tvlog03महत्त्वाचा निरोप द्यायचा असेल, तर पूर्वी तार आणि दूरध्वनीचा वापर व्हायचा. मात्र जमाना जसजसा बदलत गेला, तसतशी दळणवळणाची साधनेही बदलली. आजच्या जमान्यात तार, दूरध्वनीची जागा मोबाइलने घेतली असून दळणवळणाचे उत्तम साधन म्हणून त्याच्याकडे पाहिले जाते. मात्र दहशतवादी कृत्य तसेच गुन्हेगारी क्षेत्रासाठी मोबाइलचा गैरवापर होत असल्याचे पोलिसांच्या अनेक तपासांतून समोर आले आहे. विशेषत: एखाद्या गुन्हय़ात पोलिसांचा ससेमिरा लागू नये म्हणून गुन्हेगार ‘खाचा कार्ड’चा वापर करताना दिसून येतात. बनावट किंवा दुसऱ्या व्यक्तींची कागदपत्रे देऊन मोबाइल कंपन्यांकडून हे कार्ड सुरू करण्यात येते. त्यामुळे मोबाइल वापरणाऱ्या गुन्हेगाराचा ठावठिकाणा लागत नाही. अशा गुन्हय़ांच्या तपासात पोलिसांना बरेच अडथळे येतात आणि गुन्हेगाराचा माग काढण्यासाठी कोणतेही धागेदोरे मिळत नाहीत. त्यामुळे अशा कार्डाची विक्री होऊ नये म्हणून मोबाइल कंपन्यांना काही र्निबध घालण्यात आले आहेत. असे असले तरी ‘खाचा कार्ड’च्या विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या टोळ्या आजही कार्यरत आहेत. ठाणे पोलिसांच्या मध्यवर्ती गुन्हे अन्वेषण शाखेने महिनाभरापूर्वी अशाच एका टोळीचा पर्दाफाश केला. मोबाइल कंपन्यांनी दिलेले सिमकार्ड विक्रीचे लक्ष्य पूर्ण करण्यासाठी आणि जास्त पैसे कमविण्यासाठी या टोळीचा हा काळा उद्योग सुरू होता.
ठाणे येथील सावरकरनगर भागात म्हाडाच्या मोठय़ा प्रमाणात वसाहती आहेत. या वसाहतीमधील घरकुल सोसायटीतील एका घरात अश्विन देवनाथ गुप्ता याने कार्यालय थाटले होते. मुंबईतील सांताक्रूझ भागातील कलिना परिसरात अश्विन रहात असून तो मोबाइल सिमकार्ड वितरकाचे काम करतो. या कामासाठीच त्याने कार्यालय सुरू केले होते. नवी मुंबई परिसरात राहणारा भाऊसाहेब दुशिंग हा एअरसेल कंपनीत कामाला असून तो अश्विनला मोबाइल सिमकार्ड विक्रीसाठी पुरवायचा. काही महिन्यांतच सिमकार्ड विकण्यासाठी त्यांनी नवा उद्योग सुरू केला. वास्तव्याचा कोणताही पुरावा नसलेल्या व्यक्तींनाही ते सिमकार्डची विक्री करू लागले. त्यासाठी दुसऱ्याची कागदपत्रे ते कंपनीकडे जमा करू लागले. त्यामुळे त्यांचा व्यवसाय काही महिन्यांतच तेजीत येऊ लागला. या काळ्या धंद्यातून दोघांनाही बऱ्यापैकी पैसे मिळू लागले. त्यामुळे दोघांनी मालामाल होण्यासाठी उद्योग सुरूच ठेवला.
एकीकडे मोबाइल कंपनीने दिलेले मासिक लक्ष्य पूर्ण होऊ लागले, तर दुसरीकडे या उद्योगातून बक्कळ पैसाही मिळत होता. कुणाचीही आपल्यावर नजर पडणार नाही, अशा पद्धतीने त्यांचा उद्योग सुरू होता. सर्व काही अलबेल सुरू असतानाच ठाणे मध्यवर्ती गुन्हे अन्वेषण शाखेला या उद्योगाची माहिती मिळाली. ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस उपायुक्त पराग मणेरा, वरिष्ठ पोलीस निरीक्षक देवीदास घेवारे यांच्या पथकाने कार्यालयावर छापे टाकले. या छाप्यात या दोघांच्या उद्योगाचे काळेबेरे समोर आले आणि पोलीसही चक्रावून गेले. या छाप्यात एअरसेल कंपनीचे ३२६ सिमकार्ड तसेच सिमकार्ड नसलेली १७८ रिकामी पाकिटे, वेगवेगळ्या लोकांच्या नावाने भरलेले अर्ज, विविध दुकानांच्या नावांचे बनावट रबरी शिक्के सापडले. याशिवाय, वेगवेगळे नाव व पत्ते असलेले आधारकार्ड, निवडणूक कार्ड, पासपोर्ट आणि पॅनकार्ड आदींच्या सुमारे पाचशेहून अधिक झेरॉक्स प्रती तसेच ३५० हून अधिक स्त्री व पुरुषांचे फोटो सापडले आहेत. हीच कागदपत्रे मोबाइल कंपन्यांना सादर करायचे आणि त्याआधारे सिमकार्ड संबंधित ग्राहकाला सुरू करून द्यायचे. गेल्या दोन वर्षांपासून त्यांचा हा उद्योग सुरू होता, असे तपासात पुढे आले; परंतु या दोघांकडे ही कागदपत्रे कुठून आली आणि त्यांनी आतापर्यंत कुणाला सिमकार्ड विकले, या प्रश्नांची उत्तरे अनुत्तरितच राहिली आहेत. या प्रकरणी वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या गुन्हय़ाचा पुढील तपास वर्तकनगर पोलिसांकडे सोपविण्यात आला आहे.
अशा प्रकारे बनावट कागदपत्रांनिशी मिळवलेल्या सिमकार्डचा दहशतवादी किंवा गुन्हेगारी कारवायांसाठी उपयोग केला जाण्याची शक्यता असते. त्यामुळे ठाणे पोलिसांची ही कारवाई महत्त्वपूर्ण मानली जात आहे. मोबाइल कंपनीने दिलेले मासिक लक्ष्य पूर्ण करण्यासाठी आणि झटपट व जास्त पैसा कमविण्याची लागलेली चटक दोघांनाही महागात पडली आणि दोघांनाही या प्रकरणात तुरुंगाची हवा खावी लागली.
नीलेश पानमंद