स्थायी समिती सदस्यपदासाठी खेळी; शिवसेनेचे संख्याबळ नऊवर जाणार?

ठाणे महापालिकेतील स्थायी समितीत वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी भाजपसोबत जवळीक करण्याऐवजी कॉँग्रेसच्या चार नगरसेवकांची मदत घेण्याचा निर्णय शिवसेनेच्या गोटात जवळपास पक्का झाला आहे. कॉँग्रेसचे तीन आणि एक अपक्ष अशा चार नगरसेवकांचा कोकण आयुक्तांकडे स्वतंत्र गट स्थापन झाला असून मंगळवारी या गटाकडून शिवसेनेला पाठिंबा जाहीर होण्याची शक्यता आहे. असे झाल्यास स्थायी समितीत शिवसेनेचे संख्याबळ नऊ होऊ शकेल.

स्थायी समितीत शिवसेना आणि विरोधी पक्षांचे संख्याबळ समान होत असल्याने सभापतीची निवड चिठ्ठीवर होऊ नये यासाठी शिवसेनेने कॉँग्रेसच्या तिघा नगरसेवकांवर गळ टाकल्याची चर्चा रंगली आहे.

ठाणे महापालिका निवडणुकीत शिवसेनेचे ६७, राष्ट्रवादीचे ३४, भाजपचे २३, काँग्रेसचे तीन आणि इतर चार नगरसेवक निवडून आले आहेत. आठ नगरसेवकांमागे एक सदस्य अशा पद्घतीने १६ सदस्य स्थायी समितीमध्ये पाठविले जातात आणि त्यामधून सभापती पदाची निवड केली जाते. महापालिकेतील नगरसेवकांच्या संख्याबळानुसार स्थायी समितीमध्ये शिवसेनेचे आठ, राष्ट्रवादीचे चार, भाजपचे तीन सदस्य निवडून जाणार आहेत. तसेच काँग्रेसचे तीन आणि इतर चार नगरसेवक यांना राष्ट्रवादीची साथ मिळाली तर त्यांचा एक सदस्य निवडून येऊ शकतो. त्यामुळे स्थायी समितीमधील सदस्यांचे संख्याबळ समसमान होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

कॉँग्रेसचे तीन आणि एक अपक्ष असा चार नगरसेवकांचा गट विरोधी पक्षांच्या गळाला लागू नये असे प्रयत्न सेनेच्या गोटात सुरु झाले आहे. पालिकेची तिजोरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्थायी समितीवर निर्विवाद वर्चस्व मिळवायचे असेल तर सेनेला नऊ सदस्यांचे गणित जुळवावे लागणार आहे. पालिका निवडणुकीचा निकाल लागताच कॉँग्रेसचे वर्तकनगर भागातील नगरसेवक विक्रांत चव्हाण यांच्याशी सेनेच्या नेत्यांनी संपर्क साधला होता. स्थायी समितीत सेनेला काँग्रेसने मदत केली तर शिवसेनेला स्थायी समिती काबीज करणे सोपे जाणार आहे. तसेच या निवडणुकीतील मदतीच्या बदल्यात काँग्रेसला स्थायी समिती सदस्यपद देण्याचा प्रस्तावही ठेवण्यात आल्याचे सांगितले जाते. मुंब््रयातून कॉँग्रेसच्या तिकिटावर निवडून आलेले यासीन कुरेशी यांचा गटाचा राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यासोबत जवळीक करण्यास विरोध आहे. त्यामुळे कॉँग्रेसचा हा गट मंगळवारी शिवसेनेला पाठिंबा जाहीर करण्याची शक्यता असून सोमवारी दिवसभर शिवसेना नेत्यांची कॉँग्रेस नगरसेवकांसोबत चर्चा सुरू होती.