पावसाळा तोंडावर आला तरी शहरात अजूनही रस्त्यांची कामे सुरूच आहेत. अर्धवट कामे, जागोजागी माती, डेब्रिजचे ढीग, वाहतूक कोंडी, मातीचा उडणारा धुरळा यामुळे डोंबिवली पश्चिमेतील दीनदयाळ रोडवरील नागरिक हैराण झाले आहेत. नाकावर रुमाल लावूनच रहिवाशांना रेल्वे स्थानक गाठावे लागत असून या भागातील व्यापारी आणि हॉटेल चालकांनाही या धुरळ्याचा त्रास होऊ लागला आहे.
डोंबिवली पश्चिमेतील रेल्वे स्थानकाजवळ दीनदयाळ रस्ता स्थानकापासून ते सम्राट चौकापर्यंत दोन्ही बाजूने खणला आहे. या रस्त्याच्या सीमेंट कँाक्रीटीकरणाचे काम दिवाळीनंतर करण्यात येणार आहे. या रस्त्यावर सद्य:स्थितीत भूमिगत मलनिस्सारण वाहिनी टाकण्याचे काम महापालिकेच्या वतीने पूर्ण करण्यात आले आहे. पावसाळा तोंडावर आला असल्याने या रस्त्याचे डांबरीकरण करून देण्याचे आश्वासन पालिका प्रशासनाच्या वतीने नागरिकांना देण्यात आले असले तरी अद्यापही हे काम हाती घेण्यात आलेले नाही. त्यामुळे महापालिकेच्या कथनी आणि करणीत फरक असल्याची टीका सर्वसामान्यांकडून केली जात आहे.
रेल्वे स्थानकावरून देवीचा पाडा, उमेशनगर, रेतीबंदर रोड आदी परिसरांत ये-जा करण्यासाठी याच रस्त्याचा वापर नागरिकांना करावा लागतो. या रस्त्यावर खडी, मातीचे ढिगारे जसेच्या तसे आहेत. तसेच रस्त्यावर महापालिकेच्या वतीने स्टोन पावडर टाकण्यात येत आहे. परंतु दोन दिवस स्टोन पावडर टाकल्यानंतर कामगार येथे फिरकलेले नाहीत. त्यामुळे या रस्त्याचे डांबरीकरण कधी होणार असा सवाल नागरिक करत आहेत. या धुरळ्यामुळे नागरिकांना नाकाला रुमाल लावूनच येथून ये-जा करावी लागत आहे. वाहनांच्या सततच्या रहदारीमुळे मातीचा धुरळा हवेत उडत असून रस्त्याच्या बाजूला राहणाऱ्या नागरिकांच्या घरात तसेच दुकानांमध्ये मातीचा थर जमा होतो.याच रस्त्याच्या लगत असलेले औषधविक्रेते हेमंत पवार यांच्या मते गेल्या महिभरापासून पालिकेने हा रस्ता खोदून ठेवला आहे. या मातीच्या धुराळ्याने आम्ही पुरते हैराण झाले असून परिसरातील नागरिकांना घशाचा आजार, खोकला, सर्दी अशा साथीच्या आजाराने ग्रासले आहे. रस्ते खोदल्याने दुकानात ये-जा करताना नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. तसेच उडणाऱ्या मातीमुळे नाकाला रुमाल बांधूनच धंदा करावा लागत असल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे.

महापालिकेचे केवळ आश्वासन
शहरात सुरू असलेल्या सीमेंट काँक्रीटीकरणाची कामे ३१ मेपर्यंत पूर्ण होतील असे सांगण्यात आले होते. मात्र ही कामे वेळेत पूर्ण झाली नसल्यामुळे १० जूनपर्यंत ती मार्गी लागतील, असे आश्वासन प्रशासनाच्या वतीने देण्यात आले आहे. दरम्यान, सुरू असलेली कामे पूर्ण करणे व उर्वरित कामे दिवाळीनंतर हाती घेण्यात येणार असली तरी रस्त्यांच्या दुतर्फा असलेले मातीचे ढिगारे, डेब्रीज, खोदलेले रस्ते बुजविण्याची कामे १० जूनपर्यंत तरी पूर्ण होतील का असा सवाल रहिवाशांकडून व्यक्त केला जात आहे.