डोंबिवली पूर्व भागातील आयरे रस्ता येथील एक मजली धोकादायक इमारत ग प्रभागाच्या महापालिका कर्मचाऱ्यांनी मंगळवारी जमीनदोस्त केली. पावसाळ्यात कोणत्याही क्षणी ही इमारत कोसळण्याची भीती होती. या इमारतीत कोणीही राहत नव्हते. ग प्रभागाचे प्रभाग अधिकारी प्रभाकर पवार यांनी या इमारतीची माहिती घेतली. परिसरातील रहिवाशांनी ही इमारत तोडण्याची मागणी केली होती. या मागणीचा विचार करून ग प्रभागाच्या पथकाने ही धोकादायक इमारत पोकलेनेच्या साहाय्याने पाडली. याच पथकाने गेल्या आठवडय़ात दत्तनगर भागात एक धोकादायक इमारत पाडली होती. ३९५ इमारती धोकादायक कल्याण डोंबिवली पालिका क्षेत्रात ३९५ इमारती धोकादायक, २९१ इमारती अतिधोकादायक आहेत. डोंबिवलीतील फ, ग आणि ह प्रभागात २०५ इमारती धोकादायक तर ९१ इमारती अतिधोकादायक ठरविण्यात आल्या आहेत. जुन्या इमारतींन स्ट्रक्चरल ऑडिट करून घेण्याच्या नोटिसा पाठविण्यात आल्या आहेत.