा त्याचा ट्रॅक बदलण्याअगोदर त्याची पूर्वसूचना रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना १०-१५ मिनिटे अगोदर द्यावी.

* शनिवारी आणि रविवारी रद्द करण्यात येणारी ७.५०ची अंधेरी जलद लोकल सातही दिवस सुरू ठेवण्यात यावी.

* तसेच सकाळच्या वेळी वसई स्थानकांतून सुटणाऱ्या लोकलच्या संख्येत वाढ करण्यात यावी.

* विरार व डहाणू येथून सुटणाऱ्या १५ डब्यांच्या लोकलना नायगाव रेल्वे स्थानकात थांबा देण्यात यावा, अशा मागण्या प्रवाशांनी केल्या आहेत.

* याशिवाय नायगाव पूर्व व पश्चिमेकडील तिकीट खिडक्यांच्या संख्येत वाढ करावी आणि त्या पूर्ण वेळ सुरू ठेवाव्यात.

* नायगाव रेल्वे स्थानकात स्वच्छतागृहांची व पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात यावी.

*  फूट ओव्हर ब्रिजची रुंदी वाढवावी तसेच नायगाव येथील सबवेमध्ये विजेचे दिवे आणि सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात यावेत या मागण्याही करण्यात आल्या आहेत.

’ स्थानकात येताना उद्भवणाऱ्या समस्यांपैकी मुख्य समस्या म्हणजे येथील रिक्षाचालकांना रिक्षास्थळाची व्यवस्था नाही. त्यामुळे तीदेखील व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणी प्रवाशांनी केली आहे. या समस्या दूर न झाल्यास याहून उग्र प्रवाशाच्या रोषास सामोरे जावे लागेल यात काही शंकाच नाही.