उल्हासनगरातील ग्राहकांची गर्दी रोडावली; जीएसटीमुळे झालेल्या भाववाढीचा खरेदीवर परिणाम

दिवाळी म्हणजे भरपूर खरेदी, हे दरवर्षीचे चित्र यंदा पालटले आहे. गेल्या वर्षांतील निश्चलनीकरणानंतर या वर्षांत जीएसटीमुळे वस्तूंच्या किमती वाढल्या असून त्याचा मोठा फटका बाजारपेठेला बसल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. वस्तूंच्या किमती वाढल्याने उल्हासनगरच्या सर्वात मोठय़ा बाजारपेठेत मंदीचे सावट आहे. फटाके, कंदील, विद्युत रोषणाईचे साहित्य, कपडे अशा सर्वच उत्पादनांच्या किमती वाढल्याने ग्राहकांचा उत्साह ओसरला आहे. त्यात परतीचा पाऊस लांबल्याने आणि संध्याकाळच्या ऐन खरेदीच्या वेळी पाऊस पडत असल्यामुळे दिवाळीला आठवडा असतानाही बाजारात मात्र शांतताच आहे.

कल्याण, अंबरनाथपासून ठाण्यापर्यंत सर्वाच्या पसंतीची स्वस्तातली बाजारपेठ म्हणून उल्हासनगर शहर ओळखले जाते. दिवाळीत उल्हासनगरात फटाके, आकाश कंदील, विद्युत रोषणाईचे साहित्या इत्यादींची कोटय़वधींची उलाढाल होते. येथील कपडा बाजारही स्वस्त कपडय़ांसाठी प्रसिद्ध आहे. त्यामुळे दिवाळीत येथे ग्राहकांची मोठी गर्दी असते. मात्र गेल्या वर्षभरात केंद्र सरकारने घेतलेल्या दोन मोठय़ा निर्णयांचा बाजारपेठेवर विपरीत परिणाम झाल्याचे येथील व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.

उल्हासनगरात फटाक्यांच्या घाऊक आणि किरकोळ व्यापाऱ्यांची अनेक दुकाने आहेत. फटाक्यांवर पूर्वी १२ टक्के मूल्यवर्धित कर होता. मात्र आता २८ टक्के वस्तू व सेवा कर (जीएसटी) लावल्याने फटाक्यांच्या किमतीत वाढ झाल्याचे येथील व्यापारी सांगतात. तसेच वाहतुकीवरील करामुळे फटाक्यांच्या किमतीही १० टक्क्यांनी वाढल्या आहेत. त्यात यंदा पावसाने अद्याप निरोप न घेतल्याने त्याचाही परिणाम ग्राहकसंख्येवर झाला आहे.

दिवाळीला अवघे सहा दिवस राहिले असतानाही ग्राहक बाजारात फिरकत नसल्याने फटाका विक्रेत्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. नफ्यात घट करून सध्या जितकी विक्री करता येईल तेवढी केली जात असल्याचे फटाके विक्री व्यावसायिक सागर चुचरिया यांनी सांगितले. त्यांच्या तीन पिढय़ा या व्यवसायात आहेत. कंदील आणि लायटिंगमध्ये चिनी वस्तूंचा भरणा अधिक असतो. त्यांच्या किमतीत वाढ झाली नसली, तरी मागणी कमीच असल्याचे विकी भाटिया यांनी सांगितले.

उल्हासनगर कॅम्प दोन येथील गजानंद मार्केट परिसरात कपडय़ांची शेकडो दुकाने आहेत. दिवाळीत येथे गर्दी उसळते. मात्र  यंदा हा बाजारही ओस पडला आहे. खरेदी निम्म्यावर आली असून ग्राहकांची क्रयशक्ती कमी झाल्यामुळेच मागणी रोडावल्याचा अंदाज आहे. त्यात पावसाचाही मोठा फटका दिवाळीच्या खरेदीला बसला आहे. त्यामुळे यंदाची दिवाळी आतापर्यंत तरी दीनच असल्याचे जाणवते आहे.

चिनी वस्तूंची मागणी कायम

आकाशकंदील, रोषणाई, लहानग्यांच्या बंदुका यात आजही चिनी वस्तूंना मोठी मागणी आहे. मुळात ग्राहक अशा वस्तू विकत घेण्यासाठी येताना देशी-विदेशी असा भेद डोक्यात न ठेवता किंमत आणि वस्तूचे बाह्य़ रूप पाहूनच वस्तू खरेदी करतात, असेही विक्रेते सांगतात. त्यामुळे चिनी वस्तूंवर बहिष्काराचे आवाहन समाजमाध्यमांवर केले जात असले तरी त्याचा परिणाम प्रत्यक्ष बाजारपेठेवर झाला नसल्याचे दिसते.