मुंबई-ठाण्यातील खाऊ अड्डय़ांवर खवैय्ये आपापल्या आवडीनुसार विविध प्रकारच्या खाद्यपदार्थाचा आस्वाद घेत असले तरी या खाद्य मैफलीची भैरवी मात्र बहुतेकदा चहानेच होते. चहा हे भारतीय आतिथ्यशैलीचे प्रतीक आहे.  जात, धर्म, प्रांत या भेदांपलीकडे जात या गरम पेयाने घराघरात स्थान निर्माण केले आहे. सर्वसाधारणपणे हॉटेल्स, रेस्टॉरंटमध्ये चहा मिळतोच. शिवाय फक्त चहा मिळण्याचेही अनेक अड्डे जागोजागी असतात. चहा केवळ साखर, पावडर आणि दूध याचे उकळते मिश्रण नव्हे, त्यापलीकडेही ‘चहा’चे अनेक चविष्ट अवतार आहेत. ठाण्यातील तलावपाळीवरील ‘एक कप चाय’ या कॉर्नरवर निरनिराळ्या स्वादांच्या वाफाळत्या चहाचा अनुभव आपल्याला घेता येतो.

चहाच्या इतिहासात डोकावले तर फार मागे जावे लागते. तिसऱ्या शतकात चीनमध्ये चहा एक औषधी पेय म्हणून प्यायले जात होते. भारतीय उपखंडात आढळणाऱ्या चहाच्या ब्रिटिश प्रेमातच पडले. ‘एक कप चाय’ मध्ये केवळ  ‘चहा’ अशी ऑर्डर देऊन चालत नाही. त्याचा प्रकारही सांगावा लागतो. विविध प्रकारच्या चहाबरोबरच  सर्वसाधारणपणे चहासोबत खाल्ले जाणारे बनमस्का, केक फ्रूट, बिस्किटे यांसारखे पदार्थही मिळतात. टपरी किंवा हॉटेलमध्ये मिळणाऱ्या चहापेक्षा या कॉर्नरवरील चहाची चव निश्चितच वेगळी असते. एकेकाळी मुंबईत चहासाठी इराणी हॉटेल्स प्रसिद्ध होते. चहा आणि मस्कापाव ही खाद्य संस्कृती इराणी हॉटेल्सने मुंबईत रुजवली. काळानुरूप अनेक गोष्टी बदलल्या. त्यात हा इराणीही मागे पडला. मात्र इराण्याकडच्या त्या चहाची लज्जत ठाणेकरांना ‘एक कप चाय’मध्ये अनुभवता येते.

येथे आपल्याला एकूण ११ विविध प्रकारच्या चहाची चव चाखायला मिळते. आपण दररोज पीत असलेल्या म्हणजेच आईच्या हातची चव असलेल्या ‘घरवाली चाय’बरोबरच आले टाकून केलेली  जिंजर चाय, आले व पुदिना टाकून केलेली जिंजर लेमन चाय, मध, लिंबू, आले यांचा मिश्रण असलेली जिंजर लेमन विथ हनी चाय, चहा पत्ती टाकून लेमन ग्रास चाय अशा विविध प्रकारचा चहा येथे मिळतो. शिवाय बहुतेकांना माहिती असलेला मसाला चहाही येथे मिळतो. जायफळ, लवंग, वेलची टाकून केलेल्या या चहाची फक्कड चव जिभेवर बराच काळ रेंगाळत राहते. थोडक्यात, चहाप्रेमींसाठी ही मेजवानीच आहे. चहाबरोबरच येथे आपल्याला फिल्टर कॉफी, नेस कॉफी, बोर्नव्हिटा, हॉर्लिक्स व हॉट चॉकलेटस् असे तरुण व लहान मुलांना आवडणारे पदार्थही मिळतात. येथे तुम्हाला चहाबरोबर खारी, टोस्ट अशा दररोजच्या खाण्यातल्या पदार्थाबरोबरच बनमस्का, बारकेक, फ्रूट केक असे विशेषत: इराणी हॉटेलमध्ये मिळणारे पदार्थही या ठिकाणी मिळतात.

ताजेतवाने व तरतरीत करणाऱ्या चहाबरोबरच येथे आपल्याला सकाळच्या नाश्त्यासाठी उपमा, पोहे व उपवासाची साबुदाणा खिचडी असे घरगुती पदार्थ चाखायला मिळतात. तसेच दुपारच्या जेवणासाठी पुरी भाजी, पोळी भाजी व छोले भटुरे यांसारखे पारंपरिक पद्धतीचे जेवणही येथे मिळते. संध्याकाळी स्नॅक्स म्हणून वडे, समोसे, ब्रेड पकोडे, भाजी असे पदार्थही येथे उपलब्ध आहेत. या पारंपरिक खाद्यपदार्थाबरोबरच येथे आपल्याला फक्त पुदिन्याची चटणी घालून केलेले चटणी सँडविच, विविध प्रकारच्या भाज्यांपासून तयार केलेले व्हेजिटेबल सँडविच, मक्याचे दाणे घालून केलेले स्वीट कॉर्न सँडविच, मुलांमध्ये अधिक लोकप्रिय असलेले चॉकलेट सँडविच, थोडे गोड व थोडे तिखट असलेल चीज चिली सँडविच अशा विविध प्रकारच्या चवदार सँडविचही चवही येथे अनुभवता येते. या सर्व खाद्य मेजवानीबरोबरच चहाचे प्रकार आहेतच. मात्र काही कारणांनी चहा व्यज्र्य असणाऱ्यांसाठी मोसंबी, संत्री, कलिंगड, अननस यांसारख्या फळांचे ताजे ज्यूस, बनाना, चिकू यांसारख्या फळांचे व चॉकलेटचे मिल्कशेक येथे उपलब्ध आहेत.

‘एक कप चाय’चे आणखी एक वेगळेपण म्हणजे येथे मिळणारे टॉमेटो ऑमलेट सँडविच, जंगली पनीर, संजीरा व बिस्कुटरोटी. टॉमेटो ऑमलेट सँडविच. दोन ब्रेडमध्ये आंबोळी पिठापासून बनवलेले टॉमेटो ऑमलेट टाकून तयार केले जाते. तसेच भारतीय व विदेशी पद्धतीचे मिश्रण असलेले जंगली पनीर म्हणजेच पनीर रोल हा पंजाबी पद्धतीची पनीरची भाजी हॉट डॉगच्या बनमध्ये टाकून तयार केला जातो. संजीरा हा थोडा गोड व थोडी खारट चव असलेला पदार्थ. बिस्कुटरोटी म्हणजेच थोडी तिखट चव असलेला मंगलोरी पदार्थ. थोडक्यात, चहाबरोबरच पोटपूजेचेही अनेक पर्याय येथे उपलब्ध आहेत.

एक कप चाय, तलावपाळी, ठाणे (प)