रस्ते, गटारे यांच्या कामांसाठी शहरात जागोजागी खोदकाम
पावसाळा तोंडावर आल्याने वाहतूक विभागाकडून ३० एप्रिलनंतर बांधकामाला परवानगी मिळणार नाही या भीतीने महापालिका अधिकारी आणि ठेकेदारांनी एप्रिल महिन्याच्या शेवटच्या दिवसात जागोजागी रस्ते, गटारे यासारख्या कामांसाठी मोठय़ा प्रमाणावर खोदकामे सुरु केली आहेत. त्यामुळे जागोजागी धूळ, खड्डे आणि वाहतुकीचे मार्ग बदलल्याने कोंडीचे दृश्य शहरांच्या विविध भागात दिसत आहे.
पावसाळा तोंडावर आला की निधी संपविण्यासाठी, पावसाळ्यापुर्वीची कामे मार्गी लावण्यासाठी घाई करायची, असे प्रकार कल्याण डोंबिवलीकरांना नवे नाहीत. या परंपरेचे जतन महापालिकेत साचेबध्द काम करणारे, सुस्त अधिकारी यंदाही प्रामाणिकपणे करीत आहेत. गेल्या वर्षी वाहतूक विभागाने घेतलेल्या एका आढाव्यात पालिकेचे ठेकेदार सुस्तपणे, वाहतूक विभागाला अंधारात ठेऊन रस्त्यांची खोदाई करीत असल्याचे निदर्शनास आले होते. दिलेल्या मुदतीत ठेकेदार रस्त्यांची कामे पूर्ण करीत नसल्याचे व काम करण्याची मुदत संपली तरी काम करीत असल्याचे वाहतूक अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले होते. गेल्या वर्षी वाहतूक विभागाने आक्रमक व कडक भूमिका घेऊन कोणत्याही परिस्थितीत ३० एप्रिलनंतर एकही खड्डा शहरात खणायचा नाही, असे आदेश काढले होते. रस्ते, गल्लीबोळातील सर्व कामे ३१ मे पूर्वी पूर्ण करण्याचे आदेश पालिका प्रशासनाला दिले होते. त्यामुळे यावेळी वाहतूक विभागाकडून उपद्रव नको या भीतीने एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवडय़ात शहरातील गल्लीबोळ, मुख्य रस्ते ठेकेदारांनी जेसीबीच्या साहाय्याने खोदून ठेवले आहेत.
अनेक ठिकाणी दोन ते तीन महिन्यापासून सीमेंट रस्त्यांची कामे सुरू आहेत. या रस्त्यांच्या परिसरात राहणारे रहिवासी उडणाऱ्या धुळीने हैराण आहेत. खिडक्या किती दिवस बंद ठेवायच्या, असा रहिवाशांचा प्रश्न आहे. याशिवाय, वाहन चालक धुळीने हैराण झाले आहेत. कल्याण पूर्व, पश्चिम, डोंबिवली पूर्व, पश्चिम भागात रस्ते खोदाईचे चित्र दिसून येत आहे. पाणी टंचाईमुळे यावेळी अनेक चाळी, सोसायटय़ांनी पालिकेच्या जलवाहिन्यांवरुन चोरून, लपून नळ जोडण्या घेतल्या आहेत. या जोडण्या घेताना अनेक ठिकाणी रस्ते खोदून ठेवण्यात आले आहेत. त्या ठिकाणचे माती, दगडांचे ढीग मागील दोन ते तीन महिने एकाच जागी पडून आहेत.

डोंबिवली पश्चिमेत महात्मा फुले रस्त्यावर आठ ते नऊ ठिकाणी रस्त्याच्या कोपऱ्यांवर नळ जोडणीचे खड्डे खणून तेथे मातीचे ढिग रचून ठेवले आहेत.
एका माजी नगरसेवकाच्या बंगल्याबाहेरील गटार, रस्त्याची पट्टी अर्धवट स्थितीत ठेवण्यात आली आहे.
सुभाष रस्ता, गुप्ते रस्ता याठिकाणी अशीच परिस्थिती पाहण्यास मिळत आहे.
पंडित दिनदयाळ रस्ता गेल्या दोन महिन्यापासून सीमेंट रस्त्यांसाठी जागोजागी खोदून ठेवला आहे. या रस्त्यावरील गणेश मंदिरासमोरील काम एक महिना ठप्प होते. ते दोन दिवसापूर्वी सुरू करण्यात आले.

कल्याण पूर्वेलाही फटका
कल्याण पूर्वेतील अनेक रस्ते असेच खोदून ठेवण्यात आले आहेत. पावसाळ्यापूर्वी ही कामे पूर्ण झाली नाहीत तर या खड्डय़ांमध्ये तलाव तयार होतील आणि काही दुर्घटना घडली तर त्याची जबाबदारी कोण घेणार, असे प्रश्न रहिवाशांकडून करण्यात येत आहेत. प्रशासनातील अधिकारी मात्र कामे वेगाने सुरु आहेत. ही कामे मेअखेपर्यंत पूर्ण होतील, अशी अपेक्षा व्यक्त करीत आहेत.