महाराष्ट्राची सांस्कृतिक उपराजधानी अशी ओळख असलेल्या ठाणे शहरात अफू, गांजा, चरस अशा मादक पदार्थाची खुलेआम विक्री सुरू असल्याचा दावा करत महापौर मीनाक्षी शिंदे यांच्यासह सर्वपक्षीय नगरसेवकांनी खळबळ उडवून दिली आहे. या सर्वानी पालकांनी केलेल्या तक्रारींच्या आधारे हे दावे केल्याने त्यातील तथ्य नाकारता येत नाही. सुसंस्कृत ठाण्यात मादक पदार्थ विक्रेत्यांचा व्यवसाय हातपाय पसरत असेल आणि अनेक जण विद्यार्थी दशेपासूनच त्यांच्या जाळ्यात अडकत असतील तर शहरासाठी ही धोक्याची घंटा आहे. या शहराचा ‘उडता ठाणे’ तर होत नाही ना? अशी भीती व्यक्त केली जात आहे..

गेल्या काही वर्षांपासून शहरातील लेडीज बार व लॉजची संख्या वाढत होती आणि त्यामुळे सांस्कृतिक उपराजधानी असलेले ठाणे बदनाम होत होते. या बार आणि लॉज संस्कृतीला हद्दपार करण्यासाठी ठाण्याचे तत्कालीन सह पोलीस आयुक्त व्ही. व्ही. लक्ष्मीनारायण यांनी पहिले सुरुंग लावले आणि त्यांनतर ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल व ठाण्याचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी ठोस पावले उचलली. या दोन्ही अधिकाऱ्यांनी वर्षभरापूर्वी शहरातील लेडीज बार आणि लॉजची बांधकामे जमीनदोस्त करून ही संस्कृती हद्दपार करण्याचा प्रयत्न केला. लेडीज बार आणि लॉजच्या विळख्यातून ठाण्याची सुटका झाल्याने नागरिकांनी या कारवाईचे जोरदार स्वागत केले होते. मात्र हा दिलासा फार काळ टिकला नाही. लॉज आणि लेडीज बार संस्कृतीवर कारवाईला जेमतेम वर्ष होत नाही तोच शहरात पब, हुक्का पार्लर्सचे पेव फुटू लागल्याचे चित्र दिसून येत आहे. त्याचबरोबर शहरात अफू, गांजा, चरस अशा मादक पदार्थाची खुलेआम विक्री सुरू आहे. याशिवाय, शहरातील टपऱ्यांवर ‘पोपट’ नावाच्या पानातून मादक पदार्थाची विक्री केली जात आहे, असे एकामागोमाग एक दावे करत महापौर मीनाक्षी शिंदे यांच्यासह सर्वपक्षीय नगरसेवकांनी गेल्या आठवडय़ात झालेल्या सर्वसाधारण सभेत शहरातील भयावह वास्तव उघड केले आहे. या संदर्भात काही पालकांनी त्यांच्याकडे तक्रारी केल्या आहेत. त्या तक्रारींचा आधार घेऊनच ते बोलले. त्यामुळे एकीकडे शहरातील लेडीज बार व लॉजला लगाम बसला असला तरी दुसरीकडे मादक पदार्थ विक्रेते शहरात सक्रिय झाल्याचे स्पष्ट होत आहे.

शहरातील नाक्यानाक्यावर असलेल्या बहुतेक पान टपऱ्यांवर ‘पोपट पान’ विकले जाते. कमीत कमी २५ रुपयांना हे पान मिळते. मादक पदार्थ टाकून हे पान दिले जात असल्याचे सांगितले जाते.  गेल्या काही महिन्यांपासून याच संदर्भात माहिती मिळविण्याचे काम सुरू असल्याचे ठाणे पोलीस दलातील एका अधिकाऱ्याने सांगितले. त्यामुळे ‘पोपट पान’  विक्रीच्या टपऱ्या पोलिसांच्या रडारवर आहेत. अर्थातच त्यामुळे महासभेत नगरसेवकांनी केलेल्या दाव्यांमध्ये तथ्य आहे.

