मुसळधार पावसामुळे माती भुसभुशीत झाल्याने घटना

कल्याण शहराच्या प्रवेशद्वारावरील ऐतिहासिक दुर्गाडी किल्ल्याचा खाडी किनाऱ्याच्या बाजूचा बुरुज बुधवारी दुपारी ढासळला. आठवडाभर कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे बुरुजाची माती भुसभुशीत होऊन ही घटना घडली आहे. गेल्या वर्षी दुर्गाडीचा एक बुरुज ढासळला होता. संपूर्ण किल्ल्याचे गोलाकार बुरुज ढासळल्यानंतर राज्य शासन या किल्ल्याची डागडुजी करणार का, असा संतप्त सवाल शहरातील इतिहासप्रेमी नागरिकांकडून उपस्थित करण्यात येत आहे.

शासनाच्या पुरातत्व विभागाच्या अखत्यारीत दुर्गाडी किल्ला आहे. या विभागाकडून किल्ल्याची योग्यरितीने डागडुजी केली जात नाही, अशी दुर्गप्रेमींची तक्रार असते. त्यामुळे वारंवार या घटना घडत आहेत, असे महापालिकेचे सभागृहनेते राजेश मोरे यांनी घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर सांगितले.

छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेला दुर्गाडी किल्ला ऐतिहासिक कल्याण शहराचे वैभव आहे. त्याचे जतन करणे शहराची विश्वस्त संस्था म्हणून पालिका प्रशासनाचे काम आहे. परंतु, शासन पालिकेला या किल्ल्याच्या डागडुजी, देखभाल करण्यास अनुमती देत नाही. त्यामुळे असे प्रकार वारंवार घडत असल्याचा आरोप मोरे यांनी केला.

मुख्यमंत्र्यांकडे धाव

हा किल्ला पालिकेकडे हस्तांतरित केला तर देखभालीसाठी अर्थसंकल्पात वेळोवेळी तरतूद करता येईल. पण किल्ला पालिकेच्या ताब्यात नसल्याने तेथे दुरुस्ती करता येत नाही. काही घटना घडली की प्रशासनाला फक्त बघ्याची भूमिका घ्यावी लागते. हा प्रकार थांबला पाहिजे, असे सभागृहनेते राजेश मोरे यांनी सांगितले. किल्ला लवकरच पालिकेकडे हस्तांतरित करावा यासाठी मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार असल्याचे ते म्हणाले.