ठाणे हे सांस्कृतिक शहर असल्याने येथे कलेचे विविध प्रयोग सातत्याने होत असतात. या सांस्कृतिक शहरात ‘माझे ठाणे’ कला महोत्सवाचे आयोजन केले आहे. ठाणेकरांना तीन दिवस या कलेचा आस्वाद घेता येणार आहे.
शहरात महाराष्ट्रातील जवळजवळ ५०
चित्रकारांच्या २०० ते २५० विविध चित्रांचे प्रदर्शन तसेच वारलीकला, निसर्गचित्र, शॉर्ट फिल्म्स, कॅलिग्रॉफी वर्कशॉप, शालेय मुलांसाठी चित्रकला यांचा सहभाग असणार आहे. तसेच लहान मुलांसाठी वेगवेगळे मनोरंजक खेळ असणार आहेत. हा महोत्सव इंटरनेटच्या माध्यमातून जगातील ४६ देशांमध्ये लाइव्ह टेलिकास्ट केला जाणार आहे. सिग्नेचर आर्ट या सदराखाली ठाण्यातील कलादालनात महाराष्ट्रातील नावारूपाला आलेले सुमारे ५० कलाकार या प्रदर्शनात सहभागी होणार आहेत. २४ एप्रिल रोजी सायंकाळी ४ वाजता आमदार रामनाथ मोते यांच्या हस्ते या कार्यक्रमाची सांगता होणार असून ठाणेकरांना कलेचा संगम बघावयास मिळणार आहे.
कधी – शुक्रवार, २२ एप्रिल, वेळ – दुपारी १२ ते सायंकाळी ६.३०.
शनिवार, २३ एप्रिल, वेळ- सकाळी ९ ते सायंकाळी ७.
रविवार, २४ एप्रिल, वेळ – सकाळी ९ ते सायंकाळी ७.
कुठे – कलाभवन, ठाणे (प.) (सर्व दिवस).

तालासुरांनी भारलेली गाणी ऐकण्याची संधी
शब्द आणि सूर-तालातून व्यक्त होण्याकडे सर्वाचाच कल असतो. स्वरांची आणि शब्दांची झालेली अतूट मैत्री जपण्याचा प्रयत्न ठाण्यातील कलाकार करणार आहेत. जुन्या संगीतकारांनी आणि कवींनी शब्दबद्ध आणि संगीतबद्ध केलेली गाणी ऐकणे म्हणजे चिरतरुण झाल्यासारखे वाटते. या गाण्यांची पर्वणी ऐकण्याची संधी प्रवीण शृंगारपुरे यांनी दिली. त्यांच्या संकल्पनेतून भारलेल्या या ‘स्वरांनी भारलेला जन्म हा’ या कार्यक्रमाची निर्मिती झाली. सुधीर फडके, श्रीनिवास खळे, वसंत पवार, वसंत देसाई आदी कलाकारांचे आविष्कार आपणास अनुभवायला मिळणार असून स्वरांना आणखी साज देण्याचे काम गायक कलाकार प्रणिता दासगुप्ता- देशपांडे, नीलिमा गोखले, मंदार आपटे, वीणा दीक्षित, प्रवीण शृंगारपुरे आदी कलाकार करणार आहेत. या कार्यक्रमाचे संगीत संयोजन प्रशांत ललित यांनी केले असून दीप्ती भागवत निवेदन करणार आहेत.
कधी : शनिवार, २३ एप्रिल रोजी, वेळ- रात्री ८.३० वाजता.
कुठे : गडकरी रंगायतन, ठाणे (प.)

Raj Thackerey teaser
VIDEO : राज ठाकरे- अमित शाह यांच्या बैठकीत काय ठरलं? शिवतीर्थवरून मिळणार उत्तर, पाहा पाडवा मेळाव्याचा टीझर!
navi mumbai municipal administration playing hide and seek with tenders amount
कामांच्या निविदा रकमांबाबत लपवाछपवी; नवी मुंबई शहरातील ठेकेदार महापालिका प्रशासनाच्या संगनमताची शंका
viva
सफरनामा: होली खेले मसाने में..
religious activities by bjp workers for victory of lok sabha candidate sudhir mungantwar
चंद्रपूर : विजयासाठी धार्मिक उपक्रमांच्या माध्यमातून देवालाच साकडे!

