शहरातील कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी महापालिका प्रशासनाने जागोजागी कचराकुंडय़ा उभ्या केल्या. मात्र काही ठिकाणी कचराकुंडय़ाच नसल्याने रहिवाशांना रस्त्यावरच कचरा टाकावा लागतो किंवा काहीतरी पर्याय शोधावा लागतो. आता डोंबिवलीकरांनी कचरा रिता करण्यासाठी असाच एक पर्याय शोधला आहे. डोंबिवली पूर्व भागातील टिळक रस्त्यावर काही दिवसांपूर्वी एक जळाळेली कार उभी करण्यात आली. भंगारातील या कारचा उपयोग डोंबिवलीकरांनी चक्क कचरा फेकण्यासाठी केला. पालिका प्रशासन येथे कचराकुंडीची सोय करत नसल्याने हीच आता या परिसरातील रहिवाशांची कचराकुंडी आहे.
शहरातील टाटा लाइनच्या बाजूला मानव कल्याण केंद्र परिसरात पूर्वी ही जळालेली कार उभी होती. गुढीपाडव्याला नववर्ष स्वागत यात्रेनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस डोंबिवलीत आले होते. टाटा लाइनखालील रस्त्यावरून मुख्यमंत्र्यांचा ताफा जाणार होता. मात्र वाटेतच ही कार येत असल्याने पोलिसांनी ही गाडी तेथून हटवून वर्दळीच्या टिळक रस्ता परिसरात आणून ठेवली. पूर्वी येथे कचराकुंडी होती. मात्र ती नसल्याने त्याच्या जागी ही कार आल्याने परिसरातील रहिवाशांनी या कारमध्येच कचराफेक करण्यास सुरुवात केली.
या भागात कचराकुंडी नसल्याने पयार्य नसल्याचे येथील रहिवाशांचे म्हणणे आहे. पालिकेचे सफाई कामगार या गाडीतील कचरा काढत नसल्याने गाडी कचऱ्याने भरून गेली आहे. त्यामुळे कचरा कुजला असून परिसरात दरुगधी पसरली आहे. कल्याण-डोंबिवली शहरातील कचऱ्याची योग्यप्रकारे विल्हेवाट लावा, असे स्पष्ट आदेश उच्च न्यायालयाने काही दिवसांपूर्वी दिले होते. मात्र त्यानंतरही महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी कसे
सुस्त आहेत, हेच या घटनेवरून दिसून येते.