पुनर्वसनाशिवाय रेल्वे प्रशासनाच्या कारवाईला विरोध
उरण दादरी डेडिकेटेड फ्रंट कॉरिडॉर प्रकल्पामुळे डोंबिवली परिसरातल्या रेल्वे रुळांलगत राहणाऱ्या स्थानिकांचा पुनर्वसनाचा प्रश्न उभा राहिला आहे. केंद्राच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पास आमचा विरोध नाही, परंतु आमचे पुनर्वसन केल्याशिवाय प्रशासनाने कारवाई करूनये, अशी बाधितांची भावना आहे. रेल्वे प्रशासनाच्या या कारवाईचा निषेध करण्यासाठी सर्व बाधित नागरिकांमध्ये साईनाथवाडी व साईनाथ नगर झोपडपट्टी पुनर्वसन महासंघाच्या नेतृत्वाखाली रस्त्यावर उतरत प्रशासनाचा निषेध केला. खासदारांनी आमचे पुनर्वसन झाल्याशिवाय कारवाई होणार नाही, असे आश्वासन दिले असले तरी आमचे पुनर्वसन होईपर्यंत आम्ही दररोज रस्त्यावर उतरणार असल्याचे येथील रहिवाशांनी यावेळी सांगितले.
जेएनपीटीतून होणारी मालवाहतूक अधिक वेगाने व्हावी यासाठी केंद्राने काही मार्ग प्रस्थापित केले आहेत. त्यात उरण दादरी डेडिकेटेड फ्रंट कॉरिडॉरचा समावेश आहे. उरण येथून सुरू होणारा हा मार्ग पनवेल, दिवामार्गे पश्चिम रेल्वेने दादपर्यंत जाणार आहे. मालवाहतूक वेगाने व्हावी यासाठी दोन मार्ग टाकले जाणार आहेत. त्यासाठी लागणारी जमीन संपादित करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या मार्गामुळे डोंबिवलीतील आयरे गाव, मोठा गाव, कोपर, भोपर या गावातल्या नागरिकांपुढे विस्थापनाचा प्रश्न उभा राहिला आहे. मंगळवारी सकाळी न्यू आयरे रोड येथील साईनाथनगर येथील झोपडपट्टय़ांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे समजल्याने नागरिकांनी सकाळीच रस्त्यावर उतरत ठिय्या आंदोलन केले.
रेल्वे प्रकल्पास आमचा विरोध नाही, परंतु आमचे आधी पुनर्वसन करा, नंतर येथील झोपडय़ांवर कारवाई करा एवढेच आमचे म्हणणे असल्याचे नागरिक सांगतात. गेली ४० वर्षे आम्ही येथे रहात असून पालिकेच्या सर्व सोयीसुविधा येथील घरांना आहेत. झोपडपट्टी पुनर्वसन सर्वेक्षणात घरांचे सर्वेक्षणही झालेले आहे. पालिकेने आम्हाला घरे दिल्यानंतर रेल्वे प्रशासनाने आपली कारवाई करावी. मुलांच्या परीक्षा सुरूअसून या दिवसांत आम्ही बेघर झालो तर जाणार कुठे असा त्यांचा सवाल आहे. त्यामुळे जोपर्यंत आमचे पुनर्वसन होत नाही तोपर्यंत दररोज आम्ही रस्त्यावर उतरून रेल्वे प्रशासनाचा निषेध करणार असल्याचे महासंघाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन केरी यांनी सांगितले.