tv05
उद्योग व्यवसाय हा कोणत्याही शहराचा प्राण असतो. त्यामुळेच शहरे वाढतात, भरभराटीला येतात. उद्योग नसते तर गावातील जनता शहरात स्थलांतरित झालीच नसती. ठाणे जिल्ह्य़ातील खाडीपलीकडचे भिवंडी हे असेच एक उद्योगी शहर. यंत्रमाग उद्योग हा या शहराचा प्राण. अगदी स्वातंत्र्यपूर्व काळापासून भिवंडीत यंत्रमाग आहेत. त्यात मोठय़ा प्रमाणात रोजगार मिळत असल्याने देशातील अनेक भागांतून येथे कामगार येतात. कामाचे ठिकाण हेच त्यांचे विश्व असते. दरम्यानच्या काळात राज्यातील औद्योगिक विश्वात मोठे फेरबदल झाले. जुने उद्योग कालबाह्य़ होऊन त्या ठिकाणी नवे उद्योग आले. भिवंडीतील हे यंत्रमाग मात्र ‘धागा धागा अखंड विणू या’ चा मंत्रघोष करीत अजूनही बदलत्या काळाशी दोन हात करीत आहेत..