डोंबिवलीतील महिला प्रवाशांची संतप्त प्रतिक्रिया; भावेश नकातेला प्रवाशांकडून आदरांजली

देश सोडून जाण्याबाबत प्रसिद्ध अभिनेता आमीर खान याने केलेल्या वक्तव्यावरून वादंग निर्माण झाले असतानाच नेमक्या याच शब्दांत डोंबिवलीतील रेल्वे प्रवाशांनी मंगळवारी आपली उद्विग्नता व्यक्त केली. भरगच्च लोकलमधून पडून मृत्युमुखी पडलेल्या भावेश नकाते या तरुणाला श्रद्धांजली वाहण्यासाठी जमलेल्या प्रवाशांनी रेल्वे प्रशासनावर जोरदार हल्लाबोल केला. ‘लोकलमधून प्रवास करणे इतके असुरक्षित बनले आहे की, सकाळी घराबाहेर पडलेली व्यक्ती सुखरूप घरी पोहोचेल, याची शाश्वती नाही. आमची मुले दहा वर्षांनंतर मोठी होतील, तेव्हा त्यांना असाच त्रास सोसावा लागेल, अशी भीती वाटते. त्यामुळे देश सोडून जाण्याचा विचार आमच्याही मनात येतो,’ अशा शब्दांत या ठिकाणी जमलेल्या महिला प्रवाशांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
मध्य रेल्वेच्या उपनगरीय गाडीतून प्रवास करणाऱ्या डोंबिवलीच्या भावेश नकातेचा गाडीतून पडून मृत्यू झाल्यानंतर रेल्वेप्रवाशांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. भावेशला श्रद्धांजली वाहण्यासाठी मंगळवारी सकाळी डोंबिवली स्थानकाबाहेर एका सभेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी प्रवासी संघटनांचे पदाधिकारी आणि प्रवाशांनी काळ्या फिती लावून निषेध व्यक्त केला. त्याच वेळी ‘गाडीच्या दरवाजातून प्रवास करू नका,’ अशी सूचना देण्यापेक्षा रेल्वे प्रशासनाने दारात उभ्या असलेल्या प्रवाशांच्या टोळक्यांवर कारवाई करावी, अशी मागणी या वेळी करण्यात आली. भावेशला श्रद्धांजली वाहण्यासाठी थेट वाशीहून डोंबिवलीत आलेल्या अनुष्का शिंपी या महिलेने तर नियोजनाचा विचका झालेल्या शहरांमध्ये का राहावे, असा सवाल केला.
या वेळी भावेशची मित्रमंडळी मोठय़ा संख्येने जमली होती. ‘भावेशच्या अखेरच्या धडपडीची चित्रफीत काढण्यापेक्षा इतरांना त्याला मदतीचा हात देण्यास सांगितले असते तर, एक जीव वाचला असता,’ अशी प्रतिक्रिया भावेशच्या एका मित्राने दिली. रेल्वेमधून प्रवास करणाऱ्या टोळक्यांचे प्रस्त सध्या खूप वाढले असून दादागिरी दिवसेंदिवस वाढत आहे. दारात उभे राहून इतर प्रवाशांना लोकलमध्ये चढू द्यायचे नाही हे प्रकार तर नित्याचे झाले आहेत. हे थांबविण्यासाठी प्रयत्न करा, तीच भावेशला खरी श्रद्धांजली ठरेल, अशी भावना संदीप दाभाडे व अनिकेत घडची यांनी व्यक्त केली. या वेळी उपनगरीय रेल्वे प्रवासी एकता संस्था, दिवा रेल्वे प्रवासी संस्था, ठाणे रेल्वे प्रवासी संस्था, वांगणी रेल्वे प्रवासी संस्था, कल्याण कसारा, खोपोली, कर्जत, अंबरनाथ आदी रेल्वे प्रवासी संघटनांचे नंदकुमार देशमुख, लता अरगडे, अनिता झोपे, राजेश घनघाव उपस्थित होते.