ठाण्यातील आय.पी.एच. संस्थेकडून पुरस्काराचे वितरण
मानसिक आजारातून नव्याने उभ्या राहिलेल्या शुभार्थी अर्चना पानसकर, विनोद करुले आणि माधुरी माधव यांना व मानसिक स्वास्थ्य ढासळलेल्यांना साहाय्य करणारे शुभंकर परेश केणी, माधवी काळोखे आणि आशा इंगळे यांना द्विज पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तर चाळीसगाव येथील डॉ. नरेंद्र दाभोळकर मानसिक आधार केंद्र या संस्थेला द्विज पुरस्काराने गौरविण्यात आले.
आय.पी.एच.च्या वतीने रविवारी गडकरी रंगायतनमध्ये द्विज पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला अभिनेता नीलेश साबळे, अभिनेत्री विशाखा सुभेदार, सुनील तावडे, डॉ. विद्याधर वाटवे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे निवेदन मानसोपचारतज्ज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी यांनी केले.

जागतिक मन आरोग्य सप्ताहामध्ये मानसिक आजारांशी सामना करून जगण्याच्या प्रवाहामध्ये पुन्हा समर्थपणे उभे राहिलेले मनोरुग्ण आणि त्यांना साहाय्य करणारे, खंबीरपणे उभे राहण्यासाठी मदत करणारे त्यांचे कुटुंबीय यांना मान्यवर कलाकारांच्या उपस्थितीत पद्म मनोहर फाटक स्मृती द्विज पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मराठी दूरचित्रवाहिन्यांवरील विविध कलाकार या वेळी उपस्थित होते.
दूरचित्रवाहिनीवरील निवेदक नीलेश साबळे यांनी उपस्थितांशी संवाद साधला. प्रत्येकाला मानसिक आजार असून त्याचे प्रमाण वाढले की स्वरूप बदलते. आपले विचार हेच आपले गुरू व मित्र असतात. कुणीही सोबत नसताना आपले विचार आपल्या सोबत असतात. त्यामुळे आपल्या विचारांची दिशा सकारात्मक ठेवावी. मेंदूला चांगले खाद्य दिले तर आपण चांगले जगू शकतो, असे मत अभिनेते नीलेश साबळे यांनी व्यक्त केले.

‘जय मल्हार’ मालिकेतील देवदत्त नागे यांनी मन खंबीर करण्याचा सल्ला दिला. आपल्या कोणत्याही वेगळ्या कृतीला वेडे ठरवणारे अनेक लोक आपल्या आजूबाजूला असतात. मात्र त्यापासून दूर राहून आपल्या मनातील विचार ठाम ठेवा, खंबीर राहा असे सांगून आज इथे अशी खंबीर मनाची माणसे पाहायला मिळाल्याचे सांगितले. मानसिक स्वास्थ्य चांगल्या असणाऱ्या कोणालाही साधता येणार नाही इतका खरेपणा या शुभार्थीमध्ये दिसतो आहे, असे मत अभिनेते चिन्मय उदगीरकर यांनी या वेळी व्यक्त केले. तसेच या वेळी उपस्थित शुभंकर व शुभार्थी यांनी आपले अनुभवकथन केले.