कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत ‘झोपडपट्टी पुनर्वसन योजने’अंतर्गत तयार झालेली घरे लवकर ताब्यात मिळावीत यासाठी या योजनेतील लाभार्थी चातकासारखी वाट पाहत आहेत. मागील सात वर्ष हे लाभार्थी आपली हक्काची जागा सोडून अन्यत्र भाडय़ाने घेतलेल्या खुराडय़ांमध्ये राहत आहेत. सरकारी घर मिळण्याची या लाभार्थीची उत्कंठा वाढली असताना या घरांचे वाटप नेमके कुणाच्या हस्ते करायचे यावरून शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांमध्ये धुसफूस सुरू झाली आहे.
महापालिका निवडणुकीच्या तोंडावर या योजनेतील घरांचे वाटप करण्याची प्रक्रिया उरकण्याचे बेत आखले जात आहेत. पाच वर्षांपूर्वी झालेल्या महापालिका निवडणुकीत झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतील गैरव्यवहाराचे प्रकरण गाजले होते. असे असताना शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत या घरांचे वाटप करावे, असा स्थानिक शिवसेना नेत्यांचा प्रयत्न आहे. भाजपचे स्थानिक नेते मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम व्हावा यासाठी आग्रही आहेत. डोंबिवली आणि कल्याणात भाजपचे आमदार आहेत. कल्याण पूर्वेतील अपक्ष आमदार गणपत गायकवाड यांनीही भाजपची साथ धरली आहे. ही मंडळी मुख्यमंत्र्यांसाठी आग्रही आहेत. महापालिकेत सत्तापदी असणाऱ्या शिवसेना नेत्यांना शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते हा कार्यक्रम व्हावा, असे वाटत आहे. ही रस्सीखेच सुरू असल्याने झोपू योजनेतील घरांचे वाटप मात्र रखडले आहे.

‘झोपु’ योजनेत एक हजार घरे उपलब्ध
कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीतील ज्या झोपडपट्टय़ांमधील रहिवाशांचा बायोमेट्रिक सव्‍‌र्हे झाला आहे, तसेच ज्या रहिवाशांनी झोपडपट्टीतील रहिवासाची कागदपत्रे यापूर्वी महापालिकेत दिली आहेत. अशा रहिवाशांच्या याद्या महापालिकेने घरेवाटप करण्यासाठी अंतिम केल्या आहेत. अशा सुमारे एक हजार लाभार्थीना पालिकेने घरे देण्याची तयारी पूर्ण केली आहे, अशी माहिती ‘झोपू’ योजनेच्या अधिकाऱ्याने दिली. झोपू योजनेत एक हजार लाभार्थीना घरे देण्याची प्रशासनाने तयारी पूर्ण केली आहे. लाभार्थीच्या याद्या अंतिम मंजुरीच्या प्रक्रिया पूर्ण केल्या आहेत. शहरात सुरू असलेल्या झोपू योजनेतील प्रकल्पात दोन हजार घरे येत्या काही महिन्यांत उपलब्ध होणार आहेत. कल्याणमधील आंबडेकर नगर झोपू योजनेत २७८ लाभार्थी, डोंबिवलीत दत्तनगरमध्ये १८३ लाभार्थी, इंदिरानगरमध्ये १२६ लाभार्थी आहेत. साठेनगरमधील ७२ रहिवाशांना या योजनेत सहभागी करून घेण्यात येणार आहे. याशिवाय, क्रांतिनगर, म्हसोबानगर, आंबेडकरनगरमधील रहिवाशांच्या याद्या छाननी करण्याचे काम प्रशासनाने सुरू केले आहे. उपलब्ध घरांप्रमाणे या लाभार्थीना कचोरे प्रकल्पात सामावून घेतले जाणार आहे.

कचोरे येथील झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प पूर्ण झाला आहे. प्रशासनाकडे ८०० लाभार्थ्यांची यादी तयार आहे. याशिवाय अन्य लाभार्थी धरून प्रशासनाने एक हजार लाभार्थीना घरे देण्याची प्रक्रिया पूर्ण केली आहे. खरा लाभार्थी हक्काच्या घरापासून वंचित राहणार नाही आणि कोणावर अन्याय होणार नाही यादृष्टीने प्रशासन घरांचे वाटप करणार आहे. कचोरे येथील प्रकल्पात ३३३ लाभार्थी आहेत. या ठिकाणी ४४३ लाभार्थीना घरे देण्याची तयारी पालिकेने पूर्ण केली आहे.   – संजय घरत, अतिरिक्त आयुक्त