आयरेगावात केवळ ४० ठिकाणी कारवाई; ‘लोकसत्ता ठाणे’मधील वृत्तावरून कर्मचाऱ्यांची धावपळ
कल्याण-डोंबिवली पालिका हद्दीत बेकायदा नळजोडण्या घेतल्याबाबतचा एकही अहवाल पाणीपुरवठा विभागाकडे आलेला नाही, अशी उत्तरे देणाऱ्या पाणीपुरवठा विभागाने ‘लोकसत्ता-ठाणे’ने आयरे गाव परिसरात ७०० बेकायदा नळजोडण्या असल्याचे वृत्त मंगळवारी प्रसिद्ध करताच, मंगळवारी सकाळीच आयरे गाव, ज्योतीनगर भागात जाऊन तेथील ४० नळजोडण्या गॅसकटरने तोडून टाकल्या.
‘लोकसत्ता ठाणे’मध्ये बेकायदा नळजोडण्यांचे वृत्त प्रसिद्ध होताच पालिकेच्या डोंबिवलीतील ‘ग’ प्रभागातील पाणीपुरवठा विभागाच्या पथकाने मंगळवारी सकाळी आयरे गावात धाव घेतली व तेथील बेकायदा नळजोडण्या तोडल्या. प्रत्यक्षात शेकडो नळजोडण्या या भागात आहेत. पथकाने फक्त नळजोडण्या तोडण्याचा देखावा करून चटावरचे श्राद्ध उरकून घेतले आहे, अशी प्रतिक्रिया आयरे गावातील रहिवासी व या प्रकरणातील तक्रारदार एस. पी. कदम यांनी दिली.
या भागातील नळजोडण्या गॅसकटरने तोडण्यात आल्या आहेत. काही ठिकाणी नळाला लाकडी खुंटी मारून पाणी बंद करण्यात आले आहे; परंतु या सगळ्या जोडण्या दुसऱ्या दिवशी रात्रीत सुरू करण्यात येतील. या बाबतीत भूमाफिया, रहिवासी तज्ज्ञ असतात, असे कदम यांनी सांगितले. ‘ग’ प्रभागाच्या हद्दीत नळजोडण्या तोडण्याची कारवाई केली, हे आयुक्तांना दाखविण्यासाठी प्रभागातील कर्मचाऱ्यांनी काल फक्त नळजोडण्या तोडण्याचे नाटक केले. हे नाटक व आपण या भागात सुरू असलेली नवीन नळजोडण्यांची कामे, बेकायदा नव्या चाळींचे एकही नळजोडणी न तोडणे, नळजोडण्या तोडूनही या भागात सुरू असलेला पाणीपुरवठा, याचे चित्रण करून आयुक्तांना देणार आहोत, असे कदम यांनी सांगितले.
‘ह’ प्रभागात जोडण्यांची कामे सुरूच
डोंबिवली पश्चिमेतील ‘ह’ प्रभागाच्या हद्दीत खाडीकिनारी बेकायदा चाळी उभारणीचे काम सुरू आहे. त्यांना राजरोसपणे पालिकेच्या जलवाहिन्यांवरून पाणीपुरवठा करण्यात येत आहे. सर्वाधिक पाणीचोरी टिटवाळा, कल्याण पूर्व आणि डोंबिवली पूर्व आणि पश्चिम भागात सुरू आहे. कर्मचाऱ्यांचे प्लम्बर, दलाल यांच्याशी लागेबांधे असल्यामुळे ते या बेकायदा नळजोडण्यांवर कारवाई करीत नसल्याचे समजते.
२२ दिवसात १७० नळ जोडण्या तोडल्या
आयुक्त ई. रवींद्रन यांनी पाणीपुरवठा विभागाला प्रभागातील बेकायदा नळजोडण्या तोडण्याचे आदेश यापूर्वीच दिले आहेत. गेल्या २२ दिवसांत पालिकेच्या सात प्रभागांमध्ये १७० नळजोडण्या तोडण्यात आल्या आहेत, अशी माहिती पालिकेच्या जनसंपर्क विभागाने दिली. कल्याण पश्चिमेतील ब प्रभागात ४५, २७ गावांचे नियंत्रक असलेल्या इ प्रभागात ४३, फ आणि ग प्रभागात ४७, अ प्रभागात १९, डोंबिवली पश्चिमेतील ह प्रभागात १६ नळजोडण्या तोडण्यात आल्या आहेत. बेकायदा बांधकामांचे आगर असलेल्या कल्याण पूर्व भागातील ड प्रभागात गेल्या वीस दिवसांत एकही बेकायदा नळजोडणी तोडण्यात आलेली नाही, तसेच क प्रभागात कारवाई करण्यात आलेली नाही.