रणजी क्रिकेटसाठी खेळाडू तयार करण्याचे काम करणाऱ्या डोंबिवलीतील स. वा. जोशी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी २१ मार्च रोजी मोकळा श्वास घेतला होता. याचे कारणही तसेच आहे. गुढीपाडव्याला स्वागतयात्रेनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस डोंबिवलीत आले होते. ते श्री गणेश मंदिरात स. वा. जोशी शाळेच्या रस्त्याने आले होते. तेव्हा दोन दिवसांसाठी या शाळेच्या अगदी समोरच असलेल्या कचराकुंडय़ा बाजूला हटवण्यात आल्या होत्या, पण मुख्यमंत्र्यांच्या ताफा गेला नि पुन्हा या कुंडय़ा त्यांच्या जागेवर आल्या.
या कुंडय़ांमध्ये परिसरातील रहिवाशांसह, ठाकुर्ली परिसरातील लोकही कचरा टाकत आहेत. शेजारीच असलेल्या टेम्पो वाहनतळवरील वाहनांमधील सामानबांधणीचे टाकाऊ साहित्यही कुंडय़ांमध्ये फेकले जात आहे. त्यामुळे शाळेत येणाऱ्या प्रत्येकाचा श्वास कोंडला आहे. रात्री-अपरात्री त्यातील कचरा पेटवण्यात येतो. त्यामुळे धुरामुळे परिसरात मोठय़ा प्रमाणात प्रदूषण होत असल्याच्या या भागातील रहिवाशांच्या तक्रारी आहेत.
शहराच्या इतर भागांतील हॉटेल, काही सोसायटय़ांसमोरील कचराकुंडय़ा हटवून त्या कोपऱ्यात टाकल्या जातात. त्याप्रमाणे जोशी शाळेच्या एका कोपऱ्यावर अन्य भागांतील दोन वाढीव कुंडय़ा आणून ठेवण्यात आल्या आहेत. या कुंडय़ांमध्ये सकाळच्या वेळेत इमारतींमधील कचरा, ठाकुर्ली भागातून रिक्षाने जाणारे प्रवासी कचरा फेकतात. या भागात टेम्पोचालकांचा वाहनतळ आहे. हे वाहनचालक सामानाची वाहतूक करून वाहनतळावर आले की, वाहनांमधील कचरा जोशी शाळेच्या कोपऱ्यावरील कुंडय़ांमध्ये फेकून देतात.  
या कचराकुंडय़ांमधील टाकाऊ खाद्य खाण्यासाठी भटक्या कुत्र्यांची या ठिकाणी वर्दळ असते. संपूर्ण कचरा ते उकरून कुंडीच्या अवतीभवती पसरवतात. अनेक वेळा हा कचरा वेळेवर उचलला जात नाही. त्यामुळे परिसरात दरुगधी पसरते, अशा येथील रहिवाशांच्या तक्रारी आहेत.
या प्रभागात काम करणारे पालिकेचे आरोग्य विभागाचे कामगार फक्त या भागातील पालिकेतील पदाधिकारी, नगरसेवकांच्या घरांभोवतीची स्वच्छता करण्यात मग्न असतात. त्यामुळे नगरसेवकांनाही प्रभागात खूप स्वच्छता असल्याचा भास होतो. त्यामुळे नगरसेवकही प्रभागात फिरकत नाहीत, असे रहिवाशांनी सांगितले. या भागाचे मनसेचे नगरसेवक प्राजक्त पोतदार यांना या वाढीव कचराकुंडय़ा हटवा म्हणून अनेक लोकांनी सुचवले आहे; पण त्यांचेही या विषयाकडे लक्ष नाही. फक्त करतो, पाहतो, एवढीच गुळमुळीत उत्तरे त्यांच्याकडून दिली जातात, असे येथील रहिवाशांनी सांगितले.
वेळीच या भागातील वाढीव कुंडय़ा हटवल्या नाहीत व नियमित या भागातील कचरा हटवला नाही, तर या कुंडय़ांभोवती पडलेला कचरा थेट नगरसेवक आणि पालिकेच्या दारात नेऊन टाकण्याचा विचार या भागातील रहिवासी करीत आहेत.