पावसाळ्यातील सरावासाठी लंडनहून यंत्र; एकावेळी ६० चेंडूंची क्षमता

क्रिकेटविश्वातील बदलत्या वातावरणाची दखल घेत कल्याणमधील संतोष अकादमीने खेळाडूंच्या सरावासाठी खास लंडनहून गोलंदाजी यंत्र मागविले आहे. यानिमित्ताने ठाणे जिल्ह्य़ात पहिल्यांदाच क्रिकेट सरावासाठी यंत्र वापरले जात आहे. कल्याण-डोंबिवली महापालिकेने अकादमीला सरावासाठी आधारवाडी येथे दिलेल्या भूखंडावर या यंत्राचा वापर केला जाणार असून क्रिकेटपटूंना त्याचा विनामूल्य लाभ घेता येणार आहे.

पावसाळ्यातही सरावात खंड पडू नये म्हणून या भूखंडावर एक छत उभारण्याचे काम सुरू आहे. त्यानंतर इथे हे यंत्र बसवून त्याद्वारे फलंदाजांना सराव करता येईल. सीझन तसेच डिंपल हे दोन प्रकारचे चेंडू या यंत्राद्वारे फेकता येतात. या यंत्रामध्ये एकावेळी ६० चेंडू राहू शकतात. गोलंदाजी करण्याचा वेग कमी-अधिक करण्याची सोय यंत्रात आहे. या यंत्राचे वजन ५० किलो असून ते साडेसहा फूट उंच आहे.

१० जून रोजी या यंत्राचे उद्घाटन होईल. एकावेळी एकच फलंदाज या सुविधेचा लाभ घेऊ शकेल. त्यामुळे येत्या पावसाळ्यातही खेळाडूंना सराव करता येईल, अशी माहिती अकादमीचे प्रशिक्षक संतोष पाठक यांनी या वेळी दिली.

राष्ट्रीय पातळीवर वेगवान गोलंदाजांचा सामना करण्याची वेळ फार कमी जणांवर येत असते. राष्ट्रीय पातळीवर वेगवान वेगवान गोलंदाजांसमोर खेळण्याचा उत्तम सराव झाल्यास त्याचा फायदा एखाद्या गुणवंत खेळाडूला आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळताना होईल. या यंत्राची ती खासियत आहे. पावसाळ्यात क्रिकेट बंद असते; परंतु या यंत्रामुळे अनेक फलंदाजांना अनेक धाडसी फटक्यांचा सराव करता येणार आहे.

या यंत्राची किंमत सुमारे अडीच लाख रुपये इतकी आहे. राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील क्रिकेट सामन्यांसाठी सराव करू इच्छिणाऱ्या खेळाडूंना ही सुविधा निश्चितच फायदेशीर ठरेल.

-संतोष पाठक, प्रशिक्षक