कल्याणमधील मुरबाड रस्त्यावरील रेल चाइल्ड संस्थेच्या सरस्वती विद्यामंदिराच्या प्रवेशद्वारात मागील दोन महिन्यांपासून गटाराचे सांडपाणी वाहत आहे. या गटाराचे बांधकाम पूर्ण न केल्याने ते रखडलेल्या अवस्थेत आहे. त्यामुळे सगळे सांडपाणी शाळेच्या मुख्य प्रवेशद्वारासमोरून वाहू लागले आहे. या गटारातून विद्यार्थी, पालकांना ये-जा करावी लागत असल्याने आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. स्थानिक नगरसेवक या कामांकडे लक्ष देत नसल्याने पालकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.सरस्वती विद्यामंदिराच्या परिसरात महापालिकेकडून गटाराची कामे करण्यात येत आहेत. ही कामे पूर्ण झाली असती तर या भागात सांडपाण्याचा प्रश्न निर्माण झाला नसता. शाळेच्या भागातील गटाराचे काम ठेकेदाराने अर्धवट टाकले आहे. हे काम का थांबले आहे याचे कोणतेही कारण महापालिका अधिकाऱ्यांकडून देण्यात येत नाही. गटाराचे काम पूर्ण नसल्याने मोकळ्या जागेतील सांडपाणी शाळेच्या प्रवेशद्वारासमोरून वाहू लागले आहे. शहरात स्वाइन फ्ल्यू, डेंग्यू, तापाच्या साथी पसरल्या आहेत. सांडपाण्यातून येणाऱ्या सततच्या दरुगधीमुळे या भागातून सतत ये-जा करणाऱ्या विद्यार्थी, पालकांना या साथीच्या रोगांची भीती वाटत आहे. शहर स्वच्छतेच्या मोहिमा हाती घेणाऱ्या महापालिकेच्या आरोग्य, बांधकाम विभागाला हे रखडलेले गटार दिसत नाही का, असे प्रश्न नागरिकांकडून करण्यात येत आहेत.