कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या आयुक्तपदी सिंधुदुर्गचे जिल्हाधिकारी ई. रवींद्रन यांच नेमणूक आता निश्चित मानली जात आहे. यासंबंधीची औपचारिकता शिल्लक राहिली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चालू अधिवेशनात यासंबंधीची घोषणा केल्याची माहिती कल्याण-डोंबिवलीतील स्थानिक आमदारांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
२७ गावे कल्याण-डोंबिवली महापालिकेत समाविष्ट करून भौगोलिक विस्तार केल्यामुळे कल्याण-डोंबिवली तसेच कल्याण ग्रामीण परिसरातील आमदारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव विधानसभेत मांडला होता. या प्रस्तावाद्वारे कल्याण-डोंबिवली महापालिका ‘क’ वर्ग दर्जाची असल्याने येथे भारतीय प्रशासकीय सेवेतील आयुक्तांची नेमणूक करावी, अशी मागणी करण्यात आली.
या अभिनंदन प्रस्तावावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कल्याण-डोंबिवली शहरातील रखडलेली विकास कामे, विस्तारित २७ गावांमधील विकास कामे, तेथील नागरी समस्यांची सोडवणूक करण्यासाठी कल्याण-डोंबिवली पालिकेला भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी देण्यात येईल, असे जाहीर केले. सिंधुदुर्गचे जिल्हाधिकारी ई. रवींद्रन यांची नेमणूक करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले, अशी माहिती स्थानिक लोकप्रतिनिधींनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.