काकोळे धरणातून प्रतिदिन सात दशलक्ष पाणीपुरवठा शक्य
मुंबई महानगर परिसरातील अभूतपूर्व पाणीटंचाई लक्षात घेऊन ऐरोली-कळव्यादरम्यान असलेल्या दिघा धरणातून ठाणे-नवी मुंबईला पाणी देण्याचा निर्णय घेणाऱ्या रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी तेच धोरण हाजी मलंग पट्टय़ात असलेल्या काकोळे धरणाबाबतही लागू करावे, अशी अपेक्षा अंबरनाथकर बाळगून आहेत. विशेष म्हणजे जीआयपी टँक नावाने ओळखले जाणारे हे धरण दिघा धरणाच्या दुपटीहून मोठे आहे. दिघा धरणातून प्रतिदिन चार दशलक्ष लिटर्स, तर या धरणातून सात ते नऊ दशलक्ष लिटर्स पाणी पुरवठा होऊ शकतो.
कल्याण रेल्वे स्थानक आणि कर्मचारी वसाहतीला पाणीपुरवठा करणारे हे धरण नव्वदच्या दशकापासून वापराविना पडून होते. दोन वर्षांपूर्वी येथे रेल्वे प्रशासनाने बाटलीबंद पाण्याचा रेलनीर प्रकल्प सुरू केला आहे. मात्र प्रकल्पाला लागणारे पाणी पुरवूनही या धरणातून किमान सहा ते सात दशलक्ष लिटर पाणीपुरवठा अंबरनाथ शहरास होऊ शकतो. येथून जवळच असलेल्या चिखलोली धरणातूनही सध्या अंबरनाथकरांना तेवढाच म्हणजे प्रतिदिन सात दशलक्ष लिटर्स पाणी मिळते.
अपुऱ्या पावसामुळे सध्या ठाणे जिल्ह्य़ास अभूतपूर्व पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे. जिल्ह्य़ाच्या शहरी विभागातील भविष्यकालीन पाणीपुरवठय़ासाठी प्रस्तावित करण्यात आलेले काळू, शाई, पोशिर आदी सर्व मोठे धरण प्रकल्प अद्याप कागदावरच आहेत. मात्र दुसरीकडे सहज उपलब्ध असणाऱ्या पाण्याचा वापर करण्याबाबत कमालीची उदासीनता आहे.

अतिक्रमणांमुळे जलाशयास धोका
रेलनीर प्रकल्प कार्यान्वित होऊन आता दोन वर्षे होत आली तरी या जलाशयातून अवैध पाणी उपसा सुरूच आहे. अनेक टँकरमाफिया अहोरात्र येथून पाणी उपसून घेऊन जातात. आनंदनगर औद्योगिक वसाहतीने आता तळ्याला वेढा घातला आहे. गेल्या काही वर्षांपासून मोठय़ा प्रमाणात गणेश मूर्तीचे विसर्जनही होते. शंभर वर्षांपूर्वी बांधलेल्या या धरणात आता मोठय़ा प्रमाणात गाळही साचला आहे. त्यामुळे जलाशयास धोका निर्माण झाला आहे.

काकोळे तलाव परिसरातील एकेकाळचे समृद्ध जंगल आता उजाड झाले आहे. मात्र सुदैवाने तलावाकाठची चार हेक्टर जागा अद्याप अतिक्रमणांपासून मुक्त आहे. त्यामुळे तिथे चांगले निसर्गउद्यान उभारून येथील पाणी आणि पर्यावरणाचे संवर्धन करणे शक्य आहे.
-डॉ. मनीषा कर्पे, पर्यावरणतज्ज्ञ