मृतांची संख्या ११, प्रोबेस कंपनीच्या संचालकांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा
डोंबिवली औद्योगिक वसाहत परिसरात गुरुवारी झालेल्या भीषण स्फोटाने भयकंपित झालेल्या डोंबिवलीवर शुक्रवारीही औदासिन्याचे गडद सावट होते. स्फोटात जमीनदोस्त झालेल्या प्रोबेस एन्टप्रायसेस कंपनीच्या आवारातील ढिगारे उपसण्याचे काम राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकातर्फे सुरू आहे. वायुगळतीचा धोका असल्याने अतिशय काळजीपूर्वक हे काम सुरू आहे. स्फोटानंतर काही कामगारांचा शोध अद्याप लागलेला नसल्याने त्यांच्या आप्तांचे मनोधैर्य खचले आहे. हे आप्त ढिगारे उपसले जात असलेल्या ठिकाणी बसून आहेत. प्रोबेसचे डॉ. विश्वास वाकटकर यांची दोन्ही उच्चशिक्षित मुले नंदन (३२) व सुमीत (३०) आणि सून स्नेहल (२८) यांचाही मृत्यू या स्फोटात झाल्याने त्यांच्याही कुटुंबियांना या आघातातून सावरणे कठीण झाले आहे. या स्फोटावरून प्रोबेसच्या व्यवस्थापनावर शुक्रवारी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला आहे.
स्फोटात गुरुवारी सापडलेल्या एका मृताची ओळख पटली नव्हती. तो मृतदेह सुमीत वाकटकर यांचा असल्याचे शुक्रवारी स्पष्ट झाले. इमारतीच्या गच्चीत शुक्रवारी आढळलेला मृतदेह हा त्यांची पत्नी स्नेहल यांचा असल्याची ओळख पटली असून स्फोटात उडून त्या गच्चीवर पडल्याचे पोलिसांनी सांगितले. या स्फोटात २०१ जण जखमी झाले आहेत. त्यातील ४७ जणांवर रुग्णालयात उपचार सुरू असून १५४ जखमींना उपचारानंतर शुक्रवारी घरी जाऊ देण्यात आले. चौदा रुग्णांवर एम्स, शिवम आणि नेपच्युन रुग्णालयांच्या अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत, अशी माहिती पालिकेच्या वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. स्मिता रोडे यांनी दिली.
या नुकसानीला जबाबदार धरून प्रोबेस कंपनीचे सुमीत वाकटकर यांच्यावर औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयाचे उपसंचालक विक्रम काटमवार यांनी शुक्रवारी मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. कंपनीतील निष्काळजीपणा, गंभीर दुखापत, आर्थिक हानीचा ठपका सुमीत यांच्यावर ठेवण्यात आला आहे. या स्फोटात सुमीत यांचाही मृत्यू ओढवला आहे. वाकटकर यांचा एक मुलगा युडीसीटीचा ऑर्गनिक केमिकलमधील पीएच.डी.धारक व एक मुलगा सनदी लेखापाल होता. अतिशय उच्चशिक्षित सामाजिक भान असलेले हे कुटुंब आहे, अशी ओळख निकटवर्तियांनी दिली.
प्रोबेस कंपनी आवारातील ढिगारे उपसणे व मदतकार्य यावर नियंत्रण ठेवण्यासाठी उपजिल्हाधिकारी विकास गजरे यांची नेमणूक करण्यात आली आहे. कंपन्यांच्या परिसरात कामगारांचे नातेवाईक, आप्तस्वकीय यांना मार्गदर्शन करण्यासाठी कल्याणचे तहसीलदार कार्यालय व कल्याण डोंबिवली पालिकेतर्फे खास मदत विभाग सुरू करण्यात आला आहे.
नुकसान झालेल्या घरांचे पंचनामे करण्याचे काम गुरुवारी संध्याकाळपासून हाती घेण्यात आले आहे. या कामासाठी तलाठी, मंडळ अधिकारी यांची पथके तैनात करण्यात आली आहेत. शुक्रवार संध्याकाळपर्यंत ८९३ रहिवाशांच्या घरांचे नुकसानीचे पंचनामे करण्यात आले आहेत. पावसाळ्याच्या तोंडावर घरांची पडझड झाल्याने सर्वच रहिवासी चिंताग्रस्त आहेत.

कावकावने मृतदेह सापडला..
* प्रोबेसच्या आवारात ढिगारे उपसले जात होते. ढिगाऱ्याखाली आपला माणूस मिळतो का, अशी वाट पाहणारे नातेवाईक ताटकळत बसून होते. तोच कावळ्यांचा एक थवा जवळच्या रामसन्स कंपनीच्या गच्चीवर बसून ओरडू लागला.
* सरपटणारा एखादा प्राणी दिसल्याने ते ओरडत असावेत, असे प्रथम वाटले. मात्र त्यांची कावकाव वाढतच गेली. ही कर्णकर्कश कावकाव ऐकून रामसन्स कंपनीच्या एका कर्मचाऱ्याला काहीतरी वेगळेच वाटले. तो कंपनीच्या गच्चीवर गेला तेव्हा त्याला धक्काच बसला. जळलेल्या अवस्थेतेतील एक मृतदेह तिथे पडला होता.
* स्फोटानंतर प्रोबेसमधून उडालेल्या वस्तूंमध्ये हा मानवी देह या गच्चीवर पडला असावा, असा अंदाज तपासी पथकाने काढला.
* मग या मृतदेहाची ओळख पटविण्याचे काम सुरू झाले. वाकटकर यांची सून स्नेहल यांचा भाऊ केदार लक्षरे यांना घटनास्थळी बोलविण्यात आले. त्यांनी हा मृतदेह स्नेहलचाच असल्याची ओळख पटवली.