नियोजनशून्य कारभारामुळे बदनामीच्या गर्तेत सापडलेल्या ठाणे महापालिका परिवहन उपक्रमाच्या दैनंदिन कामकाजावर लक्ष ठेवण्यासाठी आता नवी मुंबईच्या धर्तीवर संगणकीय प्रणालीचा अवलंब केला जाणार आहे. या निर्णयामुळे टीएमटीच्या दैनंदिन कामाकाजाचे नियोजन करणे आणि त्यावर देखरेख ठेवणे सहज शक्य होणार आहे. तसेच कामचुकार कर्मचाऱ्यांना शिस्त लागण्यास मदत होणार आहे, असा दावा महापालिकेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने केला आहे. प्रवाशांसाठी सोडल्या जाणाऱ्या बसगाडय़ांचे नियोजन, दुरुस्तीचा आढावा यापुढे संगणकीय प्रणालीद्वारे घेतला जाणार आहे. त्यामुळे उपक्रमातील सावळागोंधळ कमी होईल, असा दावा केला जात आहे.
ठाणे, कळवा तसेच मुंब्रा या शहरात दळणवळणाच्या दृष्टिकोनातून पुरेशी प्रवासी सेवा पुरविण्यात टीएमटी सातत्याने अपयशी ठरत असल्याचे चित्र आहे. टीएमटी प्रशासनावर सातत्याने टीका होऊ लागली आहे. टीएमटीला वर्षांला ४० कोटींचा तोटा होत असल्याची बाब समोर आली आहे. आर्थिक संकटात असल्यामुळे टीएमटीला प्रवासी सेवेचा दर्जा सुधारण्यात अनेक अडचणींचा समाना करावा लागत असल्याचे चित्र आहे. तसेच प्रवासी सेवा पुरविण्यात सक्षम नसल्यामुळे टीएमटीच्या कारभाराविषयी ठाणेकर फारसे समाधानी नाहीत. नेमकी हीच बाब लक्षात घेऊन महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी टीएमटीचा कारभार तसेच प्रवासी सेवा सुधारण्यावर अधिक भर देण्यास सुरुवात केली आहे.
टीएमटीच्या ताफ्यात बसेसचा आकडा कमी असल्यामुळे प्रवासी सेवा पुरविणे शक्य होत नाही. त्यामुळे आयुक्त जयस्वाल यांनी जेएनएनआरयूएम उपक्रमांतर्गत मंजुरी मिळालेल्या १९० पैकी ७० बसेस ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस प्रवासी सेवेसाठी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. सद्य:स्थिती टीएमटीच्या कार्यशाळा तसेच अन्य विभागांतील दैनंदिन कामकाजाचे शास्त्रीय पद्घतीने मोजमाप होत नाही. तसेच कर्मचाऱ्यांची जबाबदारी, दिवसभरात किती काम करायचे आणि बसेसच्या दुरुस्तीसाठी यंत्रसामुग्री आहे का, याचीही ठोस मोजमाप करणारी यंत्रणा उपलब्ध नाही. ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुनील चव्हाण यांनी मध्यंतरी टीएमटीच्या वागळे आगारात पहाटेच्या सुमारास अचानकपणे धाड टाकली. त्या वेळी या सर्व बाबी समोर आल्या होत्या. या पाश्र्वभूमीवर टीएमटीच्या कारभाराला शिस्त लावण्यासाठी तसेच नियोजनबद्ध करण्यासाठी महापालिका प्रशासनाने जोरदार हालचाली सुरू केल्या असून त्यासाठी टीएमटीच्या दैनंदिन कामकाजाचे संगणकीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

नवी मुंबईच्या धर्तीवर संगणक प्रणाली
टीएमटीच्या कार्यशाळेतील तसेच दैनंदिन कामकाजाचे नियोजन व्हावे तसेच त्या कामकाजावर देखरेख राहावी, यासाठी टीएमटीचे कामकाजाचे संगणकीकरण करण्यात येणार आहे. त्यासाठी नवी मुंबईच्या धर्तीवर टीएमटीमध्ये एक संगणक प्रणाली वापरण्यात येणार आहे. या प्रणालीच्या आधारे कार्यशाळा तसेच अन्य विभागांच्या कामकाजाचे दैनंदिन मोजमाप केले जाणार आहे. एखाद्या चालकाने वाहनातील समस्येसंबंधी कार्यशाळेकडे माहिती नोंदविल्यानंतर त्या वाहनाच्या दुरुस्तीची जबाबदारी ठरावीक कर्मचाऱ्यांवर निश्चित करण्यात येईल. या नव्या कामकाजानुसार एक मॅकेनिक आणि हेल्परला दिवसभरात दोन मोठे आणि दोन छोटे अशा प्रकारची कामे पूर्ण करावी लागणार आहेत. तसेच ही कामे पूर्ण केली नाही तर त्याचे उत्तरही द्यावे लागणार आहे, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त सुनील चव्हाण यांनी दिली.