दारिद्रयरेषेखालील लाभार्थ्यांच्या याद्या १२ वर्षे जुन्या

राज्यभरातील पालिकांमध्ये सुरू असलेल्या केंद्र सरकारच्या दीनदयाळ अंत्योदय योजनेंतर्गत राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियान सुरू आहे. दारिद्रय रेषेखालील व्यक्तींना स्वयंपूर्ण बनवण्यासाठी या योजनेतून कर्जरूपी सहकार्य करण्यात येणार आहे. मात्र बदलापूर पालिका क्षेत्रामध्ये वापरली जाणारी यादी १२ वर्षे जुनी असून त्या यादीतील काही ‘लाभार्थी’ आता श्रीमंत झाले असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. त्यामुळे दारिद्रय़रेषेखालील व्यक्तिंसाठीची ही योजना अपयशी ठरण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

शासकीय योजना खऱ्या लाभार्थापर्यंत पोहोचत नाही, असा आरोप अनेकदा केला जातो. त्यात अनेकदा तथ्यही आढळते. केंद्र सरकारच्या आवास आणि शहरी दारिद्रय़ निर्मूलन मंत्रालयाच्या दीनदयाळ अंत्योदय योजनेंतर्गत देशभरात राष्ट्रीय शहरी उपजीविका अभियान सुरू आहे. गेल्या सरकारमध्ये यात मोठय़ा शहरांचा समावेश होता. मात्र आता त्यात देशभरातील ३२०० हून अधिक शहरांचा समावेश झाला आहे. त्यामुळे अनेक नगरपालिका क्षेत्र या योजनेखाली आले आहे. त्यामुळे पालिका प्रशासनातील अधिकारी आणि कर्मचारी शहरातील दारिद्र रेषेखालील व्यक्तीच्या दारापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करीत आहेत. परंतु, जिल्हाधिकारी कार्यालयाकडून पालिका प्रशासनाला मिळालेली लाभार्थ्यांची यादी १२ वर्षे जुनी असल्याचे समजते. २००५-०६ मध्ये तयार करण्यात आलेली दारिद्रय रेषेखालील व्यक्तींचीच यादी या योजनेसाठी वापरण्यात येत आहे. कुळगाव बदलापूर नगरपालिका क्षेत्रातील यादीत २०२४ कुटूंबे असून ७१९२ लाभार्थ्यांचा यात समावेश आहे. सध्या या योजनेतील लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी स्थानिक नगरसेवकांची मदत घेतली जात आहे.

या यादीमध्ये अनेक नावे बोगस असल्याची शक्यता व्यक्त होत आहे. तसेच गेल्या १२ वर्षांत दारिद्रय़रेषेखाली आलेल्या व्यक्तींची नावे यात नाहीत. त्य़ामुळे त्यांना या योजनेचा लाभ मिळण्याची शक्यता नाही. या यादीत काही श्रीमंत व्यक्तींचीही नावे असल्याचे सांगण्यात येत असून आपले नाव यादीत असल्याचे समजल्याने या लोकांकडून योजनेचा फायदा घेण्यासाठी कागदपत्रांची जमवाजमव सुरू झाल्याचेही सूत्रांनी सांगितले. ज्यांची नावे यादीत आहेत व ज्यांच्याकडे प्रमाणपत्र आहेत त्यांनाच याचा लाभ मिळणार असून सध्यातरी पडताळणी करण्याची प्रRिया राबवली जात नाही, असे पालिकेचे अधिकारी सांगत आहेत. त्यामुळे योजना त्याच्या पूर्णत्वाआधीच अपयशी ठरण्याची शक्यता निर्माण झाली आहे