दिल्लीच्या श्रीमंत चोराला वसईत अटक; आलिशान घर आणि गडगंज संपत्तीचा मालक

दिल्लीमध्ये आलिशान घर, दिल्लीहून मुंबईला विमान प्रवास, गडगंज संपत्ती.. हे वर्णन कुण्या धनाढय़ व्यक्तीचे नाही, तर एका चोराचे आहे. वसई पोलिसांनी नुकतीच या चोराला अटक केली. पाच वष्रे पोलिसांना गुंगारा देणारा हा चोर कोणतेही कुलूप तोडण्यात वाकब्गार होता. त्याच्या संपत्तीची माहिती मिळताच पोलीसही अवाक झाले आहेत.

नालासोपारा येथील श्रीप्रस्थ वसाहतीत सीमा सुनील पेडणेकर यांच्या घरी जुलै महिन्यात घरफोडी झाली होती. त्या चोरीचा तपास करताना पालघर स्थानिक गुन्हे शाखेच्या वसई युनिटला डेव्हिड वाल्मीकी ऊर्फ करण आणि फिरोज ऊर्फ अहमद मुकरम हुसेन (३०) यांचा सहभाग असल्याचे समजले. ते दोघे भाईंदरला आले असल्याची माहिती मिळताच त्यांना सापळा लावून अटक केली. त्यांनी नालासोपारा शहरात तब्बल १६ घरफोडय़ा केल्याचे उघड झाले. त्यांच्याकडून तब्बल १६ लाख रुपये किमतीचा चोरलेला ऐवजही जप्त करण्यात आला आहे.

डेव्हिड गेल्या पाच वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देत होता. तो मूळचा उत्तर प्रदेशातील असून दिल्लीत स्थायिक झालेला आहे. दिल्लीत त्याची गडगंज संपत्ती आहे. संगम विहार परिसरात तो राहत असून, त्याची शहरात वडिलोपार्जित दोन गुंठे जागा आहे. आर्थिक स्थिती उत्तम असूनही तो चोरी करायचा. कुठलेही कुलूप तो सहज तोडायचा. दिल्लीत राहत असला तरी नालासोपारा हे त्याने आपले चोरीसाठी क्षेत्र बनवले होते. त्यासाठी तो विमानाने मुंबईत यायचा. नालासोपाऱ्यात आपल्या साथीदाराच्या मदतीने तो घरफोडी करायचा. त्याचे राहणीमानही टापटीप असायचे. त्यामुळे  कुणाला संशयही यायचा नाही, अशी माहिती पालघर स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक होनमाने यांनी सांगितले.

चोरलेले सोन्याचे दागिने डेव्हिड दिल्लीमध्ये सराफांना विकायचा. सोनारही त्याला भरपूर श्रीमंत असल्यामुळे सहकार्य करायचे. दुसरा आरोपी फिरोज हुसेन हा भाईंदर येथील पोलाद कंपनीत रात्री काम करायचा आणि दिवसा घरफोडय़ा करायचा. त्याचे राहणीमानही टापटीप असल्याने त्याचाही कुणाला संशय यायचा नाही.

अशोक होनमाने यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत लांघी, पोलीस उपनिरीक्षक सचिन चव्हाण आदींच्या पथकाने ही कारवाई केली.