सूत्रधार अद्याप फरार; भाजपच्या शहर उपाध्यक्षाचे हत्याप्रकरणात नाव पुढे

भिवंडीतील काँग्रेस नेते मनोज म्हात्रे यांच्या हत्येप्रकरणातील दोन मारेकऱ्यांना नारपोली पोलिसांनी शनिवारी मुंबईतून अटक केली. भिवंडी शहरातील भाजपचा उपाध्यक्ष प्रशांत भास्कर म्हात्रे याचे या प्रकरणात नाव पुढे आले असून तो मात्र अजूनही पोलिसांना सापडलेला नाही.

मनोज म्हात्रे यांची गेल्या आठवडय़ात निर्घृणपणे हत्या करण्यात आली. याप्रकरणी नारपोली पोलीस ठाण्यात सात जणांविरोधात गुन्हा दाखल केला होता. त्यामध्ये मनोज यांचे चुलत बंधू प्रशांत म्हात्रे याचा समावेश होता. या घटनेनंतर सातही जण फरार झाले आहेत. प्रशांत म्हात्रे हा शहरातील भाजपचा उपाध्यक्ष आहे. त्यामुळे मुंबई आणि ठाणे महापालिका निवडणुकीच्या प्रचारात शिवसेना आणि काँग्रेस हे दोन्ही पक्ष या हत्येप्रकरणावरून भाजपावर टीका करीत आहेत. तसेच या मुद्दय़ावरून शिवसेना आणि काँग्रेस भाजपची कोंडी करण्याचा प्रयत्न करीत आहेत.

मारेकऱ्यांचा मुंबई, उत्तर प्रदेश टोळीशी संबंध

प्रशांत म्हात्रे याच्यासह पाच आरोपी फरार असून त्यांचा शोध सुरू आहे, अशी माहिती भिवंडीचे पोलीस उपायुक्त मनोज पाटील यांनी दिली. यातील मारेकऱ्यांचे मुंबई किंवा उत्तर प्रदेशातील टोळीशी संबंध असावा, असा संशयही त्यांनी व्यक्त केला आहे.