‘रंग बरसे..’ ‘ओ गोरी रंग दे..’अशा लोकप्रिय गीतांच्या तालावर थिरकत आणि विविध रंगांची उधळण करीत ठाणेकरांनी शुक्रवारी धुळवडीचा मनमुराद आनंद लुटला. ‘बुरा ना मानो होली है’.असे म्हणत बच्चेकंपनीपासून सर्वानीच एकमेकांवर रंग फेकून मोठय़ा उत्साहात धुळवड साजरी केली. विशेष म्हणजे, यंदा रंगपंचमीमध्ये पाणी आणि फुग्यांचा वापर कमी झाल्याचे चित्र दिसून आले. तसेच रसायनमिश्रित रंगांऐवजी नैसर्गिक रंगांना पसंती देत अनेकांनी पर्यावरणस्नेही रंगपंचमी खेळण्यावर अधिक भर दिल्याचेही दिसून आले. पोलिसांच्या इशाऱ्यामुळे शहरातील अनेक इमारतींच्या पदाधिकाऱ्यांनी गच्चीच्या दरवाजाला टाळे ठोकल्याने फुगे फेकण्याचे प्रमाण घटल्याचे दिसून आले.
ठाणे शहरातील चौकाचौकांमध्ये शुक्रवार सकाळपासून रंगपंचमी साजरी करण्यासाठी तरुणाईची लगबग सुरू झाली. तरुणाईने सकाळपासूनच चौकांमध्ये डीजे लावल्यामुळे होळीच्या गीतांमध्ये रंगपंचमीचे वातावरण तयार झाले होते. या गीतांवर तरुणाई थिरकत होती आणि एकमेकांवर विविध रंगांची उधळण करीत होती. तसेच चौकातून एखादा जाताना दिसला तर त्याच्यावरही रंग फेकण्यात येत होते. त्याचप्रमाणे गल्लीबोळात आणि सोसायटय़ांमध्ये बच्चेकंपनी पिचकाऱ्यांमधून एकमेकांवर रंगांचे पाणी उडविताना दिसून आले. शहरातील काही चौकांमध्ये संस्था किंवा मंडळांमार्फत ठेवण्यात आलेल्या थंडाईचाही अनेकांनी आनंद लुटला. तसेच शहरातील काही नामांकित हलवाईच्या दुकानात थंडाई विकत घेण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती.
केमिकलयुक्त रंगांमुळे शरीराला इजा पोहचते आणि फुग्यांच्या मारामुळे जायबंदी होण्याचे प्रकार घडतात. यामुळे होळीचा बेरंग होऊ नये म्हणून बहुतेक ठिकाणी केमिकलयुक्त रंगांऐवजी नैसर्गिक रंगांना पसंती देण्यात आली. अनेक जणांनी पर्यावरणस्नेही रंगपंचमी खेळण्यावर अधिक भर दिल्याचे दिसून आले. काहींनी तर होळी खेळण्यासाठी गिरणीतील खराब पिठाचा वापर केला. तसेच फुग्यांचा वापर टाळण्यात आल्याचेही चित्र दिसत होते. यंदा ठाणे पोलिसांनी होळीनिमित्त फुगे फेकणाऱ्यांविरोधात कारवाईचा बडगा उगारला होता. तसेच एखाद्या इमारतीच्या गच्चीवरून फुगा फेकल्याची तक्रार आली तर त्या इमारतीतील पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचा इशाराही पोलिसांनी दिला होता. परिणामी, या भीतीमुळे अनेक इमारतींच्या पदाधिकाऱ्यांनी गच्चीच्या दरवाजाला टाळे ठेकले होते. यामुळे गच्चीवरून फुगे फेकण्याच्या प्रकारांना काहीसा आळा बसल्याचे चित्र दिसून आले.

सेना नेत्यांची एकमेकांवर रंगफेक
ठाणे येथील टेंभी नाका परिसरात शिवसेनेच्या वतीने आयोजित करण्यात येणारी रंगपंचमी यंदाही मोठय़ा उत्साहात साजरी करण्यात आली. ठाण्यातील शिवसेनेच्या नेत्यांनी एकमेकांवर रंग फेकत रंगपंचमीचा मनमुराद आनंद लुटला. याचप्रमाणे वैतीवाडी, पाचपाखाडी, तलावपाळी, उपवन तसेच शहरातील वेगवेगळ्या भागांत रंगपंचमी उत्साहात साजरी करण्यात आली. दरम्यान, स्वाइन फ्लू आणि दहावी व बारावी परीक्षांच्या पाश्र्वभूमीवर रहेजा परिसरातील संकल्पची रंगपंचमी यंदा आयोजकांनी रद्द केली होती. तर वृंदावन परिसरातही काही कारणास्तव रंगपंचमीचा उत्सव साजरा करण्यात आला नाही.