नशेमुळे चोऱ्या  वाढल्या

शहरामध्ये अफू, गांजा, चरस अशा मादक पदार्थाची खुलेआम विक्री सुरू असल्याने १२ ते १३ वर्षांपासूनच मुले त्यांच्या आहारी जात आहे. टपऱ्यांवर मिळणाऱ्या ‘पोपट पान’मध्ये मादक पदार्थ असल्याने अनेक जण त्यातून आपली नशेची भूक शमवितात. शहरातील मोकळ्या जागा, मैदाने आणि अंधाऱ्या जागी बसून ही मुले मादक पदार्थाचे सेवन करतात. हीच मुले पहाटेच्या वेळी घरांमध्ये मोबाइल तसेच किमती ऐवज चोरतात. त्याच पैशातून मग अमली पदार्थ विकत घेतात. त्यामुळे पहाटेच्या वेळेस शहरात मोबाइल चोरीचे प्रकार वाढले आहेत, असा दावा महापौर मीनाक्षी शिंदे यांच्याकडून करण्यात आला आहे. या दाव्याकडे कानाडोळा करून चालणार नाही. कारण, हे नशेचे प्रकरण जितके वरवर दिसते, तितकेच खोलवर रुजत चालले आहे. एखाद्याला मादक पदार्थाच्या नशेचे व्यसन लागले तर तो कोणत्याही थराला जाऊ शकतो. विविध शहरांमध्ये यापूर्वी घडलेल्या घटनांमधून हे उघड झाले आहे. त्यामुळे मादक पदार्थ विक्रेत्यांची पाळेमुळे शहरात खोलवर रुजण्याआधीच पोलिसांनी ती उपटून टाकणे गरजेचे आहे. एका पोलीस ठाण्यात मादक पदार्थासंदर्भात तक्रार केली होती. पण, त्यावर पुढे काहीच कारवाई झाली नाही, असे महापौर शिंदे यांनी खेदाने सांगितले. यावरून त्या पोलिसांची मादक पदार्थविरोधी करवाईबाबाबतची मानसिकता कशी आहे, हे दिसून येते. त्यांना त्यातले गांभीर्य कळत नाही की ते मुद्दामहून कानाडोळा करताहेत? मादक पदार्थाच्या या व्यसनामुळे शहरातील नवी पिढी बरबाद होऊ शकते. त्यामुळे पोलिसांनी अतिशय प्राधान्याने कठोर कारवाई करून मादक पदार्थविक्री समूळ उखडून टाकणे गरजेचे आहे.

अवैध धंद्यांवर कारवाई

ठाण्यातील ग्लॅडी अल्वारिस मार्गालगत असलेल्या कोठारी कम्पाऊंडच्या परिसरात अग्निशमन विभागाच्या ना-हरकत दाखल्याशिवाय पब, हुक्का पार्लर, हॉटलांचे व्यवसाय सुरू आहेत. खारेगाव ते दिवा भागात २१ हुक्का पार्लर आहेत. याव्यतिरिक्त ठाणे आणि घोडबंदर परिसरातही असेच हुक्का पार्लर सुरू आहेत. या मुद्दय़ांवरून चर्चा होताच अशा अवैध धंद्यांवर येत्या २० सप्टेंबपर्यंत कारवाई करण्याचे आदेश महापौरांनी दिले आहेत. त्यामुळे लेडीज बार आणि लॉजप्रमाणेच मादक पदार्थविक्रीचे जाळे विशेष मोहीम राबवून आयुक्त आयुक्त संजीव जयस्वाल आणि त्यांची टीम उखडून टाकेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

अमली पदार्थाची वाहतूक

ठाणे पोलिसांच्या अमली पदार्थविरोधी पथकाने गेल्या चार महिन्यांत मोठय़ा प्रमाणात गांजाचा साठा जप्त केला आहे. या दोन्ही कारवाईच्या तपासादरम्यान पोलिसांची पथके माफियाचा शोध घेत विशाखापट्टणम् आणि ओरिसापर्यंत गेली होती, पण तिथे माफिया त्यांच्या हाती लागले नाहीत. काही वर्षांपूर्वी गांजाच्या विक्रीप्रकरणी एका शिक्षकाला पोलिसांनी अटक केली होती. काही माफिया काश्मीर येथून गांजा आणि चरस महाराष्ट्रमध्ये आणतात. वाहनांमध्ये अमली पदार्थ लपवून दिल्ली, राजस्थान, गुजरात यासह अन्य मार्गे महाराष्ट्रात आणले जातात. नक्षलवादी भागातून अशा अमली पदार्थाची राज्यात वाहतूक होते, असे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.

पोलिसांपुढे नवे आव्हान

ठाण्याचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या नेतृत्वाखाली ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाची कामगिरी काहीशी वाखाणण्याजोगी आहे. या विभागाने कॉल सेन्टर तसेच इतर गुन्हे उघड करत त्यांचा आंतरराष्ट्रीय पातळीशी असलेले धागेदोरे उघड केले आहेत. याशिवाय, मेफ्रेडोन, अलप्राझोम यांसह इफेड्रिन अशा चर्चेत नसलेल्या अमली पदार्थाचे रॅकेट गेल्या तीन वर्षांत नेस्तनाबूत केले. इफेड्रिन या अमली पदार्थाची विक्री सोलापूर ते केनिया अशी होत होती. या व्यापारात ड्रग माफिया विकी गोस्वामी व ममता कुलकर्णी यांचा सहभाग असल्याचे पोलिसांनी उघड केले. अशा प्रकारे नशेच्या व्यापारातील आंतरराष्ट्रीय कनेक्शन उघड करण्यात यश आलेल्या ठाणे पोलिसांच्या नजरेतून शहरातील मादक पदार्थाची विक्री कशी काय सुटली? खरेच ही आश्चर्य करण्यासारखी बाब आहे. अर्थात पोलीस त्यांच्या पद्धतीने त्याचा छडा लावण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे लवकरच ‘पोपट पान’चे कोडे उलगडेल, अशी अपेक्षा बाळगायला हरकत नाही.