डोंबिवली ठाकुर्ली दरम्यान भरसकाळी काळजाचा थरकाप उडविणाऱ्या किशोर चौधरी यांच्या गोळीबार प्रकरणाला आता वेगळ वळण आल्याचे दिसून आले आहे. डोंबिवली ठाकुर्ली दरम्यान असलेल्या चोळेगाव येथे ९ मे रोजी (मंगळवारी) या हत्याकांड प्रकरणातील शूटर भोईर पिता-पुत्र चौकडीने दि. ११ मे रोजी पोलिसांकडे आत्मसमर्पण केले होते. तर त्यांचे दोन साथीदार आंधळे कुटुंबीय अशा एकूण ६ जणांना पोलिसांकडून अटक करण्यात आली होती. या सहाही आरोपींनी किशोरच्या हत्येनंतर किशोरचा साथीदाराला पळवून त्याचीही हत्या केल्याचे समोर आले आहे. या सहाही आरोपींना कल्याण न्यायालयाने दि. १९ मे पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. तर चौधरी यांची पत्नी संजीवनी चौधरी यांनी पोलिसांकडून आपल्या पतीच्या मारेकऱ्यांना व्हीआयपी वागणूक दिली जात असल्याचा आरोप केला असून आपल्या पतीची हत्या करणाऱ्या या नराधमांना फाशीची शिक्षा देण्याची मागणी त्यांनी केली आहे.

दि. ९ मे रोजी सकाळच्या सुमारास चोळेगावतील बालाजीनगरमध्ये असलेल्या देवी शिवामृत सोसायटीच्या तळमजल्यावरील व्ही. जी. गावडे यांच्या घरात दुरूस्तीचे काम सुरू होते. याच वेळी काळजाचे ठोके चुकवणारे हत्याकांड घडले. दुरूस्तीचे काम आमच्या विभागात येऊन का करतो, असा सवाल करत भोईर कुटुंबीय आणि त्यांच्या इतर साथीदारांनी ठेकेदार किशोर चौधरी याच्यावर तब्बल २३ गोळ्या झाडल्या होत्या. यात किशोर रक्ताच्या थारोळ्यात तडफडून जागीच ठार झाला होता. तर किशोरचा सहकारी नितीन जोशी याच्या छातीत एक गोळी घुसून तो देखील जबर जखमी झाला होता. हल्लेखोरांनी किशोरचा दुसरा सहकारी महिमादास विल्सन याच्यावर देखील गोळी झाडली होती. खांद्याला गोळी लागून तो देखील जखमी झाला होता. हल्लेखोर भोईर कुटुंबीय आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी त्याला जखमी अवस्थेतच गाडीत टाकून पळ काढला होता. या सहाही आरोपींना शोधण्यासाठी पोलिसांची पाच पथके वेगवेगळ्या दिशांना जंग जंग पछाडत होती. त्यानंतर कधी ना कधी आपण पकडले जाण्यापेक्षा भोईर पिता-पुत्रांनी पोलिसांकडे आत्मसमर्पण करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी एका बड्या नेत्याने मध्यस्थी केल्यानंतर या भोईर कुटुंबियातील चौघांनी पोलिसांकडे शरणागती पत्करली. यातील भोईर कुटुंबियांचे दोन साथीदार यांचा छडा लावण्यासाठी कल्याण गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातल्या माळेगाव एमआयडीसीत घुसून एका घरावर धाड टाकली.

 

या सहाही आरोपींना ताब्यात घेतल्यानंतर यांच्याकडून कसून चौकशी केली असता, घर दुरूस्तीचे काम आमच्या विभागात येऊन का करतो? या वादातूनच हा हत्याकांड झाल्याचे स्पष्ट झाले. या सहाही जणांनी किशोर व त्याच्या साथीदारांवर २३ गोळ्या झाडल्यानंतर किशोरचा साथीदार महिमादास विल्सनला जखमी अवस्थेत अपहरण करून गाडीत घेवून गेले होते. त्याची गाडीतच हत्या करून त्याचा मृतदेह महाबळेश्वर – पोलादपूर दरम्यान फेकून दिला होता. हे गोळीबार करून दुहेरी हत्याकांड असल्याचे समोर आल्यानंतर पोलिसांनी दिलीप भोईर त्याचा मुलगा सूरज भोईर, शंकर भोईर, त्याचा मुलगा चिराग उर्फ सागर भोईर आणि त्यांचे दोन साथीदार कुणाल आंधळे व त्याचा भाऊ परेश आंधळे या सहाही आरोपींना कल्याण सत्र न्यायालयात हजर केले. कल्याण न्यायालयाने या सहा आरोपींना दि. १९ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

या संपूर्ण प्रकरणाचा छडा लावण्यासाठी कल्याण गुन्हे अन्वेषण शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेंद्र नगरकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक विजय खेडकर, दत्ताराम भासले, राजेंद्र खिलारे, नरेश जोगमार्गे, सचिन साळवी आणि हरिश्चंद्र बंगारा या पथकाने ही कामगिरी हत्याकांड घडल्यापासून अवघ्या ४८ तासांच्या आत उघडकीस आणली.