दक्षिणेचा डोसा महाराष्ट्राला आता नवीन नाही. म्हणजे तो आता हॉटेलातच जाऊन खाण्याचा पदार्थ उरलेला नाही. दुकानातून पीठ आणून घरात इडली आणि डोसे बनतात आणि शनिवार, रविवार त्यांच्यावर भरपेट ताव मारला जातो. पण बदलापूरमध्ये असे एक ठिकाण आहे की जिथे जाऊनच डोसा खावा लागतो. ‘डोसाकिंग कॉर्नर’ हे ते ठिकाण संपूर्ण डोशाला वाहिलेला कोपरा म्हणून या दुकानाचा बोलबाला आहे.

डोसा बनवणारे हा अवलिया कोकणी आहे. अवलिया अशासाठी की हा बल्लव तब्बल १२० प्रकारचे डोसे बनवतो. बदलापूर पश्चिमेतील सानेवाडी परिसरात गॅलक्सी अपार्टमेंटमध्ये साधारण दोन वर्षांपूर्वी ‘डोसाकिंग’ उघडण्यात आले. सेल्वराज आणि प्रभाकर या दोन मित्रांसोबत मग कामाला सुरुवात झाली. फक्त डोसा बनवण्याचे ठरले आणि या कॉर्नरची निर्मिती झाली. अमित रायकर हे डोसाकिंग चालवतात.

अगदी ४५ रुपयांपासून ते १६० रुपयांपर्यंतचे डोसे इथे मिळतात. त्या जोडीला इडली, उत्तप्पाही मिळतो. साध्या डोशापासून अगदी चायनीज डोशांपर्यंत विविध प्रकारचे डोसे इथे खवय्यांसाठी उपलब्ध आहेत. चार फुटी स्पेशल फॅमिली बटर डोसा हे या डोसाकिंगचे वैशिष्टय़. मित्रपरिवार, कॉलेजचे ग्रुप, कुटुंब यांच्या सेलिब्रेशनसाठी या डोशाला मोठी मागणी आहे. केकप्रमाणे या डोशावरही नाव लिहले जात असल्याने एक आठवण म्हणूनही याला मोठी मागणी असते. पनीरची भाजी त्यात ‘डोसाकिंग’मध्ये तयार केलेला सॉस त्यामुळे क्रंची पनीर डोसा खाणाऱ्यांची संख्या अधिक आहे. त्याचप्रमाणे फक्त सहा तुकडय़ांमध्ये विभागलेला, फ्राय भाजीचे आवरण असलेला आणि पनीरचा समावेश असलेल्या मेक्सिकन डोशालाही मोठी मागणी असते, असे अमित रायकर सांगतात. गेल्या दोन वर्षांत ‘डोसाकिंग’ने प्रयोगातून ३० नवीन डोशांचे प्रकार जन्माला घातले आहेत. त्या प्रकारांना मागणीही चांगली आहे, असेही अमित रायकर सांगतात. रवी बनसोडे या अ‍ॅनिमेशन आणि डिझायनरच्या मदतीने डोसाकिंग कॉर्नरला दाक्षिणात्य चेहरा देण्यात आला आहे. आण्णा ही संकल्पना उतरवत असताना तशा प्रकारचे चित्र येथे लावण्यात आले आहे. त्यामुळे दक्षिणेत आल्याचा भास आपल्याला होतो.

डोशासह इडली आणि उत्तप्पांच्या वेगवेगळ्या प्रकारांनाही येथे चांगली मागणी आहे. पोडी मसाला आणि तुपाच्या वापरातून तयार केली गेलेली पोडी इडली सर्वाधिक खाल्ली जाते. कांचीपुरम इडली, चेट्टीनाड आणि इडली फ्रायलाही चांगली पसंती मिळत असल्याचे अमित सांगतात. यासह उत्तप्पांचेही विविध प्रकार खवय्यांच्या पसंतीस उतरत आहेत. सॉस, मसाला आणि भाज्यांच्या मिश्रणातून विविध उत्तप्पांचे प्रकारही डोसाकिंगमध्ये जन्माला आले आहेत. त्यात स्पेशल पनीर स्पायसी, मिक्स व्हेज अशा उत्तप्पांचा समावेश आहे. जैन धर्मीयांच्या आहार नियमांचा विचारही येथे केला जात असून त्याप्रमाणेही डोसे, उत्तप्पा येथे बनवले जातात. अनेक कुटुंबे घरपोच डोसा खाणे पसंत करतात. त्यामुळे दिवसाला ६० हून अधिक डोसे घरपोच केले जातात. प्रत्येक सण हा साजरा करताना त्याचे प्रतिबिंब डोसा, इडली आणि उत्तप्पावर पाहायला मिळते, असे अमित रायकर सांगतात. स्वच्छता, चांगले साहित्य, रिफाइंड तेल, घरगुती मसाले, ताज्या भाज्या आणि विश्वासार्ह कुक येथे काम करत असल्याने चव टिकवण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जातात. यात अमित यांच्या पत्नी कविता रायकर यांचाही सहभाग असल्याने घरासारखे पदार्थ बनविण्यासाठी त्यांचा प्रयत्न असतो. आपल्या खाद्यप्रेमापोटी भारतीय शेअर बाजाराची भल्या मोठय़ा पगाराची नोकरी सोडून कविता यांनी यात लक्ष घातले असून काही डोशांचा जन्म त्यांच्याच प्रयोगातून झाल्याचे अमित सांगतात. येथे येणारे बहुतेकदा पुन्हा पुन्हा येत असतात. कोणत्याही प्रकारची जाहिरात करण्याची गरज आम्हाला कधी पडली नसून येथे येणारा ग्राहकच आमचा प्रचार करतो, असे अमित सांगतात. त्यामुळे अल्पावधीतच डोसाकिंगला अनेकांनी भेट देऊन येथील डोशाची चव चाखली आहे.

डोसाकिंग

  • कुठे?- विकास गॅलक्सी, सानेवाडी, शामराव विठ्ठल बँकेशेजारी, बदलापूर (पश्चिम)
  • कधी :- दररोज, सकाळी ९ ते रात्री १२ वाजेपर्यंत