पर्यावरण दक्षता मंचतर्फे इको फ्रेंडली-पर्यावरणपूरक आकाशकंदील महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. हा महोत्सव सध्या सुरू असून येत्या ७ नोव्हेंबपर्यंत दुपारी ४ ते रात्री ८ या वेळेत शारदा मंदिर, मराठी ग्रंथसंग्रहालय, ४ था मजला, गोखले रोड, नौपाडा, ठाणे (प.) येथे सुरू आहे. इकोफ्रेण्डली कंदील म्हणजे कागदाचे फुगे आहेत. हे फुगे वजनाला हलके व सुरक्षित असतात. यामध्ये आकर्षक रंगाच्या कागदांचा वापर केलेला आहे. खास दिवाळीला आकाशात सोडण्यासाठी या फुग्यांचा वापर केला जातो.
’कधी- शनिवार, ७ नोव्हेंबपर्यंत दुपारी ४ ते रात्री ८
’कुठे- शारदा मंदिर, मराठी ग्रंथसंग्रहालय, ४ था मजला, गोखले रोड, नौपाडा, ठाणे (प.)
दिवाळीसाठी खास खरेदी महोत्सव..

सगळ्यांचा जिव्हाळ्याचा विषय म्हणजे खरेदी. लहानापासून मोठय़ांपर्यंत सर्वाना खरेदी करायला आवडते. हस्तकलेच्या वस्तूंची बाजारपेठ जरा दुर्मीळच. डोंबिवली पूर्व येथे सुरू असलेल्या ‘खरेदी महोत्सव’मध्ये अशाच हस्तकलेच्या वस्तूंचे भव्य प्रदर्शन सुरू आहे. यामध्ये आर्टिफिशियल फुले, क्रॉकरी, लेडीज पर्स, साडय़ा, बनारसी वस्तू तसेच खाद्यपदार्थामध्ये फरसाण, लोणची, मसाले, मालवणी पदार्थ आशा विविध वस्तू व खाद्यपदार्थाची रेलचेल या प्रदर्शनामध्ये पाहायला मिळते. हे प्रदर्शन ३० ऑक्टोबरपासून सुरू झाले असून १० नोव्हेंबपर्यंत सकाळी ११ ते रात्री ९ या वेळेत गावदेवी मैदान, नौपाडा, ठाणे (प.)येथे सर्वासाठी खुले राहणार आहे.
’कधी- १० नोव्हेंबपर्यंत
’कुठे- गावदेवी मैदान, नौपाडा, ठाणे (प.)

तो राजहंस एक..
सुप्रसिद्ध संगीतकार श्रीनिवास खळे यांनी संगीतबद्ध केलेल्या ‘तो राजहंस एक’ या भावगीतांच्या सांगीतिक कार्यक्रमाची पर्वणी दिवाळीच्या निमित्ताने डोंबिवलीकरांसमोर चालून आली आहे. ज्येष्ठ गायक रवींद्र साठे, डॉ. मृदुला दाढे-जोशी, अनुजा वर्तक, धनंजय म्हसकर आणि चिंतामणी सोहोनी आदी कलाकार या वेळी कार्यक्रमात आपली कला सादर करणार आहेत. नरेंद्र बेडेकर कार्यक्रमाचे निवेदन करणार आहेत.
’कधी : बुधवार ११ नोव्हेंबर, वेळ : सकाळी ६.१५ वाजता
’कुठे : गडकरी रंगायतन, ठाणे (प.)
डोंबिवलीकरानो अनुभवा ‘स्त्रीधन’

दिवाळीच्या मुहूर्तावर डोंबिवलीतील नॉलेज कट्टय़ावर ओव्या, उखाणे, खुमासदार कथा, रंजक कविता यांची मैफल अनुभवता येणार आहे. ‘स्त्रीधन’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून ही मैफल आयोजित करण्यात आली आहे. निरक्षर स्त्रियांनी निर्मिलेल्या अक्षरधनाची उधळण या कार्यक्रमातून होणार आहे. महाराष्ट्र तसेच महाराष्ट्राबाहेर गाजलेल्या या कार्यक्रमाचा १०१ वा खास प्रयोग डोंबिवलीत होत आहे. सुप्रसिद्ध वृत्तनिवेदिका दीपाली केळकर या कार्यक्रमाचे सादरीकरण करणार आहेत. या कार्यक्रमाच्या प्रवेशिका शुभ मंगल कार्यालय, एवरेस्ट शॉपिंग सेंटर, डोंबिवली (पू.) आणि एवरेस्ट हाऊस, डोंबिवली (प.) येथे उपलब्ध असून रसिकांनी हे स्त्रीधन अनुभवण्यासाठी उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. नोंदणीसाठी संपर्क- ७०४५४५३४१३.
’कुठे – किंग्ज पार्टी हॉल, रसरंजन हॉटेलच्या वर, एव्हरेस्ट शॉपिंग सेंटर, डोंबिवली (प.)
’कधी – शनिवारी, ७ नोव्हेंबरला सायंकाळी ५ वाजता.

इंडियन सागा रॉकची धूम ठाणेकर अनुभवणार

बॅण्ड म्हटलं की डोळय़ांसमोर रॉक, पॉप संगीताचे बॅण्ड येतात. लोकसंगीत आणि पाश्चिमात्य वाद्यांचा संगम घडवून तयार करण्यात आलेल्या ‘इंडियन सागा रॉक बॅण्ड’ची धूम ठाणेकरांना अनुभवता येणार आहे. नॅशनल स्कूल ऑफ परफॉर्मिग आर्टचे विद्यार्थी ध्रुव राठोड, केनिल सांगवी, प्रयाग शेणॉय, राहुल नायक, तेजस पारेख हे रॉक बॅण्डचा नजराणा सादर करणार आहेत. विविआना मॉल व्यवस्थापनातर्फे ठाणेकरांच्या वीकेण्डची रंगत वाढविण्यासाठी रॉक बॅण्डचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार, ७ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६.३० ते रात्री ९ या वेळेत विविआना मॉल, ठाणे (प) येथे हा कार्यक्रम होणार आहे.
’कधी- शनिवार, ७ नोव्हेंबर, वेळ : सायं. ६.३० ते रात्री ९
’कुठे- विविआना मॉल, ठाणे (प.)