विमा कंपनीचा दावा न्यायालयाने फेटाळला
विटांसाठी लागणारी माती ट्रकमध्ये भरण्याचे काम करणाऱ्या भाऊ बारकू मुकणे (२५) या तरुणाचा पाच वर्षांपूर्वी मुरबाड तालुक्यातील मोहघर गावाजवळ मातीचा ट्रक उलटून अपघात झाला होता. घरातील कर्ती व्यक्ती मरण पावल्याने भाऊचे अवलंबित असलेले कुटुंब उघडय़ावर आले होते. या कुटुंबीयांनी ट्रक मालक व विमा कंपनीकडून नुकसान भरपाई मिळण्यासाठी कल्याण न्यायालयात दावा दाखल केला होता. कल्याण सत्र न्यायालयाचे जिल्हा न्यायाधीश एस. बी. गायधनी यांनी हा दावा मान्य करून, मजूर मुकणे कुटुंबीयांना ९ लाख ८९ हजार रुपये देण्याचा आदेश ट्रक मालक आणि विमा कंपनीला दिला.
कोणत्याही प्रकारचा विमा नसताना एका अशिक्षित, अज्ञानी आदिवासी मजूर कुटुंबाला नुकसान भरपाई मिळण्याची ही दुर्मीळ घटना प्रथमच घडली आहे. मुरबाड तालुक्यातील म्हसा गावाजवळील मोहघर येथे भाऊ मुकणे हा पत्नी, मुलगा आणि आई वडिलांसह राहत होता. भाऊ हा गावातील नंदकुमार धर्मा भोईर यांच्या मालकीच्या मोटार ट्रिपवर विटांसाठी लागणारी माती भरण्याचे काम करीत होता. या कामाच्या बदल्यात भाऊला दर महिन्याला साडे चार हजार रुपये मजुरी मिळत होती. या मजुरीवर भाऊच्या कुटुंबाची उपजीविका चालत होती. पाच वर्षांपूर्वी मोहघर येथील मुळाचापाडा येथे भाऊने ट्रकमध्ये माती भरली. तो ट्रकमधील मातीच्या ढिगाऱ्यावर बसला होता. ट्रकचालकाने ट्रक कन्होळ मोहघर रस्त्यावर आणताच, ट्रक वेगाने चालविण्यास सुरुवात केली. ट्रक उतारावर येताच, चालकाचे नियंत्रण सुटले व ट्रक एका खोल खड्डय़ात कोसळला. ट्रकमधील ढिगाऱ्यावर बसलेला भाऊ त्या ढिगाऱ्याखाली सापडून जागीच मरण पावला.
याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली. भाऊची पत्नी अलका मुकणे (२१), मुलगा ज्ञानेश्वर (२), वडील बारकू (४४) आणि आई तारा (४२) यांनी घरातील कर्ता व्यक्ती भाऊ मरण पावल्यामुळे आपल्या कुटुंबाचा आधार गेला आहे. ऐन उमेदीत भाऊचे निधन झाल्यामुळे येत्या काळात उपजीविका कशी करायची? असा प्रश्न त्यांच्यासमोर पडला. ट्रक मालक देत नाही म्हणून मुकणे कुटुंबीयांनी नुकसान भरपाई मिळण्यासाठी अ‍ॅड. एस. पी. नलावडे यांच्यावतीने कल्याण न्यायालयात नुकसान भरपाईचा दावा दाखल केला. या प्रकरणात ट्रकचालक नंदकुमार भोईर (रा.मोहघर), मे. बजाज अलायन्झ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड यांना प्रतिवादी केले. गेली पाच वर्षे हा दावा कल्याण न्यायालयात सुरू होता. विमा कंपनीने मयत भाऊ मुकणे यांचा कोणताही विमा नाही. ते ट्रकवर नियमबाह्य़ प्रवास करीत होते, असा दावा करीत मुकणे कुटुंबीयांना नुकसान भरपाई देण्यास विरोध केला.
विमा नाकारणे अन्यायकारक!
न्या. एस. बी. गायधनी यांनी निकाल देताना, भाऊ मुकणे हा ट्रकमध्ये माती भरण्याचे काम करीत होता. तो त्या ट्रकचा एक भाग होता. ट्रक हा त्याच्या चरितार्थाचा भाग होता. या मजुरीवर त्याचे कुटुंब अवलंबून होते. मुकणे कुटुंबीय अशिक्षित आहेत, त्यांच्याकडे विमा नाही म्हणून त्यांना विमा नाकारणे हे अन्यायकारक होईल, असे मत व्यक्त करून, प्रतिवादींनी मुकणे कुटुंबीयांना ९ लाख ८० हजार रुपयांची नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले.