आयोजक, गोविंदा पथकांकडून सर्वोच्च न्यायालयाचे आदेश, ध्वनी प्रदूषण, वाहतूक नियमांना हरताळ

एकेका दुचाकीवर फिरणाऱ्या तिघांच्या टोळी, सार्वजनिक ठिकाणी उघडपणे रिचवल्या जाणाऱ्या मद्याच्या बाटल्या, वाहतूक नियमांचे सर्रास उल्लंघन करत दहीहंडी उत्सवाच्या ठिकाणी दाखल झालेल्या गोविंदा पथकांचे डीजेंच्या दणदणाटात स्वागत करत गुरुवारी ठाणे, कल्याण, डोंबिवलीतील बहुतांश दहीहंडी आयोजकांनी कायदा आणि न्यायालयीन आदेश अक्षरश: वेशीवर टांगले. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांची पर्वा न करता २० फुटांपेक्षा अधिक उंचीवर दहीहंडी उभारत मनसे आणि अन्य दहीहंडी आयोजकांनी लोकशाहीच्या मुख्य स्तंभाचीच अवहेलना केली. ‘मी कायदा मोडणारच’ असे वाक्य रेखाटलेले टी शर्ट परिधान करत मनसेच्या कार्यकर्त्यांनी तर या उत्सवात अक्षरश: उच्छाद मांडला होता. अखेर दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेच्या अधिकाऱ्यांनी मनसेच्या काही शायनिंग नेत्यांना योग्य ती ‘समज’ दिल्यानंतर हंडीचे थर खाली उतरविण्यात आले. तरीही ‘न्यायालयापेक्षा साहेबांचा आदेश पाळला’ या गुर्मीत मनसेचे कार्यकर्ते दिवसभर वावरत होते.

दहीहंडी उत्सवानिमित्ताने मुंबई-ठाण्यातील गोविंदा पथकांचे जथे दुपारनंतर शहरातील रस्त्यांवर दिसू लागले. शहरातील चौकाचौकांत बंदोबस्तावर तैनात असलेल्या पोलिसांच्या डोळ्यादेखत अनेक गोविंदा दुचाकीवरून विनाहेल्मेट प्रवास करीत होते. तसेच गोविंदा पथकांच्या वाहतुकीसाठी मंडळांनी ठेवलेल्या ट्रक व टेम्पो या वाहनांवरूनही काही गोविंदांचा बेशिस्त तसेच जीवघेणा प्रवास सुरू होता. दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आलेल्या परिसरातील मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आल्यामुळे अनेक नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत होता. तसेच गोविंदा पथकांच्या जथांमुळे अनेक भागांत वाहतूक कोंडी झाल्याचे चित्र पाहावयास मिळाले.

यंदा दहीहंडी उत्सवावर सर्वोच्च न्यायालयाने र्निबध घातल्यामुळे शहरातील अनेक आयोजकांनी माघार घेतली आहे. काही आयोजकांनी सर्वोच्च न्यायालयाचे पालन करत २० फुटांवर दहीहंडी उभारली होती. मात्र, त्या ठिकाणी डीजेचा दणदणाट मात्र सुरू होता. सर्वोच्च न्यायालयाचा आदेश झुगारत ठाण्यातील मनसेने भगवती शाळेच्या पटांगणात दहीहंडी उभारली होती. नऊ थरांसाठी अकरा लाखांचे बक्षीस ठेवण्यात आले होते. यामुळे मुंबई-ठाण्यातील गोविंदा पथकांनी त्या ठिकाणी हजेरी लावल्याने परिसरात मोठी गर्दी झाली होती. त्या तुलनेत मात्र यंदा टेंभीनाका, जांभळीनाका, वर्तकनगर आणि रहेजा भागांतील आयोजित दहीहंडीच्या ठिकाणी गोविंदा पथकांची फारशी गर्दी नव्हती.

दुपापर्यंत जांभळी नाका आणि टेंभीनाका भागांत शुकशुकाट होता. सायंकाळनंतर मात्र त्या ठिकाणी गोविंदा पथकांनी उपस्थिती लावली. ठाणे पोलीस आयुक्तालय क्षेत्रात गेल्या वर्षी ३५० मंडळांनी दहीहंडी उत्सवाचे आयोजन केले होते. यंदा मात्र २१० मंडळांनी दहीहंडी आयोजनाकरिता पोलिसांकडे अर्ज केले होते. त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा आयोजनाचे प्रमाण घटल्याचे चित्र होते. तसेच दरवर्षी तुलनेत यंदा मुंबई-ठाण्यातील गोविंदा पथकांची संख्या रोडावल्याचे दिसून आले.

शहरातील वाहतुकीस अडथळा..

ठाण्यातील मुंबई-नाशिक महामार्गावरील तीन हात नाका, नितीन कंपनी, कॅडबरी, माजिवाडा अशा प्रमुख नाक्यांवरच पोलीस गोविंदा पथकांची वाहने अडवीत होती. या वाहनांना महामार्गालगत असलेल्या सेवा रस्त्यांवर उभी करण्यास मुभा देण्यात आली होती. त्यामुळे सेवा रस्त्यावर गोविंदा पथकांच्या वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. त्यामुळे दहीहंडी फोडण्यासाठी गोविंदा पथकांचे जथे रस्त्यावरून पायी निघाल्याने शहरातील वाहतुकीस अडथळा होऊन अनेक ठिकाणी कोंडी झाली. शहरातील चौकाचौकांत बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांच्या डोळ्यांदेखत काही गोविंदा विनाहेल्मेट प्रवास करीत होते. तसेच काही गोविंदांची टवाळखोरी सुरू होती.

राज ठाकरेंचे आदेश डोंबिवलीत धुडकावले

एकीकडे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात नऊ थरांची दहीहंडी ठाण्यातील मनसेकडून बांधण्यात आली असताना दुसरीकडे मात्र डोंबिवलीत मनसेचे आयोजक चारपेक्षा जास्त थर लावण्यास परवानगी देत नव्हते.  त्यामुळे डोंबिवलीत चक्क पक्षप्रमुखांचे आदेश धुडकावून हंडी साजरी केल्याचे स्पष्ट होत आहे. आयोजक चार थर लावण्याचे आवाहन करूनही काही मंडळांनी पाच ते सहा थर लावून मनसेच्या हंडीला सलामी दिली. आम्ही इतके दिवस पाच ते सहा थरांचा सराव करीत असल्याने आम्ही तेवढय़ाच थरांची सलामी देणार असल्याचे पथकांचे ठाम मत होते.

पालिकेला उशिरा जाग..

सर्वोच्च न्यायालयाचे आदेश झुगारत ठाण्यातील भगवती शाळेच्या मैदानात मनसेच्या स्थानिक नेत्यांनी दहीहंडी उभारली होती. या हंडीनिमित्ताने भगवती शाळेच्या पटांगणाकडे येणाऱ्या मार्गावर मनसेने भल्या मोठय़ा कमानी उभारल्या होत्या. गोखले रोड, हरिनिवास तसेच आसपासच्या रस्त्यांवर कमानी उभारण्यात आल्या होत्या. या कमानी बेकायदा उभारण्यात आल्या होत्या. या कमानी उभारण्याचे काम सुरू असताना पालिकेकडून कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. मात्र, गुरुवारी दुपारनंतर खडबडून जाग आलेल्या महापालिकेने काही कमानी काढण्याची कारवाई केली.