वनविभाग, पोलिसांचे कडक बंदोबस्ताचे दावे फोल

आषाढ आमावस्या तोंडावर असल्याने ठाण्यातील येऊरमध्ये मद्यपींचा वावर वाढू नये यासाठी प्रतिबंधक उपायांची जंत्री वन विभाग आणि पोलिसांकडून सादर केली जात असली तरी प्रत्यक्षात मात्र गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसात या ठिकाणी मद्यपी आणि पर्यटकांचा अक्षरश धुडघूस सुरू असल्याचे चित्र आहे. येऊरच्या जंगलांमधील धबधब्यांवर येणाऱ्या तरुणांवर अंकुश ठेवणारी कोणतीही ठोस यंत्रणा या भागात नसल्याने गेल्या काही दिवसांपासून अगदी दररोज मद्यपींच्या याठिकाणी पाटर्य़ा झडू लागल्या आहेत. येऊर परिसरात सकाळ-सायंकाळ व्यायामासाठी येणाऱ्या ठाणेकरांनाही या मद्यपी पर्यटकांचा त्रास होऊ लागला असून येऊरच्या उतरंडीवर वेगाने वाहने चालविण्याचे प्रकारही वाढू लागले आहेत. वनविभागातर्फे भेंडीनाला येथील धबधब्यांजवळ संरक्षित भिंत बांधण्यात आली असली तरी वनविभागाच्या नाकावर टिच्चून या धबधब्यात ओल्या पार्टीचा आनंद घेण्यासाठी शनिवार-रविवारी तरुण गर्दी करत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे.

ठाणे शहरात पावसाने हजेरी लावल्यावर निसर्ग पर्यटनासाठी कायम आकर्षण ठरलेल्या येऊर परिसरात पर्यटकांचा ओढा असतो. येऊरमध्ये प्रवेश केल्यावर आजूबाजूला असलेला निसर्गरम्य परिसर आणि जंगलातील धबधबे पर्यटकांना भुरळ घालतात. मात्र गेल्या अनेक वर्षांत पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने येऊर परिसरात यंत्रणेतर्फे कोणतीही खबरदारी घेण्यात आलेली नाही. गटारीच्या निमित्ताने या भागात गस्त घालून सुरक्षा वाढवण्याचे काम केले जाईल, असे दावे पोलीस यंत्रणा, वनविभाग आणि राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत केले जात आहेत. प्रत्यक्षात गेल्या काही आठवडय़ात शनिवार-रविवारी या भागात पर्यटकांनी अक्षरश: धुडगूस घातला आहे, अशी माहिती स्थानिक रहिवाशांनी दिली. पावसाळा सुरू झाल्यापासून येऊरकडे जाणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत मोठय़ा प्रमाणात वाढ झाली असून सुरक्षेची काळजी न करता तरुण जंगलात ठिकठिकाणी वावरताना पहायला मिळतात असे गावातील नागरिकांनी सांगितले.  येऊरच्या प्रवेशद्वाराजवळची सुरक्षा व्यवस्था कडक करण्याची जबाबदारी देखील पाळली जात नसल्याचे निदर्शनास येत आहे. गटारी निमित्त या भागात कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात येणार असली तरी पावसाळ्यातील दर आठवडय़ाच्या शेवटी येऊरमध्ये धिंगाणा घालणाऱ्या  पर्यटकांवर अंकुश कोण ठेवणार, असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.

धोकादायक तलावाला भिंत नाही

गेल्या वर्षी पर्यटन विकासाच्या पाश्र्वभूमीवर संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे तत्कालीन मुख्य वनसंरक्षक विकास गुप्ता आणि ठाणे महानगरपालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी केलेल्या येऊर दौऱ्यात एअर फोर्स तलावाचे सुशोभीकरण करण्याचे आणि संरक्षक कठडा बांधण्याचे निश्चित करण्यात आले होते. मात्र वर्ष उलटूनही पर्यटकाच्या जीवाची पर्वा न करता या तलावाला अद्याप संरक्षक भिंत बांधण्यात आलेली नाही. मधुबन गेट येथून येऊर गावात जाताना लागणाऱ्या या तलावाची पाणीपातळी पावसाळय़ात वाढते. त्यातच याठिकाणी येणाऱ्या पर्यटकांपैकी अनेक जण उंचावरून तलावात उडय़ा मारतात, अशी माहिती येऊर एन्व्हायर्नमेंटलचे रोहित जोशी यांनी सांगितले.

भेंडीनाला धबधबाही धोकादायक

येऊरच्या जंगलात भेंडीनाला परिसरात धबधबा आहे. पावसाळ्यात हा धबधबा पाहणे नेत्रसुखद असले तरी या धबधब्याच्या ठिकाणी पर्यटनासाठी जाणे तितकेच धोकादायक आहे. समूहाने येणारे तरुण मोठय़ा आवाजात गाणी म्हणत जंगलाची शांतता नष्ट करत असल्याने वन्यजीवांच्या अधिवासाला देखील धोका पोहचवत असतात. येऊरच्या प्रवेशद्वारावरच कडक सुरक्षा व्यवस्था तैनात नसल्याने येऊरमध्ये येणारे पर्यटक आडवाटेने या धबधब्याच्या ठिकाणी जातात. शनिवार-रविवारी या धबधब्याजवळ तरुण पर्यटकांचा मद्यपान करून मोठय़ा प्रमाणात धिंगाणा सुरू असतो.