आनंद मिळवण्यासाठी सकारात्मक दृष्टिकोन व संवाद साधण्याची आवश्यकता आहे. सकारात्मक दृष्टिकोन असेल तर कुठलीही व्यक्ती सहजरीत्या गाणे गाऊ शकते, असे मत संगीत संशोधक संतोष बोराडे यांनी कल्याणात व्यक्त केले.
ज्येष्ठ नागरिक संघ, कल्याण आणि कल्याण-डोंबिवली महापालिका यांनी आयोजित वसंत व्याख्यानमालेत ते बोलत होते.  
आनंद सुख आणि दु:खातही निर्माण करता येतो. आनंद कसा आचरणात आणतो, यावर सगळ्या गोष्टी अवलंबून असतात असे ते म्हणाले. ‘जीवन संगीत- संगीतातून आरोग्य’ या विषयावर त्यांचे व्याख्यान झाले.बोराडे हे गेली १५ वर्षे  आध्यात्मिक विज्ञानावर संशोधन करत आहेत. खोपोलीतील शाळेत ते योगाभ्यास अध्यापन करतात. अरुण रानडे यांच्यासोबत त्यांनी संशोधनही केले आहे. बोराडे यांनी ‘घाल घाल पिंगा.’ या गाण्याने आपल्या व्याख्यानाची सुरुवात केली व गाण्यातून आरोग्य कसे सुदृढ राहू शकते या विषयावर मार्गदर्शन करण्यास सुरुवात केली. गाणे मनापासून म्हणणे महत्त्वाचे आहे. गाण्याचा ‘राग’चा विचार करत बसण्याची गरज नाही. जुन्या परंपरांचा विसर पडत चालला आहे. त्यामुळे जीवन गढूळ बनत चालले आहे, अशी खंतही त्यांनी  वेळी व्यक्त केली.

आपणच थेरपिस्ट
संगीताच्या माध्यमातून एखाद्या व्यक्तीवर किंवा स्वत:वर त्याचा परिणाम होत असेल तर त्यालाच ‘थेरपी’ असे म्हणतात. जात्यावरच्या कामाचे उदाहरण जात्यावरील कामात ‘जानुशिरासन’ हा योगप्रकार दडलेला आहे. आज ही आसने  शिकवणी लावून शिकण्यात समाधान मानतो. जात्यावरचे काम हे एका लयीत होण्यासाठी गाणी म्हटली जायची. जात्यावरील गाण्यांची पुढे ‘ओवी’ झाली. जात्यावरील कामाबरोबरच रक्ताभिसरण, ऑक्सिजन घेणे आदी गोष्टी नकळतच साधल्या जात असत.