पुरातत्त्व विभाग ठाम तर स्वयंसेवी संस्थांचा विरोधी सूर
वसईच्या ऐतिहासिक किल्ल्यांमधील झाडांना पुरातत्त्व विभागाने लावलेल्या आगीबद्दल वसईत उलटसुलट प्रकिया व्यक्त होत आहे. तटबंदी आणि बुरुजांच्या सुरक्षेचे कारण देत झाडांना आगी लावल्याचा पुरातत्त्व विभागाचा दावा खोटा असून अनेक चांगल्या झाडांना आगी लावल्याचा आरोप विविध संस्थांनी केला आहे.
चिमाजी अप्पांच्या पराक्रमाची साक्ष देणारा वसईचा किल्ला वसईची सांस्कृतिक आणि ऐतिहासिक ठेव मानला जातो. विविध स्वयंसेवी संस्था या किल्ल्याच्या देखभालीसाठी प्रयत्नशील असतात. देखभालीच्या आणि स्वच्छतेच्या नावाखाली पुरातत्त्व विभागाने किल्ल्यांमधील झाडांना आगी लावल्या होत्या. त्याचे तीव्र पडसाद उमटले होते. किल्ल्याची तटबंदी आणि बुरूज सुरक्षित राहावेत यासाठी आगी लावल्याचा खुलासा पुरातत्त्व विभागाने केला आहे. परंतु काही संस्थांनी त्यावर आक्षेप घेतला आहे. किल्ल्यामधील दोनशे चांगल्या झाडांना आगी लावल्याचा आरोप एका संस्थेने केला आहे. बुरुजापासून शंभर मीटर लांब असणाऱ्या झाडांपासून काय धोका होता असा सवाल त्यांनी केला आहे. पुरातत्त्व विभागाने किल्ला संवर्धनाच्या नावाखालीे ठेका काढून किल्ल्याच्या ऐतिहासिक वास्तूवर सिमेंट चढवून किल्ल्याला हानी पोहोचविल्याचा आरोपही त्यांनी केला. येथे येणाऱ्या हौशी पर्यटकांकडून छायाचित्रण करीत असताना दंड आकारला जात असल्याचेही त्यांनी सांगितले.
पुरातत्त्व विभाग मात्र आपल्या दाव्यावर ठाम आहे. किल्ल्याची तटबंदी दिसावी म्हणून झाडांना आगी लावून त्या कापल्याचे पुरातत्त्व विभागाचे कैलाश शिंदे यांनी सांगितले. अनावश्यक झाडांमुळे मद्यप्राशन, प्रेमीयुगुलांचे अश्लील चाळे असे प्रकार व्हायचे. त्याला आळा बसणार आहे. कचरा आणि अनावश्यक झाडांना आगी लावल्या म्हणजे किल्ल्याचे नुकसान केले असे होत नाही असेही ते म्हणाले.
किल्ले वसई मोहिमेचे प्रमुख डॉ श्रीदत्त राऊत यांनीही या झाडे कापण्याचे समर्थन केले आहे. पर्यावरणाच्या नावाखाली किल्ला धोक्यात टाक णे योग्य नाही असे ते म्हणाले. पुरातत्त्व विभागाने साफसफाई केली. परंतु एकही झाड मृतावस्थेत आढळले नाही याकडे त्यांनी लक्ष वेधले.