२५ जुन २०१४. मुंब्रा येथे शाहीद नसीम सय्यद हा शाळकरी मुलगा सकाळी शाळेत जात असताना भटक्या कुत्र्यांच्या टोळक्याने त्याच्यावर हल्ला करून लचके तोडले. या मुलाच्या शरीराला उपचारादरम्यान सुमारे शंभर ते दीडशे टाके घालावे लागले. त्याच्या चारच दिवस आधी ठाण्यातील महागिरी परिसरात भटक्या कुत्र्यांनी सबा बेगुवाला या २२ वर्षीय तरुणीवर हल्ला केल्याची घटना उघड झाली. पहाटे कामावर जात असताना कुत्र्याच्या टोळक्याने तिच्यावर हल्ला केला. तर मागच्या महिन्यात मुंब्रा येथील अमृतनगर भागात खेळत असलेल्या हमदान अहमद या तीनवर्षीय मुलावर भटक्या कुत्र्यांनी हल्ला केला. ठाण्यात सातत्याने घडणाऱ्या घटनांमध्ये या तीन घटना अधिकच हिंस्र स्वरूपाच्या होत्या. त्यामुळे याकडे सगळ्यांचेच लक्ष वेधले गेले. आत्तापर्यंत रस्त्यावर भुंकून रात्रीच्या वेळी झोपमोड करणारे कुत्रे नागरिकांवर थेट हल्ला करीत असल्याच्या या घटनांनी सामान्य नागरिकांमध्ये दहशत पसरवण्यास सुरुवात केली होती. या प्रकारानंतर ठाणे आणि मुंब्य्रामध्ये एकाच परिसरात अनेक नागरिकांना कुत्रा चावल्याचे प्रकारसुद्धा समोर येऊ लागल्याने याविषयी नागरिकांमध्ये महापालिकेच्या धोरणाविरोधात संतप्त भावना निर्माण होऊ लागली आहे. या घटनानंतर जाग्या झालेल्या महापालिका प्रशासनाने विशेष उपाययोजना राबवल्याचा आव आणण्यास सुरुवात केली. मात्र यामुळे शहरातील कुत्र्यांच्या संख्येवर कोणता परिणाम झाला याचे उत्तर कोणालाच देता येत नाही. आरोग्य विभाग मात्र कुत्र्यांच्या संख्येत घट होत असल्याचा दावा करात असला तरी प्रत्यक्षात स्थिती खूपच भिन्न आढळत आहे. ठाण्यातील मुंब्रा, दिवा परिसरामध्ये मांसाहारी वस्ती मोठय़ा प्रमाणात असून या भागात कचराकुंडय़ांमध्ये मांसाचे तुकडे टाकले जातात. यामुळे या भागामध्ये कुत्र्यांची संख्या भरमसाट वाढू लागली आहे. त्यामुळे श्वानदंशाच्या घटनाही सर्वाधिक याच भागात आहे. मच्छी मार्केटचा परिसर, मुंब्य्रातील विविध भाग तसेच दिवा आणि कल्याणच्या आधारवाडी क्षेपणभूमीच्या परिसरात कुत्र्यांची मोठी संख्या आहे. अनेक भागांमध्ये भर रस्त्यांमध्ये मटण, मासे आणि मांस विक्रेते बसू लागले असल्याने भर वस्तीमध्ये सुद्धा अशा दुकानांच्या परिसरात कुत्र्यांनी आश्रय घेतला आहे. महापालिकेने प्रस्तावित केलेल्या जागा सोडून इतर ठिकाणी फेरीवाल्यांनी दुकाने थाटली आहेत. मटण विक्रीबरोबरच मासे विक्रेत्यांनीही शहराच्या मोक्याच्या जागा पटकावल्या आहेत. या ठिकाणी मटण कापण्याची व धुण्याची व्यवस्था नसल्याने विक्रेते रस्त्यावरच मटण कापतात व उरलेला कचरा त्याच ठिकाणी नाल्याच्या आसपास फेकून देतात. त्यातून भटक्या कुत्र्यांना खाद्य मिळते. तसेच शहरातील चायनीज विक्रेते मांसाहारी खाद्यपदार्थ तयार करतात व उरलेले अन्न रस्त्यावर टाकतात. त्यामुळे भटकी कुत्री या मांसाहारी खाद्यपदार्थाना चटावतात. म्हणूनच मांसविक्रीचा व्यवसाय चालतो तेथे कुत्र्यांची संख्या अधिक आढळते. कुत्र्याची जडणघडण ही मांसाहारी प्राणी अशीच झालेली असून त्याला मांसाहारी खाद्य मिळणे गरजेचे ठरते, अन्यथा तो हिंसक होण्याची शक्यता असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. कुत्र्यांच्या संख्येवर र्निबधासाठी उघडय़ावरची मांसविक्री व चायनीज गाडय़ांच्या कचऱ्याचा प्रश्न निकाली काढणे गरजेचे आहे.
श्रीकांत सावंत