ध्वनी मर्यादेचा भंग केल्याबद्दल होणाऱ्या नाहक कारवाईच्या पार्श्वभूमीवर ऑडिओ अॅण्ड लायटनिंग असोसिएशन (पाला) संतापली आहे. या संतापामुळे यंदा संघटनेने स्वातंत्र्यदिन आणि दहीहंडी या दुहेरी उत्सवात साऊंड सिस्टिम न वाजवण्याचा निर्णय घेतलाय. दरवर्षी साऊंड सिस्टीम व्यावसायिकावर ध्वनी मर्यादेचे बंधन घातले जाते. आयोजक किंवा नेतेमंडळी कार्यक्रमाचे आयोजन करत असले, तरी कारवाई मात्र साऊंड सिस्टीम व्यावसायिकावर होते. या नाहक त्रासाला कंटाळून संघटनेने हा निर्णय घेतलाय.

साऊंड सिस्टीम व्यावसायिकाला डेसिबलचे योग्य ज्ञान नसते. तसेच कारवाई करत असताना पोलीस यंत्रणा साउंड सिस्टीम व्यावसायिकासोबत असभ्य वर्तन होते, असा आरोप संघटनेने केलाय. साउंड सिस्टीम व्यावसायिकावर ६० ते ६५ डेसिबल ध्वनी तीव्रतेची मर्यादा असते. ही मर्यादा रद्द करण्याची मागणी संघटनेने केली. ठाणे, मुंबई, पुणे, सातारा, नाशिक, नागपूर, कोल्हापूर यासह राज्यातील २६ ठिकाणी ही संघटना कार्यरत आहे. ध्वनी तीव्रतेची डेसिबल मर्यादा रद्द न केल्यास राज्यातील सर्व कार्यक्रम आणि सणांमध्ये साऊंड सिस्टीम न वाजविण्याचा निर्णय घेतला जाईल. तसेच वेळ पडल्यास कोर्टात जाऊ, असा इशाराही संघटनेने दिलाय. ध्वनी तीव्रतेच्या मर्यादेबद्दल असोसिएशनचे सेक्रेटरी राजू नायडू म्हणाले की, ध्वनी तीव्रतेची मर्यादा घालून देणाऱ्या शासनाने आणि कोर्टाने आम्हाला डेसिबलची योग्य माहिती देण्याची गरज आहे.