शिवसेनेच्या कार्यक्रमामुळे शहराची स्वच्छता झाल्याने नागरिकांची प्रतिक्रिया
शिवसेनेच्या वतीने शनिवारी स्वच्छता अभियानाचा शुभारंभ करण्यात आल्याने आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे शहरातील विविध भागातील रस्त्यांची पाहणी करणार असल्याने अस्वच्छतेचा बट्टा लागलेल्या कल्याण-डोंबिवली शहरांचा कानाकोपरा शनिवारी स्वच्छ करण्यात आला होता. उद्धव ज्या परिसराची पाहणी करणार होते ते रस्ते स्वच्छ करण्यात आले होते. रेल्वे स्टेशन परिसरातही स्वच्छता करण्यात आली होती. या भागातील फेरीवाल्यांवर कारवाई करण्यात आली होती. मात्र, उद्धव यांची पाठ फिरताच रविवारी हा परिसर पुन्हा एकदा फेरीवाल्यांनी गजबजून गेला. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांमधून ‘उद्धव, तुम्ही रोज या’, अशीच प्रतिक्रिया उमटताना दिसत होती.
कल्याण-डोंबिवली शहराचा स्वच्छतेच्या यादीत शेवटचा क्रमांक लागल्याने हा बट्टा पुसून काढण्यासाठी शिवसनेच्यावतीने स्वच्छता अभियानाची सुरुवात करण्यात आली आहे. या मोहिमेस ‘परिवर्तन’ असे नाव देण्यात आल्याने शनिवारी उद्धव यांच्या दौऱ्याविषयी उत्सुकता शिगेला पोहचली होती. मात्र, विधान परिषद निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे या दौऱ्यावर विरजण पडल्याचे चित्र दिसून आले. या अभियानाच्या शुभारंभाला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे डोंबिवलीत येणार असल्याने शहरातील फेरीवाल्यांना हटविण्यात आले होते. स्टेशन परिसरातील कचरा उचलण्यात आला होता. रेल्वे स्थानकातील भिंतींवर दोन दिवसात रंगरंगोटी करण्यात आली होती. स्टेशन परिसरातील स्कायवॉकलाही रंगरंगोटी करून तेथे बसणारे फेरीवाले हलविले होते. यामुळे शनिवारी या ठिकाणाहून प्रवास करताना नागरिकांना हायसे वाटत होते.

मधुबन टॉकीज येथे नेहमी दिसणारा फेरीवाल्यांचा कलकलाट शनिवारी नव्हता. परंतु रविवारी पुन्हा ही गल्ली वस्तू विक्रेत्यांनी फुलून गेली. पालिका प्रशासनही फेरीवाल्यांविषयी ठोस उपाययोजना राबवत नाही. परंतु शनिवारी जो दिखावा पक्षाच्या लोकप्रतिनिधींनी केला तो जर नेहमी केला तर नक्कीच शहर सुशोभित होईल.
– आशा तांबोळी, डोंबिवली

शिवसेना पक्षप्रमुखांनी प्रथम आपल्याच पक्षाच्या लोकप्रतिनिधींना सूचना कराव्यात. शनिवारी पक्षप्रमुख येणार तेही स्वच्छता अभियानाला, म्हणून शहर स्वच्छ सुंदर करण्यात आले. उद्धव यांनी दररोज डोंबिवलीत एक फेरी मारावी जेणेकरून येथील नागरिक मोकळ्या हवेत श्वास घेतील.
– स्वानंद केतकर, डोंबिवली