ठाणे खाडी किनाऱ्यावर अवैध रेती उपसा करणाऱ्यांविरुद्ध जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी बुधवारी पहाटेपासून धडक कारवाई सुरू केली. मुंब्रा रेतीबंदर, गणेशघाट, मीरा भाईंदर आणि घोडबंदर भागांत झालेल्या कारवाईत बोटी, सक्शन पंप आणि रेती असा सुमारे दोन कोटींपेक्षा अधिक रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. याप्रकरणी तीन जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, अशी माहिती उपविभागीय अधिकारी सुदाम परदेशी यांनी दिली.

खाडी किनाऱ्यावर ठाण्यात ५, तर कल्याणात ३ मुख्य बंदरे असून येथून मोठय़ा प्रमाणात रेतीमाफियांकडून रेती उपसा चालतो. या ठिकाणांवर जिल्हा प्रशासनाच्या वतीने लक्ष ठेवण्यात आले होते. रेती उपशाची माहिती मिळताच प्रांत अधिकारी, तहसीलदार आणि कर्मचाऱ्यांनी थेट धाडी टाकल्या. कर्मचाऱ्यांची चाहूल लागताच रेती उपसा करणारे लोक पळून गेले. मात्र त्यांच्याकडील साहित्य जप्त करण्यात आले. मुंब्रा रेतीबंदर येथे सहा बोटी आणि ११ सक्शन पंप ताब्यात घेण्यात आले. या ठिकाणी तहसीलदार विकास पाटील व इतर कर्मचारी मोहिमेत सहभागी झाले होते. कारवाईनंतर सक्शन पंप्स, ड्रम्स आणि पाइप्स जाळून टाकण्यात आले.

कल्याण मोठागाव येथे दुसऱ्या पथकाने छापा टाकून २ सक्शन पंप्स ताब्यात घेतले आणि १४ गाडय़ांवर कारवाई केली. त्यांच्याकडून ४ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. या ठिकाणी उपविभागीय अधिकारी प्रसाद उकिर्डे आणि तहसीलदार किरण सुरवसे यांनी या कारवाईचे

नेतृत्व केले. खडकपाडा पोलीस ठाणे येथे सतीश शेडगे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून या ठिकाणची १४ ब्रास वाळू जप्त करण्यात आली आहे.

खनिज वाहतुकीवरही कारवाई

जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी अवैध रेती उपसा करणाऱ्या तसेच अनधिकृत बांधकामांविरुद्ध मोर्चा उघडला आहे. आतापर्यंत अवैध रेती वाहतूक करणाऱ्या ८६ गाडय़ांवर कारवाई करून ३० लाख १२ हजार ५५० रुपये इतका दंड वसूल करण्यात आला आहे