ठाणे महानगर शिक्षण मंडळ, म.न.पा. शाळेतील मुलांना टॅब देणार आणि वर्गात ई-लर्निंगची सुविधा वापरणार ही बातमी नुकतीच वर्तमानपत्रात वाचली. याच बरोबर डोंबिवलीतील शाळांनी विद्यार्थ्यांना दिलेल्या टॅबवर बंदी आणली व मुंबईत विद्यार्थ्यांना दिलेले टॅब नादुरुस्त होऊन पडून आहेत अशा पण बातम्या वाचावयास मिळाल्या. या बातम्यांनी इ-लर्निंग अथवा डिजिटल एज्युकेशन हा विषय पुन्हा एकदा चर्चेला आला आहे.
गेल्या दहा वर्षांत देशातील शिक्षण क्षेत्रात क्रांतिकारी बदल होताना आपण बघत आहोत. नवीन शतकाच्या सुरवातीपासूनच, शतकातील नवीन आव्हाने स्वीकारण्यासाठी शिक्षण कायदा, संकल्पना, अभ्यासक्रम, शिकवण्याची पद्धत आणि मूल्यांकन या सर्व घटकात आमूलाग्र बदल होत आहेत. हे सगळे काळाशी सुसंगत आणि गरजेचे आहे यात तिळमात्र शंका नाही. माहिती तंत्रज्ञान आणि सोशल मिडिया यांचा प्रभाव आपल्या समाजात जीवनव्यापी झालेला आहे. त्यामध्ये दृकश्राव्य माध्यम आणि आता परवलीचा झालेला शब्द म्हणजे डिजीटल तंत्रज्ञान यांचा समावेश होतो.
शालेय शिक्षणामधील तंत्रज्ञानाचा, विशेषत: माहिती तंत्रज्ञानाचा वाढता उपयोग हा शिक्षण तज्ज्ञांचा संशोधनाचा आणि उत्सुकतेचा विषय आहे तर राजकीय मंडळींचा आणि शासकीय अधिकाऱ्यांचाही आवडता विषय आहे. डिजीटल एज्युकेशनसारख्या नवीन तंत्रज्ञानाचा एकंदरीतच सर्व शिक्षण व्यवस्थेत उपयोग ही काळाची गरज आहे हे शिक्षणतज्ञ मान्य करीत आहे. याबरोबरच शिक्षण, अभ्यासक्रम, पाठय़पुस्तके हे कंटाळवाणे, जाचक न वाटता ते मनोरंजनाच्या माध्यमातून, रोमांचकपणे प्रभाविरित्या देता येईल. त्यामुळे मुलांची शिक्षणाविषयीची आवडही निश्चितपणे वाढेल, असा शिक्षणतज्ञांचा विश्वास आहे. ठाणे जिल्ह्य़ातील पाष्टेपाडा गावातील शिक्षक संदीप गुंड यांनी ते दाखवून दिले आहे.
डिजीटल एज्युकेशनमध्ये तज्ञ व्यक्तींनी तयार केलेल्या अध्यायामुळे शिक्षक वर्गात अध्ययन चांगले करू शकतो, याचा उत्तम अनुभव आम्हाला गतवर्षी गणित यात्रेच्या वेळेस आला. ठाण्यातील अथर्व कुरुमभाटे या बारावीतील विद्यार्थ्यांने आपल्या आईच्या मदतीने ‘पाया गणिताचा’ नावाचा अ‍ॅप तयार केला होता. हा अ‍ॅप ग्रामीण आणि आदिवासी शाळेतील शिक्षकांनी आपल्या स्मार्ट फोनवर लोड करून घेतला होता. या दृकश्राव्य माध्यमाचा उपयोग त्यांना रोजच्या गणिताच्या सरावासाठी चांगला होतो, अशी प्रतिक्रिया मिळाली आहे.
या विषयाची दुसरी बाजू म्हणजे विद्यार्थी करत असलेला गॅझेटसचा दुरुपयोग. त्याहून महत्वाचे म्हणजे ई-लर्निंग अथवा डिजिटल एज्युकेशनचा अध्ययनात सरसकट केला जाणारा उपयोग विद्यार्थ्यांच्या शिक्षण प्रक्रियेत खरोखरच फायद्याचा आहे का? या संदर्भात संशोधनाच्या आधारे काढलेल्या बहुतेक निष्कर्षांतून डिजिटल एज्युकेशन हे मुलांच्या माहिती मिळवण्याच्या बाबतीत अथवा रंजकतेने विषयाची ओळख करून घेण्यासाठी उपयोगी पडत असले तरी माहितेचे ज्ञानात रुपांतर करण्याचे कौशल्य ते देऊ शकत नाही हे सिद्ध झाले आहे. परदेशात विशेषत: अमेरिकेत या बाबतीत सखोल संशोधन झाले आहे. कोहेन, पीले आणि काल्फ्री या शिक्षणतज्ञांनी वेगवेगळ्या केलेल्या संशोधनात डिजीटल एज्युकेशनच्या अनेक कमतरता सिद्ध करून दाखवल्या आहेत. त्यात दोन दोष प्रामुख्याने मांडले आहेत .१] विद्यार्थी आणि शिक्षक यांचा संवाद कमी होतो, २] शिक्षकाची भूमिका ही निष्क्रिय होत जाते. या दोन्ही गोष्टी शिक्षण प्रक्रियेत अतिशय महत्वाच्या आहेत.
थोडक्यात डिजिटल एजुकेशन हे शिक्षकांसाठी एक शैक्षणिक साधन आहे. त्याचा किती आणि कसा उपयोग करावा हे शिक्षकांनी ठरविणे आवश्यक आहे. आज ठाण्यातील शाळांचा अनुभव लक्षात घेता असे नाईलाजाने म्हणावे लागते की डिजिटल एज्युकेशनचा प्रयोग ठाण्यात तरी यशस्वी झालेला नाही. बदलत्या शैक्षणिक वातावरणात आधुनिक तंत्रज्ञान शिकण्यासाठी आणि वापरण्यासाठी शिक्षकांनी मानसिकता बदलणे आवश्यक आहेच, परंतु त्याही पेक्षा जास्त त्यांची गुणवत्ता वाढवणे हा त्यावरील दीर्घकालीन उपाय आहे.

– सुरेंद्र दिघे