कौटुंबिक परिस्थिती चांगली असतानाही केवळ मौजमजा करण्यासाठी पुरसे पैसे मिळत नसल्याने पसिरातील बंद घरांमध्ये चोरी करणाऱ्या बहीण-भावास मुंब्रा पोलिसांनी अटक केली आहे. हे दोघेही विशीतील असून त्यांच्यासोबत सक्रिय असलेल्या एका १७ वर्षीय अल्पवयीन युवकासही अटक करण्यात आली आहे. या तिघांकडून तब्बल पावणेसहा लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

शहजाद मोहमद वकील अन्सारी ऊर्फ सोनू (२२) आणि फरिदा खातून वकील अन्सारी ऊर्फ हीना (२३) अशी या घरफोडय़ा भावंडांची नावे आहेत. यापैकी फरिदा ही मुंब्रा परिसरातील बंद घरे हेरण्याचे काम करायची व त्याची माहिती शहजादला पुरवायची. त्यानंतर शहजाद आणि त्याचा अल्पवयीन साथीदार ही घरे फोडून त्यातील सामान लंपास करायची. या तिघांनी मुंब्य्रातील एका घरातून सोन्या-चांदीचे दागिने, कपडे तसेच गिटार असा सुमारे पावणेतीन लाखांचा ऐवज चोरला होता. याच चोरीचा तपास करीत असताना मुंब्रा पोलिसांनी या घरफोडय़ांचा माग काढला.

गायीच्या मृत्युप्रकरणी मालकाविरोधात गुन्हा

ठाणे- वागळे इस्टेट येथील रामनगर भागात अविनाश यादव याचा तबेला असून त्यामधील एक गाय गेल्या आठ दिवसांपासून आजारी होती. आजारपणामुळे ही गाय निरुपयोगी झाल्याने अविनाश याने तिला चारापाणी दिला नाही तसेच तिच्यावर दवाउपचार केले नाहीत. त्याच्या निष्काळजीपणामुळे ही गाय मृत पावली. याप्रकरणी मीत आशर या युवकाने दिलेल्या तक्रारीवरून श्रीनगर पोलीस ठाण्यात अविनाश यादव याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी मालकास अद्याप अटक करण्यात आलेली नाही.

चंदनवाडीत घरफोडी

ठाणे- येथील चंदनवाडी भागातील सरोवर दर्शन इमारतीमधील एका घरात चोरी झाल्याची घटना उघडकीस आली. घरातील मंडळी गावी गेले होते. याच संधीचा फायदा घेऊन चोरटय़ांनी दरवाजाचा कडीकोयंडा तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर घरातून चांदीच्या वस्तू व रक्कम असा सुमारे २० हजारांचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

किरकोळ कारणावरून मारहाण

ठाणे- अल्पवयीन मुलीची छेड काढणाऱ्यास समज दिल्याच्या कारणावरून एका टोळक्याने मुलीच्या नातेवाईकांवर विटा तसेच बीयरच्या बाटलीने हल्ला चढविल्याची घटना कापुरबावडी भागात बुधवारी सांयकाळी घडली. या घटनेत एक जण जखमी झाला असून याप्रकरणी कापुरबावडी पोलिसांनी सहा हल्लेखोरांना ताब्यात घेतले आहे.
ठाणे येथील मनोरमानगर भागात राहणारी एक अल्पवयीन मुलगी कुटुंबासोबत गणपती विसर्जनाकरिता गेली होती. तेथून ती घरी परतत असताना अक्षय खवरे याने तिचा पाठलाग करून विनयभंग केला. त्यामुळे तिच्या एका नातेवाईकाने त्यास समज दिली. त्याचा राग आल्याने अक्षय याने त्याच्या पाच ते सहा साथीदारांना बोलावून घेतले. त्यानुसार, त्याचे साथीदार तीन मोटारसायकलवरून बायर कंपनीजवळ आले आणि त्यांनी तिच्या नातेवाईकावर विटा फेकण्यास सुरुवात केली. तसेच अक्षयने त्यांच्या डोक्यात बीयरची बाटली फोडून जखमी केले.