डोंबिवलीतील प्रवाशांची उन-पावसाचा मारा झेलत रेल्वे स्थानकामध्ये ये-जा
डोंबिवली रेल्वे स्थानकातील पादचारी पुलावर छप्पर नसल्याने प्रवाशांना उन्हा-पावसाचा मारा झेलत ये-जा करावी लागते. नागरिकांची ही समस्या लक्षात घेऊन गेल्या वर्षी प्रशासनाने पुलावर छप्पर घालण्याच्या कामास मंजुरी दिली. निवडणुकीच्या काळात या छपराचे काम सुरू झाल्याच्या अफवाही पसरल्या. बांधकाम सुरू झाल्याचे फलकही झळकले. प्रत्यक्षात अजूनही काम सुरू झालेले नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी आहे.
डोंबिवली पूर्व व पश्चिमेला जोडणाऱ्या पादचारी पुलाचे काम २००४ मध्ये नवव्या पंचवार्षिक योजनेच्या मेगासिटी प्रकल्पाअंतर्गत करण्यात आले होते. या पुलाची लांबी ६०० मीटर तर रुंदी पाच मीटर आहे. रेल्वे व महापालिकेच्या हद्दीत हा पूल विभागला गेलेला आहे. पुलावर शेड नसल्याने प्रवाशांना ऊन व पावसाचा मारा सहन करावा लागत आहे. हा पूल अत्यंत वर्दळीचा असल्याने पावसाळ्यात नागरिकांना छत्री उघडून पुलावरून चालणे कठीण होते. उन्हाळ्यातही उन्हाच्या झळा सहन कराव्या लागत असल्याने काही पादचारी तर पुलाच्या खालून जाणे पसंत करतात. पादचारी पुलावर शेड बांधण्याची मागणी माजी स्थायी समिती सभापती दीपेश म्हात्रे यांनी पालिका प्रशासनाकडे केली होती. या विषयाला २०१४ मध्ये मंजुरी मिळाली. तसेच शेड बांधण्यासाठी ३ कोटी ३४ लाखांचा निधीही मंजूर करण्यात आला. या निधीअंतर्गत पुलाचे रंगकाम, पर्जन्य जलसंधारण, जलवाहिनी बदलणे, रेलिंग बसवणे ही कामे केली जाणार आहेत.
महापालिका निवडणुकीच्या तोंडावर दीपेश म्हात्रे यांनी या पुलाचे बांधकाम सुरू झाल्याचे फलक झळकवले. मात्र निवडणुका संपून दोन महिन्यांचा कालावधी उलटला तरी बांधकाम सुरूझाल्याचे कोणतेही चिन्ह नाही. रेल्वे समस्या जाणून घेण्यास खासदार कमी पडतात आणि लोकप्रतिनिधीही केवळ आश्वासने देऊन नंतर फरार होतात. सामान्य जनतेचे कुणालाच काही पडलेले नाही. केवळ कामाचे श्रेय लाटून निधी बळकावण्यासाठी हे सर्व सोपस्कार असल्याच्या तिखट प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करतात.