छायाचित्रांद्वारे खाडीसौंदर्याचे दर्शन
खाडीतील प्रदूषण, रेती माफियागिरी या गोष्टींबद्दलच्या चर्चाच अधिक ऐकल्या जातात. मात्र त्याव्यतिरिक्तही ‘खाडी’मध्ये अनेक गोष्टी पाहण्याजोग्या आहेत. खाडीतले हे सौंदर्य छायाचित्रकार त्यांच्या नजरेने टिपतात. ठाण्यातील काही छायाचित्रकारांनी मिळून खाडीतील नैसर्गिक संपत्तीचे चित्रण करून ठाणेकरांसाठी खास खाडीदर्शन आयोजित केले आहे. खाडीचे सौंदर्य टिकून राहावे व त्याबाबतीत लोकांमध्ये जागरूकता निर्माण व्हावी, यासाठी पर्यावरण दक्षता मंचतर्फे ठाणे खाडीतील जैवविविधतेचे दर्शन घडविणाऱ्या छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. येथील पक्षी, मासे, कीटक, फुलपाखरे, साप, प्राणी व इतर जैवविविधतेचे दर्शन या छायाचित्रांच्या माध्यमातून ठाणेकरांना घडणार आहे.
कधी – २२ ते २४ एप्रिल, वेळ – सायंकाळी ५ ते रात्री ८.
कुठे – ठाणे कलाभवन, कापुरबावडी नाका, बिग बाजारजवळ, ठाणे (प.).

घरच्या घरी चटपटीत
झटपट तयार करता येण्याजोग्या आणि जिभेचे चोचले पुरवणाऱ्या पदार्थाच्या शोधात खवय्ये नेहमीच असतात. जेवणापेक्षाही काही चटपटीत चाट खाण्याकडे अनेकांचा कल असतो. नवनवीन पदार्थ खाण्याची ज्या खवय्यांना आवड असते, अशा व्यक्ती नवनवीन पदार्थ बनवण्याच्या पाककृतीसुद्धा उत्सुकतेने शिकतात. घरच्या घरी हे चटपटीत चाट पदार्थ बनवता यावेत, अशी इच्छा असणाऱ्यांसाठी येत्या बुधवारी चांगली संधी आहे. कोरम मॉलतर्फे बुधवार, २७ एप्रिल रोजी या संदर्भात एक खास कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. त्यात पनीर टिक्का, काजू बेबी पोटॅटोज, पनीर सिक्स्टी फाय, खिमा बॉम्ब असे पदार्थ शिकण्याची संधी मिळणार आहे.
कधी – बुधवार, २७ एप्रिल, वेळ : दुपारी ३ ते रात्री ८.
कुठे – कोरम मॉल, मंगल पांडे मार्ग, पूर्व द्रुतगती मार्गाजवळ, ठाणे (प.).

उत्सव खरेदीचा
खरेदी करणे स्त्रियांचा जणू काही जन्मसिद्ध हक्कच असतो. त्यामध्येही जर एकाच छताखाली अनेक गोष्टी उपलब्ध असतील तर सोन्याहून पिवळे. ठाण्यामध्ये महाराष्ट्र व्यापारी पेठतर्फे भव्य ग्राहक पेठेचे आयोजन करण्यात आले आहे. सध्या ही ग्राहक पेठ सुरू असून येत्या रविवारी, २४ एप्रिलपर्यंत दुपारी ३ ते रात्री ९.३० पर्यंत गावदेवी मैदान, नौपाडा, ठाणे (प.) येथे सर्वासाठी खुली राहणार आहे. मसाले, मुखवास, कपडे, पैठणीच्या पर्स, साडय़ा, ड्रेस मटेरियल, कागदी फुले, चांदीच्या भेटवस्तू, इमिटेशन ज्वेलरी, खाद्य पदार्थ, किचनवेअर, मातीची भांडी, मालवणी वस्तू व पदार्थ, बनारसी वस्तू अशा विविध गोष्टींचा त्यामध्ये समावेश आहे. तसेच येथे दुष्काळग्रस्तांचे खाद्यपदार्थाचे स्टॉलही आहेत.
कधी – २४ एप्रिलपर्यंत, वेळ : दुपारी ३ ते रात्री ९.३०.
कुठे – गावदेवी मैदान, नौपाडा, ठाणे (प.).

कॅमेऱ्याचे तंत्रशिक्षण
छायाचित्रणाची आवड असणारी व्यक्ती उत्कृष्ट कॅमेऱ्याच्या कायम शोधात असते. आपल्याला भावणारी क्षणचित्रे टिपणारा कॅमेरा हातात मिळाल्यावर कॅमेरा हाताळायचा कसा, याचे तंत्र शिकणे महत्त्वाचे असते. कॅमेऱ्याच्या विशिष्ट तंत्रानुसार छायाचित्रण केल्यास बोलके छायाचित्र कॅमेऱ्यात टिपले जाते. छायाचित्रण करताना वापरण्यात येणारी तंत्रे शिकण्याची संधी फोटो सर्कल सोसायटीच्या माध्यमातून ठाणेकरांना उपलब्ध होणार आहे. कॅमेऱ्याची ओळख, फोटो कम्पोजिशन्स, कॅमेरा लेन्स आणि फिल्टर, अ‍ॅपरचर आणि शटर प्रायोरिटी, आयएसओ याविषयी छायाचित्रकारांना शिकण्याची संधी मिळणार आहे. फोटो सर्कल सोसायटीतर्फे आयोजित कार्यशाळेत स्वप्नाली मठकर मार्गदर्शन करणार आहेत. इच्छुकांना २४ एप्रिलपर्यंत नावनोंदणी करता येईल. संपर्क- ९७०२५५२२३३
कधी – ३० एप्रिल ते १ मे.
कुठे – ठाणे कलाभवन, बिग बाजारजवळ, कापुरबावडी, ठाणे (प.).

