कल्याण पश्चिम भागातील सापाड गावाजवळील खाडी भागात मोठय़ा प्रमाणावर रेती उपसा सुरू आहे. जिल्हाधिकारी अश्विनी जोशी यांनी कडक आदेश देऊन विविध भागांमध्ये उपसा थांबलेला नाही. सापाड भागातून मुंबईला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी गेली आहे. एका पुलावरून नेण्यात आलेल्या जलवाहिनींचा आधार असलेल्या सीमेंट खांबांभोवतीचा रेतीचा थर रेती माफियांनी काढला आहे. त्यामुळे येत्या काळात या पुलाला धोका निर्माण होऊन जलवाहिनी कोसळण्याची भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.या रेती उपशाविषयी महसूल विभागाचे मंडल अधिकारी, तलाठी सुभाष ढोणे यांच्याकडे ग्रामस्थ शत्रुघ्न थळे, सुरेश मढवी, बळीराम भोईर आदींनी अनेक वेळा तक्रारी केल्या आहेत. जिल्हाधिकारी, पोलीस अधिकाऱ्यांना निवेदने देण्यात आली आहेत. परंतु, त्यांच्याकडून कोणतीही दखल घेतली जात नाही, अशी खंत ग्रामस्थांनी व्यक्त केली. सापाड गावचे देवस्थान खाडी भागात आहे. तेही रेती उपशामुळे धोक्यात आले आहे, असे ग्रामस्थांनी सांगितले. यापूर्वी सापाड गावचे गावकरी खाडीमधून पलीकडे चालत जात असत. एवढी उथळ खाडी या भागात होती. गेल्या दहा वर्षांत रेती माफियांनी पोकलेन, ड्रेझरच्या साहाय्याने खाडी परिसर उकरून काढला आहे. खाडी किनारा भागातील खारफुटी, जंगल नष्ट केले आहे. रेती उपशामुळे खाडी खोल करून ठेवली आहे. रेतीचा खाडीतील पट्टा संपल्याने रेती माफियांनी सापाड गावाकडील खाडी किनाऱ्याकडे लक्ष वळवले आहे. गावचे ग्रामदैवत या रेती माफियांच्या तडाख्यात सापडले आहे. पैसा, दादागिरीच्या बळावर या माफियांचे उद्योग सुरू आहेत. त्याला पोलीस, तलाठी, मंडल अधिकारी यांचीही साथ मिळत आहे. त्यामुळे ग्रामस्थांच्या विरोधाला कोणीही दाद देत नाही, अशी खंत एका ग्रामस्थाने व्यक्त केली.सापाड गावचे तलाठी सुभाष ढोणे हे ‘आम्ही हा रेती उपसा बंद करतो. तुम्ही हे प्रकरण पुढे नेऊ नका’ अशी विनंती ग्रामस्थांना करीत आहेत. तलाठय़ाचा आशीर्वाद रेती माफियांना असल्याने ते कारवाई करीत नाहीत, असा आरोप ग्रामस्थांनी केला. येत्या आठवडाभरात या रेती माफियांवर महसूल, पोलिसांनी कारवाई केली नाही तर खाडीमध्ये उपोषण करण्याचा इशारा सापाडच्या ग्रामस्थांनी दिला आहे. अधिक माहितीसाठी तलाठी ढोणे यांच्या भ्रमणध्वनीवर आठ ते नऊ वेळा संपर्क करूनही त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही. तहसीलदार किरण सुरवसे यांनी या भागात प्रत्यक्ष पाहणी केल्यावर काही आढळले नाही. परंतु, या भागात रेती उपसा सुरू असेल तर कारवाई करण्याचे आदेश तलाठी, मंडल अधिकाऱ्यांना दिले आहेत, असे पत्रकारांशी बोलताना सांगितले.