रवींद्रनाथ टागोर, मंटो यांच्या कथांचे अभिवाचन
शैली, रचना आणि संदर्भ वेगवेगळे असले तरी रवींद्रनाथ टागोर आणि सदाअत मंटो यांच्या रचनांना अभिजात भारतीय साहित्यात मानाचे स्थान आहे. शुक्रवारी, २२ एप्रिल रोजी संध्याकाळी सहा वाजता हुमा मेन्शन, अहमद बेकरीसमोर, खार (प.), मुंबई येथे या दोन महान साहित्यकारांच्या निवडक कथांचे अभिवाचन केले जाणार आहे. माधवी, राजेश, सुमंतो, विनय, जमील या कथांचे नाटय़मय पद्धतीने अभिवाचन करणार आहेत. संपर्क- शुभांगी चतुर्वेदी-०९६१९८२११५४.

‘लोक’ आणि ‘रॉक’चे फ्यूजन
बॅण्ड म्हटले की डोळ्यासमोर रॉक, पॉप संगीताचे बॅण्ड येतात. पण लोकसंगीत आणि पाश्चिमात्य वाद्यांचा ‘इंडियन सागा रॉक बॅण्ड’ने संगम घडवून आणला आहे. नॅशनल स्कूल ऑफ परफॉर्मिग आर्टचे विद्यार्थी ध्रुव राठोड, केनिल सांगवी, प्रयाग शेनॉय, राहुल नायक, तेजस पारेख हे रॉक बॅण्डचा नजराणा सादर करणार आहेत. विविआना मॉल व्यवस्थापनातर्फे ठाणेकरांच्या वीकेण्डची रंगत वाढविण्यासाठी या रॉक बॅण्डचे आयोजन करण्यात आले आहे.
कधी – २३ एप्रिल, सायंकाळी ६.३० ते
रात्री ९.
कुठे – विविआना मॉल, ठाणे (प.).

जयपुरी ज्वेलरीचे प्रदर्शन
बहुतेक महिलांना दागिन्यांचे विलक्षण आकर्षण असते. त्यांची ही हौस पुरविण्यासाठी ठाण्यातील ठाकूरवाडी नेहमीच सज्ज असते. सोने, चांदी, मोती अशा पारंपरिक धातूंबरोबरच प्लॅटिनम, अमेरिकन डायमंड्स, ऑनिक्स, अशा इतर प्रकारांतही दागिने मिळतात. सोन्या-चांदीच्या किमती कितीही चढय़ा असल्या तरी दागदागिन्यांची हौस अजिबात कमी होत नाही. पारंपरिक भारतीय दागिन्यांमध्ये जयपूर पद्धतीच्या दागिन्यांना खूप महत्त्व आहे. कुंदन मीनाकाम हे जयपुरी संस्कृतीच्या दागिन्यांचे वैशिष्टय़. लाल- हिरव्या- निळ्या कुंदनांनी सजलेल्या दागिन्यांचे प्रदर्शन ठाण्यातील गोखले रोडवरील ठाकूरवाडी येथे भरविण्यात आले आहे.
कधी – दररोज दुपारी १२ ते रात्री ९.
कुठे – ठाकूरवाडी, पानेरी साडीच्या समोर, ठाणे (प).

बच्चेकंपनीसाठी पेपर आर्ट शिबीर
शाळेला सुट्टी पडली आहे. अशा वेळी बच्चेकंपनी खेळ खेळण्यात आणि आपली कला जोपासण्यात मग्न आहे. ही कला जोपासताना कलेचे परिपूर्ण शिक्षण घ्यावे यासाठी ठाणे वाचन मंदिराने बच्चेकंपनीसाठी शिबिराचे आयोजन केले आहे.
या शिबिरात बच्चेकंपनीला आर्ट ऑफ पेपर फ्लॉवर शिकण्याची संधी मिळणार आहे. या वाचनालयात येऊन मुलांची वाचनाची आवडही वृद्धिंगत होण्यास मदत होईल. या शिबिरासाठी ८ ते १० आणि ११ ते १४ अशा वयोगटातील बच्चेकंपनी या शिबिरात सहभागी होऊ शकणार आहे.
कधी – शनिवार, २३ एप्रिल, वेळ – सायंकाळी ४ ते ७.
कुठे – ठाणे नगर वाचन मंदिर, टेंभी नाका, ठाणे (प.).
संकलन : शलाका सरफरे